ग्रहमान : ३ ते ९ ऑगस्ट २०१९

अनिता केळकर
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

ग्रहमान
 

मेष : सर्व आघाड्यांवर प्रगतीसाठी तुमचा प्रयत्न असेल. व्यवसायात नवीन कामे हाती येतील. भावनांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्याल. आश्‍वासने देताना जरा जपून. पैशांचा विनियोग योग्य कारणासाठीच करावा. नोकरीत हातातील कामे पूर्ण करावीत, मगच नवीन कामांचा विचार करावा. अनपेक्षित धनलाभाची शक्‍यता. घरात वातावरण चांगले राहील. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल. महिलांना आरोग्यात सुधारणा झाल्याने उत्साह वाटेल.

वृषभ : कर्तव्यदक्ष रहाल. व्यवसायात विस्तार करण्यासाठी कामाच्या पद्धतीत बदल कराल. आधुनिकीकरण करून उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जादा मेहनत घ्यावी लागेल. अवाजवी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागले. कामानिमित्त प्रवासयोग संभवतो. नवीन ओळखी होतील. घरात जुने प्रश्‍न डोके वर काढतील. कौटुंबिक सुखासाठी तडजोड कराल. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीगाठीने आनंद वाटेल.

मिथुन : मनातील गोष्टी प्रत्यक्षात साकार करण्याचा प्रयत्न राहील. कर्तव्यात कसूर झालेली चालणार नाही. व्यवसायात अशक्‍यप्राय काम हाती घेऊन ते पूर्ण कराल. व्यवसायातील परिस्थिती हळूहळू सुधारेल. हितचिंतकांची मदत मिळाल्याने महत्त्वाकांक्षी बेत सफल होतील. नोकरीत मात्र कामात गुप्तता राखावी. तुमच्या योजना व कल्पना इतरांना कळू देऊ नयेत. नवीन नोकरीत वेळेचे गणित पाळावे लागेल. घरात बोलण्यापेक्षा कृतीवर भर राहील. महिलांनाचा आत्मविश्‍वास वाढेल.

कर्क : तुमच्या स्वभावाला पूरक ग्रहमान आहे. व्यवसायात कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती होईल. आवश्‍यक तसे पैसे मिळतील. मात्र, बजेटवर नियंत्रण ठेवावे. उधारीपेक्षा रोखीवर भर द्यावा. नवीन कामे स्वीकारताना कामातील तांत्रिक गोष्टींचा आधी विचार करावा. नोकरीत नको त्या कामात बराच वेळ जाईल. त्यामुळे कामाचा उबग येईल. काम केल्याचे समाधान नसेल. घरात व्यक्तींच्या मागण्या पूरवताना हात सैल सोडावा लागेल. जमाखर्चाचे ताळेबंद ठेवून त्याप्रमाणे नियोजन करावे लागेल.

सिंह : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणाल. व्यवसायात कठीण कामात लक्ष घालून मार्गी लावाल. कामात मध्यस्तांची मदत घेऊन कामांना वेग देण्यात यश येईल. गरजेपुरते पैसे हातात पडल्याने कामांना वेग येईल. नोकरीत उसने अवसान अणून वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. नवीन नोकरीच्या कामात विचारपूर्वक निर्णय घ्यावेत, पण अतिविचारही करू नये. घरात समारंभानिमित्त वातावरण आनंदी असेल. आप्तेष्टांच्या भेटीने आनंद वाढेल. महिलांना कामाला योग्य दिशा मिळेल.

कन्या : कामात मनासारखी प्रगती होत नाही, म्हणून थोडे निराश व्हाल. मात्र, व्यवसायात कामगारांच्या कलाने वागून कामे मार्गी लावलीत, तर आशावाद जागृत होईल. आखलेले बेत मागे पुढे होण्याची शक्‍यता आहे. आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन मगच पुढचे पाऊल टाकावे. नोकरीत कामात बदल होतील. त्यामुळे कामे पूर्ण होण्यास विलंब होईल. जोडव्यवसायातून कमाई करता येईल. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. नवीन खरेदीचा मोह होईल. महिलांचा आवडत्या कामात वेळ जाईल.

तूळ : गृहसौख्याचा आनंद देणारे ग्रहमान आहे. व्यवसायात मोठी उडी मारण्याचा तुमचा इरादा असेल. त्यासाठी खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. कामाचा दर्जा वाढवण्याकडे तुमचा कल राहील. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. परंतु, मनासारखे काम मिळाल्याने कामाचा उत्साह वाढेल. कामामुळे नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात सुखसुविधा वाढवण्यासाठी आवश्‍यक गोष्टींची खरेदी कराल. मुलांच्या प्रगतीबाबत समाधानी राहाल. महिलांना माहेरच्या व्यक्तींचा सहवास लाभेल.

वृश्‍चिक : सर्व स्तरावर चांगले काम करण्याचा तुमचा मानस असेल. त्याला योग्य वातावरणाची साथ लाभेल. व्यवसायात अनेक इच्छा आकांक्षा उफाळून येतील. त्याला अनुकूल वातावरण लाभेल. त्यामुळे नवीन प्रकल्प/योजना प्रत्यक्षात अमलात येतील. पैशांची आवक वाढेल. नोकरीत आवडीचे काम मिळेल. भरपूर काम करण्याची तुमची तयारी असेल. घरात नवीन वाहन किंवा जागा खरेदीबाबत बोलणी होतील. अनपेक्षित चांगली बातमी मन आनंदी करेल. महिलांना सकारात्मक दृष्टिकोन मिळेल.

धनू : राशीस्वामीची गुरूची साथ उत्तम मिळेल. व्यवसायात विस्ताराच्या योजना फलद्रुप होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ होतील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. नवीन नातेसंबंध जोडले जातील. नोकरीत जादा पगारवाढ व सवलती मिळतील. वरिष्ठ व सहकाऱ्यांशी विचार विनिमय करून काही वेगळेच निर्णय घ्याल. त्यात यशप्राप्तीही होईल. घरात विवाह, वास्तुशांत यासारखे शुभप्रसंग ठरतील. तरुणांचे दोनाचे चार हात होतील.

मकर : कामाचा ताण कमी होईल. त्यामुळे सुटकेचा निःश्‍वास टाकाल. व्यवसायात शांत चित्ताने कामे करता येतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन कामे हाती घेता येतील. पैशांची तजवीज होईल. नोकरीत पैशाच्या व्यवहारात व कामात इतरांकडून झालेली हयगय तुम्हाला सहन होणार नाही, तरीही डोके शांत ठेवावे. घरात सांसारिक जीवनात निर्माण झालेल्या प्रश्‍नांवर तोडगा निघेल. अचानक उद्‌भवणाऱ्या खर्चांसाठी थोडी पैशांची तरतूद करावी लागेल. विद्यार्थ्यांना कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल.

कुंभ : व्यवसायात कामात काही करणे अपरिहार्य असेल. पण तो बदल भविष्यात लाभदायी ठरेल. तुमच्या कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या तुम्हाला वेळेत पूर्ण कराव्या लागतील. तुमच्या छोट्या इच्छा-मनीषा सफल होतील. नोकरीत कामाचा तणाव राहील. वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा सवलती देतील. घरात आर्थिकदृष्ट्या खर्च वाढेल. नैतिक जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील. मुलांना अपेक्षित यश मिळेल. महिलांचा घरकामात वेळ जाईल.

मीन : केलेल्या कष्टाचे व श्रमाचे पैशाच्या व इतर मार्गाने चांगले फळ मिळेल. लाभदायक संधी उपलब्ध होतील. नवीन कामातून कमाई होईल. प्रवासयोग संभवतो. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळून येईल. घरात हितशत्रूंच्या असूयेचा अनुभव येईल, तरी डोके शांत ठेवावे. व्यक्तिगत जीवनात आनंद उपभोगाल. बहार येईल. विद्यार्थ्यांना करिअरची चांगली दिशा मिळेल. महिलांची प्रगतीकडे वाटचाल राहील. प्रकृतीची उत्तम साथ मिळेल.

संबंधित बातम्या