ग्रहमान : १० ते १६ ऑगस्ट २०१९

अनिता केळकर
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

ग्रहमान
 

मेष : ग्रहांची साथ२ राहील. चांगले काम करून आपले यश द्विगुणीत करावेसे वाटेल. व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. नवीन योजनांची आणखी कराल. निष्णात व्यक्तीच्या सल्ल्याखेरीज नवीन गुंतवणूक करू नये. नोकरीत वरिष्ठ दिलेले आश्‍वासन पाळतील. सहकारी व वरिष्ठांना तुमच्याकडून बरीच अपेक्षा राहील. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. घरात मतलबापुरती इतर जण खुशामत करतील. मुलांच्या प्रगतीबाबत समाधानी राहाल.

वृषभ : कामात होणारा विलंब व हयगय तुम्हाला सहन होत नाही. त्यामुळे स्वतः लक्ष घालून पूर्णत्वाला कामे नेता, त्याचाच उपयोग होईल. व्यवसायात कामाचा उरक दांडगा राहील. नेहमीच्या कामाबरोबर जादा कमाई करून देणारे काम मिळेल. आवश्‍यक त्या भांडवलाची तरतूदही होईल. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी सोपवतील. नवीन कामामुळे तुमचा उत्साह वाढेल. घरात लांबलेले कार्य निश्‍चित होईल. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढेल.

मिथुन : कामात रस घेऊन कामे कराल. स्फुर्ती वाढवणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात स्वतःची कुवत व तब्येत सांभाळून कामे हाती घ्यावी. महत्त्वाचा निर्णय घेताना त्यातील धोके व अंदाज लक्षात घेऊन घ्यावेत. एखादी खर्चिक योजना प्रत्यक्षात उतरावी लागेल. नोकरीत, कामात चुका होणार नाही याची काळजी घ्यावी. कामातील बेत गुप्त ठेवावे. बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. घरात मुलांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष द्याल. महिलांनी राग डोक्‍यात घालून घेऊ नये.

कर्क : ग्रहांची अनुकूलता तुम्हाला एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवायला उद्युक्त करेल. मात्र, प्रत्यक्षात काम करताना योजल्यापेक्षा काहीतरी वेगळेच घडण्याची शक्‍यता आहे. व्यवसायात कामाचे प्रमाण जास्त व फायद्याचे प्रमाण कमी असेल, तरीही निराश न होता कामे स्वीकारावीत. नोकरीत बदल किंवा बदली हवी असल्यास प्रयत्न करावेत. प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंधी जोडले जातील. घरात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य राहील. महिलांना आवडता छंद जोपासता येईल.

सिंह : तडजोडीचे धोरण स्वीकारून कामात प्रगती साधाल. व्यवसायात आर्थिक ताळेबंद आखून त्याप्रमाणे कामांची आखणी करावी लागेल. केलेल्या कामाचे पैसे हाती येण्यास विलंब होईल. नोकरीत वरिष्ठांच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात. प्रलोभनापासून चार हात लांब राहावे. मनाविरुद्ध वागावे लागले, तरी न चिडता काम करावे. घरातील व्यक्तींकडून गोड बोलून कामे करून घ्यावीत. मनाप्रमाणे गोष्टी घडाव्यात ही महिलांची अपेक्षा काही प्रमाणात यशस्वी होईल.

कन्या : अवघड व अशक्‍य वाटणाऱ्या कामात प्रगती कराल. जिद्द व चिकाटी या गुणांचा उपयोग होईल. व्यवसायात कामातील उलाढाल समसमान राहील. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत नवीन कामे वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. मात्र, त्याचा मोबदला मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला रस वाटणार नाही. कामात शिथिलता येईल. गैरसमजुतीने होणारे घोटाळे टाळावेत. घरात मोठ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. अतिविचार करू नये. विद्यार्थ्यांनी तणाव घेऊ नये.

तूळ : तुमचा दृष्टिकोन भोवतालच्या परिस्थितीनुरुप बदलेल. सर्व आघाड्यांवर सतर्क राहावे लागेल. व्यवसायात प्राप्तीचे प्रमाण कमी होईल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन खेळते भांडवल उभे करावे लागेल. तसेच बॅंका व ओळखीतून तात्पुरते कर्जही घ्यावे लागेल. नोकरीत तुमच्या कामाचे वरिष्ठ व सहकाऱ्यांना महत्त्व वाटणार नाही. कामाच्या स्वरूपात बदल झाल्यामुळे ते नाराज होतील व तुम्हालाही कामाचा आनंद मिळणार नाही. घरात धावपळ वाढेल. महिलांनी मनन चिंतनात वेळ घालवावा.

वृश्‍चिक : या सप्ताहात तुम्ही ठरविलेले उद्दिष्ट पार कराल. कामाचे नियोजन करून वेळेचा सदुपयोग कराल. व्यवसायात हाताखालच्या व्यक्तींकडून मदतीची अपेक्षा करू नये. महत्त्वाचा निर्णय घेताना निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्यावा. नोकरीत जिथे फायदा असेल तेच काम तुम्ही निवडाल. कामाचा आनंद मिळेल. अपेक्षित यशही मिळेल. घरात मुलांकडून चांगली बातमी कळेल. पाहुणे, नातेवाईक यांची सरबराई करण्यात वेळ जाईल. महिलांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कृती करावी.

धनू : कठीण कामातही खंबीरपणे उभे राहून कामे पूर्ण कराल. कामातील अडथळ्यांची शर्यत कमी झाल्याने तुमच्यातील उमेद वाढेल. व्यवसायात दैनंदिन कामात लक्ष केंद्रित कराल. योग्य व्यक्तींशी संपर्क साधून कामे करून घ्याल. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. हितचिंतकांची मदत मिळाल्याने नवे बेत करू शकाल. नोकरीत वरिष्ठ त्यांचा शब्द खरा करतील. सहकारी कामात मदत करतील. बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न केल्यास यश येईल. घरात तुमचा पुढाकार राहील.

मकर : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. मनाप्रमाणे घटना घडल्याने एक प्रकारचा दिलासा मिळेल. व्यवसायात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून कामे हाती घ्याल. अपेक्षित पैसे हाती येतील. जुनी येणी वसुलीवर भर राहील. कामाच्या पद्धतीत बदल करून कायदा मिळवण्याचा विचार राहील. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्‍यता आहे. बदल आनंदाने स्वीकारा, म्हणजे त्रास होणार नाही. नवीन ओळखी होतील. घरात वातावरण चांगले राहील. महिलांना मानसिक शांतता मिळेल.

कुंभ : नको त्या कामात बराच वेळ जाईल. व्यवसायात तुमचा उत्साह वाढेल. ठोस निर्णय घेऊन कामे हाती घ्याल. भविष्यात लाभ घडवून आणणारे काम मिळेल. थोडा धीर धरलात, तर प्रगतीचा मार्ग सुकर होईल. नोकरीत एक संपले, की दुसरे काम पुढे असेल. त्यामुळे धावपळ, दगदग होईल. सहकारी व वरिष्ठही कामात मदत करतील. घरात सर्वांना सांभाळून घ्यावे लागेल. मुलांकडे विशेष लक्ष ठेवावे लागेल. पैशाचे गणित कोलमडेल. खर्च वाढतील. विद्यार्थ्यांनी ताण घेऊन अभ्यास करू नये.

मीन : कामात सुधारणा झाल्याने उमेद वाढेल. ग्रहांची साथही मिळेल. व्यवसायात विनाकारण होणारी धावपळ संपेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. नवीन करार करताना त्यातील काही अटी व शर्तींचा अभ्यास करावा. नोकरीत वरिष्ठांनी दिलेले आश्‍वासन ते पाळतील. मात्र, मिळालेल्या सवलती व अधिकारांचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. घरात प्रिय व्यक्तीच्या सहवासात जीवन फुलून निघेल. गैरसमज कमी होतील. तरुणांनी चंचलता कमी करून काम करावे. महिलांनी ध्येय निश्‍चित करावे.

संबंधित बातम्या