ग्रहमान : २४ ते ३० ऑगस्ट २०१९

अनिता केळकर
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

ग्रहमान
 

मेष : ग्रहांची अनुकूलता राहील. व्यवसायात कामाची प्रगती समाधानकारक असेल. जुनी, टाळता न येणारी देणी द्यावी लागतील. पैशांची तजवीज होईल. नोकरीत पुढाकार घेऊन कामे कराल. वरिष्ठ तुमच्यावर जादा कामे सोपवतील. कामात फायदा मिळवण्याकडे तुमचा कल राहील. घरात नवीन खरेदीचे योग येतील. मनाप्रमाणे सगळी कामे होतील. मित्रमंडळी, पाहुण्यांची ये-जा राहील. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.

वृषभ : आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ग्रहमान आहे. पैशांच्या कामांना गती मिळाल्याने तुम्ही आनंदी व उत्साही व्हाल. व्यवसायात घवघवीत यश मिळेल. मोठे बेत प्रत्यक्षात साकार करण्याचा तुमचा मानस राहील. नोकरीत तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व वाढेल. 
वरिष्ठ तुमच्यावर जबाबदारीची कामे सोपवतील. सहकारी मदत करतील. प्रतिष्ठा मिळेल. पगार व सवलतींमध्ये वाढ होईल. घरात वातावरण चांगले राहील. चांगली बातमी कळेल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : माणसांची पारख होईल, त्यातून बरेच काही शिकता येईल. व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नात भर टाकता येईल. फायदा मिळवून देणाऱ्या कामांचा प्राधान्याने विचार करून कामे हाती घ्याल. नोकरीत प्रतिस्पर्ध्यांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. घरात महत्त्वाचे निर्णय घ्याल. केलेल्या श्रमाचे चीज होईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल.

कर्क : निराशा झटकून सकारात्मक प्रगती करण्याचा मानस असेल. व्यवसायात मिळालेल्या संधीचा फायदा कसा घ्यायचा याचा विचार करावा. सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करून मगच नवीन कामांकडे लक्ष द्यावे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी. तुमची मागणी मान्य होण्यासाठी हट्ट धरू नये. छोटा प्रवास योग संभवतो. घरात खर्चावर नियंत्रण ठेवून काटकसरीने वागाल, तर लाभ तुमचाच होईल. रागावर नियंत्रण ठेवून सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. तरुणांनी अति धाडस करू नये.

सिंह : जमा खर्च समसमान राहील, त्यामुळे पैशांचा आनंद फार काळ टिकणार नाही. व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल. कामामुळे तुमची बरीच दगदग धावपळ होईल. खेळत्या भांडवलाची तात्पुरती तरतूद करून ठेवाल. नोकरीत वरिष्ठांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. त्यामुळे कितीही काम केले, तरी समाधान मिळणार नाही. घरात मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे जातीने लक्ष द्यावे लागेल. एखादा ठरवलेला कार्यक्रम पुढे ढकलाल. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल.

कन्या : कामाच्या बाबतीत ''धरले तर चावते'' अशी परिस्थिती तुमची असेल. व्यवसायात आश्‍वासन पूर्ण करणे हे एक आव्हान असेल. भांडवलाची गरज वाढल्याने तुमची तारांबळ उडेल. हितचिंतकांची मदत आवश्‍यक वाटल्यास घ्यावी. नोकरीत वरिष्ठांना शब्द देताना जपून द्यावे. आपणहून कुठलीही नवीन जबाबदारी ओढवून घेऊ नये. घरात व्यक्तिगत जीवनात अतिव्यवहाराने वागावे लागेल. कर्तव्यतत्पर राहून कामे करावी लागतील. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

तूळ : जीवनात काहीतरी करावेसे वाटेल, त्यामुळे तुम्ही त्या ध्येयाने पछाडले जाल. व्यवसायात तुमचा मूड बाजूला ठेवून काम करावे लागेल. हातात मिळणाऱ्या पैशांचा काटकसरीने वापर करून प्रगती करावी. नोकरदार व्यक्तींनी वरिष्ठांच्या आज्ञा तंतोतंत पाळाव्या. नवीन नोकरी स्वीकारताना व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावे. घरात गरजांना प्राधान्य देऊन पूर्ण कराव्यात. विनाकारण होणारा खर्च टाळावा. मुलांच्या अवाजवी मागण्या मान्य करू नये. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.

वृश्‍चिक : सप्ताहात तुम्ही तुमच्या पद्धतीने कामे हाताळाल व पूर्ण कराल. त्याचा फायदाही होईल. व्यवसायात कामाचे केलेले नियोजन कमी श्रमात जास्त फळे देईल. हातात पैसे मिळण्यास थोडा विलंब होईल, तरी सबुरीचे धोरण ठेवावे. नोकरीत वरिष्ठांपुढे तुमच्या मागण्या मांडून मान्य करून घ्याल. सहकाऱ्यांची कामात मदत होईल. घरात पाहुण्यांची, नातेवाइकांची ये-जा राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल. छोट्या सहलीचे बेत ठरतील. तरुणांनी मात्र नवीन प्रयोग करू नयेत.

धनू : कामाचा मनस्वी कंटाळा येईल, त्यामुळे कौटुंबिक सहल काढाल. व्यवसायात कामाचा सतत जाणवणारा ताण थोडा कमी होईल. कामाच्या वेळी काम करून इतर वेळी आराम कराल. कामे पूर्ण करताना वेळेचे बंधन पाळाल. कितीही पैसे मिळाले, तरी अपुरेच वाटतील. नोकरीत मिळणाऱ्या सुविधांचा फायदा घ्यायचा विचार राहील. मनाप्रमाणे कामे होतील. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. घरात शुभकार्ये ठरतील. उत्साह वाढेल. मुलांकडून चांगली बातमी कळले.

मकर : कामाच्या बाबतीत हयगय झालेली तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे कार्यपूर्तीसाठी तुम्ही तत्पर राहाल. व्यवसायात आखलेले गणित थोडे पुढेमागे होण्याची शक्‍यता आहे, तरी रागावू नये. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. धोके न पत्करता नवीन बेत साकार करण्याचे विचार घोळतील. नोकरीत हातातील काम वेळेत पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ तगादा लावतील. हितचिंतकांची मदत होईल. घरात तुमचे विचार तुम्ही इतरांवर लादाल. मुलांच्याकडून चांगली बातमी कळेल.

कुंभ : कामाचा तणाव वाढला, तरी तुम्ही मात्र मनाप्रमाणे काम करण्याचा आनंद घ्याल. व्यवसायात तुमच्या मुडी स्वभावामुळे केलेल्या कष्टावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी. कमी श्रमात जास्त कमाई करण्यावर भर राहील. पैशांची ऊबही मिळेल. नोकरीत तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व कळून येईल. त्यामुळे तुमचे वरिष्ठ व सहकारी बडदास्त ठेवतील. घरात शुभसमारंभांची नांदी होईल. वातावरण चांगले राहील. आरोग्य सुधारेल.

मीन : कल्पना व विचार यांचा मेळ बसवून प्रत्यक्षात कृती घडवून आणण्यात यश येईल. नेहमीच्या जबाबदाऱ्या व कर्तव्यपूर्ती यथायोग्य कराल. व्यवसायात कार्यक्षमता वाढवून वातावरण आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न राहील. नशीब साथ देईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत चांगल्या संधीसाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. हितशत्रूंपासून सावध राहावे. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. घरातील कार्यक्रम, पाहुण्यांची सरबराई यात वेळ जाईल. छोटा प्रवास कराल. नवीन खरेदीचा आनंद लुटाल.

संबंधित बातम्या