ग्रहमान : २० ते २६ जुलै २०१९

अनिता केळकर
शनिवार, 27 जुलै 2019

ग्रहमान
 

मेष : प्रयत्नांच्या प्रमाणात यश मिळेल. व्यवसायात भोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन कोणतेही निर्णय घ्यावे. महत्त्वाचे करार मदार करताना निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तत्त्वाला मुरड घालून लवचिक धोरण स्वीकारावे. नवीन कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. घरात लांबलेली शुभकार्ये पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल.

वृषभ : वेळेचे महत्त्व ओळखून गरजेची व महत्त्वाच्या कामांची आखणी करून त्याप्रमाणे कामे हाती घ्यावीत. व्यवसायात कामाचा पवित्रा सावध ठेवावा. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. मिळालेल्या पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करावा. नोकरीत सजगवृत्ती ठेवावी. कोणत्याही प्रश्‍नावर आपले मत प्रकट करू नये. गैरसमज होण्याची शक्‍यता आहे. घरात वैचारिक मतभेद होतील, तरी शांत राहावे. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.

मिथुन : कामातील अडचणींवर मात करून प्रगतिपथावर राहाल. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे तुमचे कार्यक्षेत्र बदलेल. भोवतालच्या व्यक्तींची जर कामात मदत झाली, तर प्रगतीचा वेग वाढेल. नोकरीत कामानिमित्त प्रवास घडेल. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा सवलत व अधिकार देतील. घरात आवश्‍यक त्या कामात लक्ष द्यावे लागेल. आप्तेष्टांच्या भेटीगाठीचे योग येतील. मानसिक समाधान मिळेल.

कर्क : माणसांची पारख होईल. व्यवसायात व्यवहारदक्ष राहून निर्णय घ्यावे लागतील. कधी गोड बोलून, तर कधी अधिकाराचा वापर करून कामे करून घ्यावी लागतील. आर्थिक आवक थोडी मंदावेल. परंतु, थोडा धीर धरावा. नोकरीत स्वतःची क्षमता ओळखून कामाची जबाबदारी स्वीकारावी. कामात बिनचूक राहाल. केलेल्या कामाचा उपयोग होईल. घरात नवीन अनुभव येतील. मात्र, बोलून वाईट होऊ नये. नवीन खरेदीसाठी मोह होईल. प्रियजनांच्या जीवनातील सुखद क्षण अनुभवता येतील.

सिंह : वेळेचा सदुपयोग करून घेतलात, तर यशाची मजा चाखाल. व्यवसायात नवीन योजना अमलात आणाल. त्याचा उपयोग होईल. नवीन कामामुळे तुमचा उत्साह वाढेल. आर्थिक प्राप्तीतही वाढ होईल. कामामुळे नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत तुमच्या बुद्धीला चालना देणारे काम सोपवले जाईल. त्यासाठी आवश्‍यक ते प्रशिक्षणही दिले जाईल. जादा कामातून वरकमाई करता येईल. घरात कौटुंबिक जीवनातील आनंदाचे क्षण साजरे कराल. कुटुंबासोबत छोटीशी ट्रीपही काढाल.

कन्या : यशाची मजा चाखता येणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना वेग येईल. योग्य व्यक्तींची योग्य वेळी मिळालेली मदत उपयोगी पडेल. पैशांची तजवीज होईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील, त्यामुळे त्यांच्या अपेक्षांना पुरे पडताना तुमची कसरत होईल. जुने प्रश्‍न मार्गी लागतील. बदल किंवा बदलीसाठी प्रस्ताव मांडावा, मंजूर होईल. घरात स्वप्ने साकार होतील. मनाप्रमाणे कामे झाल्याने शांतता लाभेल.

तूळ : आर्थिक व्यवहारांना प्राधान्य द्यावे, म्हणजे नवीन वर्षात सुख समाधान लाभेल. व्यवसायात नवीन कामाच्या संधी दृष्टिक्षेपात येतील, त्याचा लाभ घ्यावा. चाकोरीबाहेर जाऊन काम करण्याची खुमखुमी येईल. आर्थिक उन्नतीसाठी कामात बदल केला, तर लाभ होईल. नोकरीत तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळेल. घरात गृहसौख्य उपभोगाल. आवडत्या छंदात वेळ मजेत घालवाल. अपेक्षित बातमी कळेल. उत्साही रहाल.

वृश्‍चिक : घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे तुमची तारेवरची कसरत होईल. व्यवसायात सतर्क राहून चौफेर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. प्रगतीमान चांगले राहील. विचार व कृती यांचा योग्य समन्वय साधावा. नोकरीत जेवढे काम जास्त कराल तेवढ्या वरिष्ठांच्या अपेक्षा वाढतील. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात अचूक निर्णय घ्यावा लागेल. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कार्यवाही करावी लागेल. नातेवाईक, प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.

धनू : शर्यत जिंकल्याचा आनंद व अडथळ्यांवर मात केल्यामुळे निःश्‍वास टाकू शकाल. व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कृती करावी. पैशांच्या व्यवहारात चोख राहावे. नवीन कामे मिळतील. त्यासाठी आवश्‍यक त्या खेळत्या भांडवलाचीही तरतूद होईल. नोकरीत कामाची चांगली संधी चालून येईल, लाभ घ्यावा. हितचिंतकांची मदत मिळेल. त्यांच्या सल्ल्याचा मान राखावा. व्यवसायात चांगली मिळकत होईल. घरात मित्रमंडळी व आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील.

मकर : तुमचे विचार व कल्पना प्रत्यक्षात साकार होण्यास अनुकूल वातावरण लाभेल. व्यवसायात उत्साही राहाल. मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा मानस असेल. कार्य तत्पर राहून नवीन तंत्रज्ञानाचा वापर कामात कराल. नोकरीत हातातील कामे वेळेत बिनचूक पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. वरिष्ठांची मर्जी राहील, त्यामुळे सवलत व अधिकार मिळतील. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. घरात शुभकार्य ठरतील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. वातावरण आनंदी राहील.

कुंभ : ग्रहांची मर्जी असल्याने तुमचा उत्साह वाढेल. व्यवसायात प्रगतीचा टप्पा गाठाल. कामे नजरेच्या टप्प्यात येतील. नवीन उत्पन्नाचे साधन भावी काळात मिळेल. त्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे. नोकरीत कामानिमित्त अधिकार मिळतील. मात्र, त्याचा गैरवापर करू नये. सहकाऱ्यांची अपेक्षित साथ मिळेल. घरात शुभकार्याची नांदी होईल. पाहुण्यांची ये-जा राहील. मनोकामना पूर्ण झाल्याने मानसिक समाधान मिळेल. पैशांची चिंता मिटेल.

मीन : स्पर्धेला तोंड देण्यासाठी तयारी ठेवावी. व्यवसायात आवश्‍यक ते बदल करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करावा. कामात तडजोड व लवचिक धोरणाचा अवलंब करून प्रगती करावी. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. बढतीचे योग येतील. बदल किंवा बदलीची तयारी ठेवावी. घरात वातावरण आनंदी राहील. कुटुंबासोबत प्रवासाचे बेत ठरतील. कौटुंबिक सोहळा साजरा केला जाईल. आप्तेष्टांचा सहवास मिळेल.

संबंधित बातम्या