ग्रहमान : ८ ते १४ सप्टेंबर २०१९

अनिता केळकर
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

ग्रहमान
 

मेष : ग्रहमान अनुकूल आहे, त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. व्यवसायात आवश्‍यक ते बदल करून भरपूर कमाई करावीशी वाटेल. खेळत्या भांडवलाची मदत मिळेल. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. वरिष्ठांनी दिलेल्या सुखसुविधांचा भरपूर आस्वाद घ्याल. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. प्रवास योग संभवतो. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. तरुणांना मनपसंद जोडीदार भेटेल. महिला प्रत्यक्षात न उतरणाऱ्या एखाद्या स्वप्नात दंग राहतील. मुलांना अपेक्षित यश मिळेल.

वृषभ : स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क राहावे. व्यवसायात काही कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्यावीत. पूर्वी जे काम केले होते, त्यातून पैसे हाती पडल्याने चिंता नसेल. नवीन कामेही मिळतील. नोकरीत वरिष्ठांना ज्याची गरज आहे तेवढेच काम करून इतर गोष्टी तुम्ही कौशल्याने टाळाल. सहकारी कामात मदत करतील. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. पण त्यामध्ये आनंद व हौसेला महत्त्व असल्याने वाईट वाटणार नाही. कामातील बेत गुप्त ठेवावेत. नातेवाइकांपासून चार हात लांब राहावे.

मिथुन : पैशांची ऊब नसल्याने जीवनाचा आस्वाद घेण्याची तुमची इच्छा व प्रयत्न यांना खीळ बसेल. थोडा धीर धरलात, तर मजा चाखता येईल. व्यवसायात पूर्वी झालेल्या व्यवहारातून पैशांचा ओघ चालू राहील. कामानिमित्त परदेशगमनाचा योग येईल. नोकरीत वरिष्ठांच्या शब्दाला मान द्याल. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामांची जरा चालढकल कराल. घरात गृहसजावटीवर खर्च होईल. छोटा प्रवास घडेल. दगदग धावपळ वाढेल, तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी. महिलांनी स्वतःचा छंद जोपासावा.

कर्क : नेहमीच्या कामापेक्षा वेगळे काही करण्यात तुम्हाला रस वाटेल. व्यवसायात कामातून होणारी प्राप्ती समाधानकारक राहील. जोडव्यवसायातून जादा काम करून जादा कमाई करता येईल. नोकरीत मनाप्रमाणे काम मिळाल्याने त्यात आवडीने लक्ष द्याल. कामाचे कौतुक सर्वजण करतील. घरात आवडत्या व्यक्तींची ये-जा असल्याने मनोरंजनाचे बेत ठरतील. नवीन जागा वाहन खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील. महिलांना मानसिक स्वास्थ्य लाभेल.

सिंह : कधी शक्ती तर कधी युक्तीचा उपयोग करून कामात चांगले परिणाम साध्य करू शकाल. यश संपादन केल्यामुळे आनंद द्विगुणीत होईल. व्यवसायात कामाचे नियोजन करून महत्त्वाच्या कामात लक्ष घालावे. आळस झटकून हातातील संधीचा लाभ घ्यावा. नोकरीत वरिष्ठांकडून आवश्‍यक तेवढे प्रोत्साहन लाभेल. जादा कामासाठी वरिष्ठ जादा सवलती देतील ही अपेक्षा ठेवू नये. नवीन नोकरीच्या प्रयत्नात कसूर करू नये. खर्चावर बंधन ठेवणे आवश्‍यक राहील. महिलांनी मनावर संयम ठेवावा.

कन्या : स्वतःच्या कार्यक्षेत्रात काम करण्याचा आनंद मिळेल. व्यवसायात हातातोंडाशी आलेल्या कामांना गती द्यावी लागेल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी भांडवलाची तरतूद करून ठेवावी. ओळखीचा उपयोग याकामी होईल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्याने कामाचा ताण वाढेल. नवीन नोकरीची चांगली संधी दृष्टिक्षेपात येईल. कामानिमित्त प्रवास योग संभवतो. घरात पैशांचे गणित मागेपुढे होईल. त्यामुळे आखलेले बजेट कोलमडेल. महिलांचे मनोबल उत्तम राहील.

तूळ : ग्रहमानाची साथ राहील. व्यवसायात नवीन उपक्रमांची अंमलबजावणी कराल. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी थोडी कसरत करावी लागेल. पण त्यात यश येईल. नोकरीत कामानिमित्त प्रवास करावा लागेल. परदेश व्यवहारांना चालना मिळेल. पगारवाढ व अधिकार वाढ होईल. घरात कामांना योग्य दिशा मिळेल. केलेल्या श्रमाचे चीज होईल. तरुणांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जाण्यास अनुकूल कालावधी आहे.

वृश्‍चिक : घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष राहील. थोडी मौजमजा करून मग कामाला लागाल. व्यवसायात प्रगतीचा वेग वाढेल. हितचिंतक व बॅंका यांच्याकडून भांडवलाची गरज भागेल. सहकारी कामात हवी तशी मदत करतील. नोकरीत अवघड काम तुमच्यावर सोपवले जाईल. त्यासाठी आवश्‍यक ती मदत सहकारी व वरिष्ठ करतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. घरात आप्तेष्ट, नातेवाईक यांची ये-जा राहील. जुनी जागा, प्रॉपर्टी यासंबंधीच्या प्रश्‍नात ठोस निर्णय होईल. महिलांना कामाची दिशा मिळेल.

धनू : ग्रहांची अनुकूलता तुम्हाला कार्यरत ठेवेल. कामात आणखी वाढ कशी होईल, याचाच सतत विचार कराल. त्यासाठी नवीन विचार व कार्यपद्धती यांचा अवलंबही कराल. व्यवसायात प्रगतीचे चांगले संकेत मिळतील. नोकरीत कामातील शिथिलता जाऊन तुम्ही पुन्हा एकदा सक्रिय व्हाल. घरात आवडत्या व नवीन व्यक्तीच्या सहवासामुळे व्यक्तिगत जीवन फुलून उठेल. दीर्घकाळाची एखादी मनोकामना पूर्ण होईल. वृद्ध व्यक्तींना दूरच्या व्यक्तींशी भेटण्याचा योग येईल. महिलांना स्वच्छंद जीवन जगात येईल.

मकर : नशिबाची साथ मिळेल. अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्‍य होतील. त्यामुळे तुम्ही उत्साही असाल. व्यवसायात पूर्वी केलेल्या श्रमातून व ओळखीतून काहीतरी चांगले निष्पन्न होण्याची शक्‍यता आहे. कमी श्रमात चांगले यश मिळेल. केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांना चांगली संधी लाभेल. सध्याच्या नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. घरात सांसारिक सुख व सौख्याचा आस्वाद घ्याल. तरुणांचे विवाह ठरतील. महिलांना कौशल्य दाखवता येईल.

कुंभ : सहज वाटणाऱ्या कामात अथक परिश्रम घ्यावे लागतील. पण केलेले कष्ट वाया जाणार नाहीत. व्यवसायात ओळखीतून कामांना गती येईल. जे काम मिळेल ते स्वीकारून पुढे जावे. म्हणजे आर्थिक ओढाताण कमी होईल. नोकरीत हाताखालच्या व्यक्तींकडून गोडी गुलाबीने काम करून घेणेच चांगले. घरात बऱ्याच कालावधीनंतर एखाद्या मित्राशी, नातेवाइकांशी संपर्क होईल. वातावरणातील बदलामुळे उत्साह व महत्त्वाकांक्षा जागृत होईल. महिलांना अपेक्षित कार्यसिद्धी होईल.

मीन : अति उत्साहाच्या भरात कामे अर्धवट सोडू नयेत. व्यवसायात कळतनकळत ज्या कामांकडे दुर्लक्ष झाले होते, त्यात लक्ष घालाल. मात्र, त्याला फारसा चांगला प्रतिसाद न मिळाल्याने तुम्ही निराश व्हाल. व्यवसायात आर्थिक कुवत ओळखून पुढे जावे. नोकरीत कामाचा आळस वरिष्ठांना जाणवणार नाही याची काळजी घ्यावी. घरात खर्च वाढतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. तरुणांनी संयम ठेवणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या