ग्रहमान : २७ जुलै ते २ ऑगस्ट २०१९

अनिता केळकर
सोमवार, 29 जुलै 2019

ग्रहमान
 

मेष : तुमची मनीषा जागृत होईल व धडाडीने प्रगती कराल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. नवीन गुंतवणुकीचे पर्याय खुले होतील. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत कामाच्या बाबतीत सहकाऱ्यांवर विसंबून राहू नये. विनाकारण कामे लांबतील. बोलताना जरा जपून बोलावे, वादविवाद टाळावेत. घरातील व्यक्तींकडून मोलाचे सहकार्य मिळेल. आनंदाची बातमी कळेल. विद्यार्थ्यांनी अति विश्‍वास टाळावा. तरुणांनी विवाहाची घाई करू नये.

वृषभ : सर्व आघाड्यांवर सतर्क राहून कामे करावीत. प्रतिष्ठेला जपावे. व्यवसायात कामे वेळेत पूर्ण करण्याकडे कल राहील. पैशामुळे बिघडलेले हितसंबंध सुधारण्याची संधी मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांना तुमच्याकडून बरीच अपेक्षा राहील. कामाचा उरक दांडगा असेल. घरात तुमचे विचार इतरांना पटतीलच असे नाही, तरी थोडा वेळ द्यावा. आप्तेष्टांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता मिळेल.

मिथुन : या सप्ताहात टाळता न येणारे खर्च होतील. व्यवसायात कामात तत्पर राहावे. पैशांची 
थोडी तंगी जाणवेल. कामात सहकाऱ्यांवर अति विसंबून राहू नये. रागावर नियंत्रण ठेवावे. नोकरीत, कामात सबुरी ठेवावी. मनाविरुद्ध कामे करावी लागतील. हितशत्रूंपासून सावध राहावे. घरात आपल्या कामात चोख राहावे. तटस्थपणे वागावे. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल.

कर्क : तुमचे मनोबल उत्तम राहील. त्याच्या जोरावर रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. व्यवसायात कामाचे नियोजन करून कामे हाती घ्याल. वसुलीवर लक्ष केंद्रित करून आर्थिक स्थितीत सुधारणा कराल. उधारीपेक्षा रोखीवर जास्त भर द्याल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांच्या दुटप्पी वागण्याचा राग येईल. कामात रस वाटणार नाही. मात्र, अति घाईने कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नये. नोकरीत बदल करण्याचा विचार तूर्तास पुढे ढकलावा. घरात वैचारिक मतभेद झाले, तरी दुर्लक्ष करावे.

सिंह : भोवतालच्या परिस्थितीशी तुम्ही कसे जुळवून घेता यावर तुमचे यश अवलंबून आहे. व्यवसायात हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे लक्ष द्यावे. नवे करारमदार घाईने करू नये. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला अवश्‍य घ्यावा. पैशांचा अपव्यय टाळावा. नोकरीत सहकाऱ्यांपासून चार हात लांब राहणेच बरे. पैशांचा मोह धरू नये. कामानिमित्त प्रवासयोग येतील. घरात शुल्लक कारणावरून वाद होतील, तरी ते वाढवू नये. तडजोडीचे धोरण लाभदायी ठरेल.

कन्या : कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती होईल. कामात उत्साही असाल. व्यवसायात नियमांचे उल्लंघन करून कृती करण्याचा मोह होईल, तरी सावधगिरी बाळगावी. मनावर संयम ठेवावा. जुनी येणी वसूल होतील. अपेक्षित पत्रव्यवहार होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या मनाविरुद्ध काम सोपवतील, परंतु तेही पूर्ण करून तुम्ही कौतुकास पात्र ठराल. नवीन अनुभव येतील. घरात मोठ्या व्यक्तींच्या वागण्याचा त्रास होईल. प्रकृतीचे तंत्रही सांभाळावे लागेल. मनःस्वास्थ्य जपावे.

तूळ : समोर पंचपक्वान्न ठेवूनही घास तोंडात जात नाही, असा अनुभव येईल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. व्यवसायात मनाप्रमाणे काम होत नाही म्हणून नाराज असाल, तरीही जिद्दीने कामे पूर्ण करावीत. ‘प्रयत्नांती परमेश्‍वर’ ही म्हण लक्षात ठेवावी. नोकरीत नवीन कामासाठी तुमची निवड होईल. त्यामुळे जादा जबाबदारी पेलावी लागेल. हितशत्रूंपासून सावध राहावे. घरात सामंजस्याने प्रश्‍नांची उकल करावी. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यास करावा.

वृश्‍चिक :  एकाच वेळी सर्व आघाड्यांवर लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे तुमची दगदग धावपळ होईल. व्यवसायात मुसंडी मारून कामाचा फडशा पाडण्याचा मानस असेल. योग्य व्यक्तींची योग्य वेळी निवड करून कामे सोपवाल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत सहकाऱ्यांकडून कामे करून घेताना जिभेवर साखर पेरावी. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात मुलांच्या व इतर व्यक्तींच्या मागण्या मान्य कराव्या लागतील. छोटीशी सहल ठरवाल.

धनू : ‘रात्र थोडी, सोंगे फार’ अशी तुमची स्थिती असेल. तुमचा कामाचा उत्साह अपूर्व असेल. व्यवसायात बरीच कामे हातावेगळी कराल. कामातील नवीन बेत गुप्त ठेवण्याकडे कल राहील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दक्ष राहाल. अपेक्षित पैसे हाती आल्याने कामांना वेग येईल. नोकरीत ध्येय धोरणे ठरवून कामे हाती घ्याल. अंथरूण पाहून पाय पसरले, तर त्रास होणार नाही. घरात तणाव जाणवेल. प्रियजनांच्या भेटीगाठीचे योग येतील. अनपेक्षित खर्चही वाढेल.

मकर :  कामाचा मनस्वी कंटाळा येईल, त्यामुळे कामे पुढे ढकलण्याकडे कल राहील. व्यवसायात महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. उसने अवसान आणून काही कामे संपवाल. मात्र, कोणताही निर्णय घाईने न घेता, थोडा काळ थांबणेच हिताचे राहील. पैशांचे नियोजन करावे. नोकरीत स्वयंसिद्ध राहावे. गैरसमजुतीने होणारे वाद टाळावे. विचारल्याखेरीज सल्ला देऊ नये. घरात अनपेक्षित चांगली बातमी कळेल. मुलांकडून प्रगती कळेल.

कुंभ : ग्रहमान साथ देईल, त्यामुळे कामातील प्रगतीचा आलेख चढा राहील. व्यवसायात नवीन कामे ओळखीतून मिळतील. कामांना गती येईल. आर्थिक स्थितीही सुधारेल. महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची भिस्त तुमच्यावर राहील. केलेल्या कामाचे कौतुक होईल. घरात मुलांची प्रगती व प्रकृती यांची चिंता मिटेल. आप्तेष्ट भेटतील. प्रकृतीमान सुधारेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा तोल ढळू देऊ नये.

मीन : भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. त्यामुळे व्यक्तींची पारख होईल. व्यवसायात कोणावरही विसंबून न राहणे चांगले. तसेच कामातील सत्यता पडताळून पाहून प्रगती करावी. खोट्या आश्‍वासनांना बळी पडू नये. मोठी गुंतवणूक करताना जरा जपून. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. प्रवासाचे योग येतील, नवीन ओळखी होतील. घरात भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. झेपेल तेवढेच काम करून इतर वेळी विश्रांती घ्यावी.

संबंधित बातम्या