ग्रहमान : १३ ते १९ जुलै २०१९

अनिता केळकर
सोमवार, 15 जुलै 2019

ग्रहमान
 

मेष : मंगळाची साथ राहील. अडथळ्यांची शर्यत संपवून यशाकडे वाटचाल राहील. व्यवसायात विरोधकांचा विरोध मावळेल. सामंजस्याची भूमिका घेऊन प्रश्‍न मार्गी लावाल. नव्या योजनांना योग्य दिशा मिळेल. कामाचा व्याप व विस्तार वाढविण्यावर भर राहील. नोकरीत नवीन कामाबाबत सूतोवाच होईल. वरिष्ठ त्यासाठी जादा अधिकार देतील. स्पर्धक व हितशत्रूंपासून सावध राहावे. घरात मंगलकार्य ठरेल. भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव घ्याल. आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या भेटीगाठीचे योग येतील.

वृषभ : महत्त्वाच्या ग्रहांची साथ मिळणार नाही, त्यामुळे थोडे निराश व्हाल. परंतु, थोडी सबुरी ठेवली, तर सर्व काही ठीक होईल. व्यवसायात विनाकारण येणाऱ्या अडचणींमुळे थोडे विचारमग्न व्हाल. पण निश्‍चय व मेहनतीच्या जोरावर पुढे जाल. प्रत्यक्षात त्याचा लाभ पुढे होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी तुमची परीक्षाच बघतील. त्यासाठी कष्टाची तयारी ठेवावी. कामामुळे नवीन ओळखी होतील. घरात चांगल्या कारणास्तव पैशांची सोय करावी लागेल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल.

मिथुन : ‘अति परिचयात अवज्ञा’ ही म्हण लक्षात ठेवावी व भोवतालच्या व्यक्तींपासून चार हात लांब राहून हितसंबंध जपावे. व्यवसायात सरळ, सोप्या वाटणाऱ्या कामात अडचणी येतील. कामांना विलंब होईल. मात्र, कुठल्याही गैरमार्गाचा वापर करू नये. नोकरीत कामात स्वयंभू असावे. सहकारी व वरिष्ठांकडून फार अपेक्षा करू नयेत. बोलण्यापेक्षा कृतीवर भर राहील. घरात सर्वांना खुश ठेवताना थोडे जास्त पैसे खर्च होतील. दगदगही होईल. महिलांनी मानसिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करावा.

कर्क : माणसांचा योग्य वापर करून आपले हित साधण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात मिळालेल्या संधीचे सोने करून घ्याल. कामाची धावपळ प्रमाणाबाहेर वाढेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत कामांना मूर्त स्वरूप देण्यासाठी नवीन व्यक्तींशी गाठभेट होईल. कामातील बेत गुप्त ठेवावेत. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात कार्यक्रम ठरल्यामुळे सर्वजण कार्यमग्न राहतील. महिलांना स्वतःचे वेगळेपण सिद्ध करता येईल. तरुणांनी वाईट संगत टाळावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देणे गरजेचे आहे.

सिंह : एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न राहील. पण नंतर योग्य क्रम आखून कामांना प्राधान्य द्यावे लागेल. व्यवसायात निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. विचार व कृती यांचा समन्वय आखून प्रगती करावी. उद्योगात स्पर्धा तीव्रतेने जाणवेल. नोकरीत समोरच्या संधीचा पाठपुरावा घेताना चुकीच्या व्यक्तींशी संबंध जोडू नये. मिळालेल्या अधिकारांचा वापर जपून करावा. घरात वाढत्या खर्चावर आळा घालण्यासाठी हौसेवर मुरड घालावी लागेल. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कन्या : घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात कामाचा वेग उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांना चालना द्यावी. तसेच खडे बोलून करून जुनी वसुली घेण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल, त्यामुळे मधेच विश्रांती घ्यावीशी वाटेल. छोटीशी सहल किंवा फेरफटका मारून घरात पूर्वी ठरलेले समारंभ पार पडतील. घरगुती गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. गृहसजावटीसाठी पैसे खर्च होतील. मात्र, त्यातूनही आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना उत्तम ग्रहमान आहे.

तूळ : पैशाची ऊब मिळवण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न कराल. या सप्ताहात प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी साहसी कल्पना प्रत्यक्षात आणाल. योग्यवेळी योग्य व्यक्तींची मिळालेली मदत तुम्हाला कामे मार्गी लावताना उपयोगी पडेल. नोकरीत नवीन पद्धतीच्या कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. मात्र, कामे पुढे ढकलण्याकडे तुमचा कल राहील. घरात लवचिक धोरण ठेवलेत, तर वातावरण आनंदी राहील. महिलांना आवडत्या वस्तूंची खरेदी करता येईल. कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धीझोतात राहता येईल.

वृश्‍चिक : आर्थिक घडी बसवण्याकडे विशेष लक्ष द्याल. व्यवसायात प्रगती चांगली होईल. नवीन योजना प्रत्यक्षात साकार होतील. योग्य माणसांची साथही मिळेल. आर्थिक स्थिती समाधान देणारी असेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी तुमच्या मतांचा विचार करतील व त्याप्रमाणे कृतीही करतील. जोडव्यवसायातून चांगली कमाई होईल. घरात कुटुंबासमवेत हौसमौज साजरी कराल. तुमच्या कुचक्‍या बोलण्याने नातेसंबंध बिघडणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. तरुणांचे विवाह जमतील.

धनू : ग्रहांची साथ राहील, त्यामुळे आकाश ठेंगणे वाटायला लागेल. मात्र, पाय जमिनीवर ठेवून उभे राहावे. व्यवसायात यशाची धुंदी चढू देऊ नये. कामात होणारा विलंब तुम्हाला सहन होणार नाही. महत्त्वाचे निर्णय घ्याल व प्रश्‍न निकालात काढाल. नोकरीत बदल किंवा बदली होण्याची शक्‍यता आहे. अधिकार, आर्थिक फायद्यातही वाढ होईल. सहकारी कामात मदत करतील. घरात तुमच्या हट्टी स्वभावाचा इतरांना त्रास होण्याची शक्‍यता आहे, तरी सामंजस्याने वागून शांतता राखावी.

मकर : पैशाच्या व्यवहारात चोख राहून कामे पूर्ण करण्याकडे कल राहील. व्यवसायात तातडीची कामे आधी पूर्ण कराल. कामासाठी योग्य व्यक्तींची केलेली निवड त्यावर तुमचे यश अवलंबून राहील. तुमचे इरादे मोठे असल्याने आवश्‍यक भांडवल व मदतीची गरज भासेल. नोकरीत कामानिमित्त थोड्या सवलती मिळतील व अधिकारही मिळतील. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊ नये. चुकीच्या व्यक्तींशी हातमिळवणी टाळावी. घरात वादाचे प्रसंग टाळावेत. अनावश्‍यक खर्चावर बंधन ठेवावे.

कुंभ : या सप्ताहात माणसांची पारख योग्यप्रकारे करू शकलात, तर यशाची मजा चाखता येईल. व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. तसेच नवीन कामेही मिळतील. कामामुळे दगदग धावपळ वाढेल. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर असेल. कामानिमित्त प्रवास घडेल, नवीन ओळखी होतील. घरात तरुणांना नवीन सहवासांचे आकर्षण वाटेल. महिलांना कोणाच्या तरी नैतिक अधिकाराची गरज भासेल. कलाकार, खेळाडूंना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जादा परिश्रम करावे लागतील.

मीन : प्रगतीचा आलेख चढता राहील, त्यामुळे नवीन पर्वाची ही नांदी ठरेल. व्यवसायात आव्हानात्मक कामे स्वीकाराल. नवीन व्यक्तींशी संपर्क होईल. मात्र, त्यांची विश्‍वासार्हता पडताळून पाहावी. नोकरीत मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल. नवीन सुविधांकरिता तुमची निवड होईल, त्यामुळे सहकाऱ्यांना तुमची असूया वाटेल. घरात तुम्हाला व तुमच्या शब्दाला मान मिळेल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगता येईल. तरुणांनी इतरांचा प्रभाव स्वतःवर पडू देऊ नये.

संबंधित बातम्या