ग्रहमान : १७ ते २३ ऑगस्ट २०१९

अनिता केळकर
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

ग्रहमान
 

मेष : बऱ्याच दिवसांपासूनचे तुमचे स्वप्न साकार होईल. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे हाती येतील. आपल्या मनाप्रमाणे काम करण्याची मुभा मिळेल. आर्थिक स्थितीही सुधारेल. कामानिमित्त प्रवास घडेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळेल. हवी असलेली सुविधा मिळेल. कामात मजाही मिळेल. घरात समारंभानिमित्त पाहुण्यांची ये-जा राहील. आप्तेष्टांचा सहवास लाभेल. महिलांना मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल. 

वृषभ : ग्रहांची अनुकूलता राहील. व्यवसायात स्वतःजवळील कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. मानलेत तर समाधानही मिळेल. पेरल्याखेरीज उगवत नाही हे लक्षात येईल. चांगल्या व्यक्तींच्या संगतीने कामांना हुरूप येईल. पैशांची तजवीजही होईल. नोकरीत वरिष्ठ दिलेली आश्‍वासने पूर्ण करतील. कामाच्या नवीन संधी खुणावतील. मात्र, त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल. घरात प्रियजनांसमवेत वेळ मजेत जाईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल.

मिथुन : तुमच्या हरहुन्नरी स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल. व्यवसायात तुमचे नवीन रूप पुढे येईल. तुमच्यातील विशेष प्रावीण्य व कलागुणांना संधी मिळेल. त्याचा लाभ घ्यावा. पैशांची आवक समाधानकारक असेल. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड करतील. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. मूड बघून तुम्ही तुमच्या मागण्या मान्य करून घ्याव्यात. घरात धार्मिक व इतर शुभकार्ये पार पडतील. तरुणांना मनमानी करावीशी वाटेल. महिलांना मनन व चिंतन करता येईल.

कर्क : तुमच्यातील आत्मविश्‍वासाच्या बळावर तुम्ही कामात प्रगती कराल. व्यवसायात योग्य व्यक्तींची मिळालेली संगत लाभदायी ठरेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत तुमच्यातील गुणांना वाव मिळेल. रेंगाळलेली कामे पुन्हा गती घेतील. पैशांच्या व्यवहारात मात्र गाफील राहू नये. घरात वातावरण आनंदी राहील. जीवनाचा खरा आनंद मिळेल. महिलांची प्रकृतीची तक्रार कमी होईल. चांगल्या घटना घडतील. तरुणांना मनाजोगते करिअर करण्याची संधी मिळेल.

सिंह : नशीब साथ देईल, त्यामुळे तुमचा आशावाद वाढेल. व्यवसायात मनातील कल्पना साकार करण्याचा हेतू साध्य होईल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चौफेर नजर ठेवणे गरजेचे होईल. नोकरीत पूर्वी केलेल्या चांगल्या कामाची पावती मिळेल. वरिष्ठ व सहकारी कौतुक करतील. घरात गृहसजावट, नवीन खरेदीचा आनंद घेता येईल. वातावरण आनंदी राहील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. महिलांना आवडत्या छंदात वेळ घालवता येईल. तरुणांना योग्य संधी मिळेल, त्याचा लाभ घ्यावा.

कन्या : पैशांच्या व्यवहारात तुम्ही चोखंदळ असता. या सप्ताहात तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे अवघड जाईल. काटकसरीचे धोरण बाजूला ठेवावे लागेल. व्यवसायात रेंगाळलेली कामे हाती घेऊन प्राधान्याने पूर्ण करावीत. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत नवीन तंत्रज्ञानामुळे कामाला गती येईल. जुनी वसुली झाल्याने वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. प्रवासयोगही संभवतो. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. घरातील व्यक्तींच्या गरजा पुरवताना पैसे खर्च होतील.

तूळ : तुमचा उत्साही स्वभाव तुमच्यातील उमेद वाढवेल. व्यवसायात हव्या असलेल्या व्यक्तींशी संपर्क होऊन तुमची कामे होतील. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. अनपेक्षित लाभाची शक्‍यता. नोकरीत वरिष्ठांना तुमचे विचार पटतील. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित मदत व मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळेल. योग्य त्या सवलती मिळाल्याने कामाचा भार हलका होईल. घरात जीवनाचा आनंद कुटुंबासमवेत घेण्याचा तुमचा मानस पूर्ण होईल. महिलांना आत्मिक बळ मिळेल.

वृश्‍चिक : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. त्यामुळे कष्टसाध्य यश देणारे ग्रहमान आहे. व्यवसायात किचकट कामात यश मिळेल. तुमच्या श्रमाचे चीज होईल. कामातील अडथळे कमी झाल्याने कामांना वेग येईल. नोकरीत इतरांना न जमलेले काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा सवलती व अधिकारही देतील. घरात शुभकार्ये ठरतील. वातावरण आनंदी राहील. विवाहोत्सुक तरुणांचे विवाह ठरतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. महिलांना कलागुण दाखवण्याची संधी मिळेल.

धनू : आनंद व उत्साह तुमच्यात ओसंडून वाहील. प्रसन्न वातावरणाची साथ मिळेल. मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे. प्रगतीस अनुकूल घटना घडतील. भविष्यात लाभ देणारी कामे मिळतील. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत चांगल्या कामाची पावती मिळेल. शब्द हे शस्त्र आहे, तरी जपून बोलावे. गैरसमजुतीने होणारे वाद टाळावे. एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर राहील. घरात कामात रस वाटेल. सर्वांशी सलोख्याचे संबंध राहतील.

मकर : काळाबरोबर राहण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. व्यवसायात काही अत्यावश्‍यक बदल कराल. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूदही करून ठेवाल. केलेल्या कष्टाचे ताबडतोब जरी फळ मिळाले नाही, तरी भविष्यकाळाची बेगमी होईल. केलेल्या कष्टाचे श्रेय घ्यायला मात्र सर्वजण पुढे येतील. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर असेल. घरात मुलांच्या प्रगतीबाबत चांगली बातमी कळेल. सहलीचे बेत सफल होतील. मनोबल उंचावेल. महिलांना आनंदी वातावरणाने कामाला हुरूप येईल.

कुंभ : कामात धाडसी निर्णय घ्याल. तुमच्या निश्‍चयी स्वभावाचे सर्वजण कौतुक करतील. व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कामाची आखणी कराल. वेळेत कामे संपवण्याचा तुमचा इरादा असेल. नोकरीत कामात पुढाकार घेऊन प्रश्‍नांची उकल कराल. वरिष्ठ व सहकारी यांना तुमची महती कळेल. जुनी येणी वसूल झाल्याने पैशांची चिंता मिटेल. घरात तुम्ही सुचविलेल्या तोडग्याने सर्वांना दिलासा मिळेल. महिलांना जीवनाचा आनंद लुटता येईल.

मीन : आर्थिकदृष्ट्या सक्षम राहाल. त्यामुळे मनाप्रमाणे खर्च करू शकाल. व्यवसायात खेळत्या भांडवलाची सोय झाल्याने तुमच्यात नवचैतन्य निर्माण होईल. कामांना गती येईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत तुमच्या कामाची दखल वरिष्ठ वेळीच घेतील व त्याप्रमाणे बढतीही देतील. अनपेक्षित लाभाची शक्‍यता. घरात तुमचे बेत सफल होण्यात हितचिंतकांची मदत मिळेल. सुसंवाद साधला गेल्याने नवी उमेद जागृत होईल. मुलांना अनपेक्षित यश मिळेल. महिलांना गृहसौख्य उत्तम लाभेल.

संबंधित बातम्या