ग्रहमान : १४ ते २० सप्टेंबर २०१९

अनिता केळकर
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

ग्रहमान
 

मेष : तुमची दृष्टी अधिक विशाल व आशावादी होण्यास योग्य काळ आहे. तुमच्या वृत्तीला पूरक वातावरणाची साथ राहील. व्यवसायात नवीन पद्धतीचा अवलंब कराल. नवीन कामे आकर्षित करतील. योग्य व्यक्तींची मिळालेली संगत लाभ घडवून आणेल. नोकरीत वेगळ्या कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. प्रवासाचे योग येतील. घरात विचारांची तफावत जाणवेल. नवीन वस्तू खरेदीचा मोह होईल. नवीन कार्यात प्रगतीमान चांगले राहील. एखादी सुखद घटना तुमचा उत्साह वाढवेल.

वृषभ : विचार व कृती यांचा योग्य समन्वय साधून प्रगती होईल. भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येईल. व्यवसायात परिस्थितीप्रमाणे कामातील धोरण बदलावे लागेल. बोलताना तोलून मापून बोलावे, म्हणजे त्रास होणार नाही. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेखेरीज कोणतेही निर्णय घेऊ नयेत. गृहीत धरून कामे करणे अंगलट येईल. घरात मोठ्यांच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल, तरी डोके शांत ठेवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी.

मिथुन : तुम्ही सतत नावीन्याच्या शोधात असता, त्यामुळे नित्यजीवनात बदल घडल्याखेरीज तुम्हाला चैन पडत नाही. या स्वभावाला पूरक वातावरण मिळेल. व्यवसायात चांगला बदल घडल्याने तुम्ही खूश असाल. कार्यपद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उलाढाल वाढवण्याचे स्वप्न साकार होईल. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत कधी शक्‍तीने, तर कधी युक्तीने कामे पार पाडाल. जोडव्यवसायातून विशेष लाभ संभवतो. घरात आनंदाचे क्षण उपभोगाल.

कर्क : इच्छा तेथे मार्ग हे लक्षात ठेवावे. सकारात्मक दृष्टिकोन कामात उपयोगी पडेल. व्यवसायात सर्व आघाड्यांवर सतर्क राहावे लागेल. पैशांची चणचण भासेल. त्यामुळे त्यावर तात्पुरती खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. हातातील कामे आधी संपवून मगच नवीन कामांकडे लक्ष द्यावे. नोकरीत वरिष्ठ सहकारी यांची मदत मिळेल, ही अपेक्षा ठेवू नये. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा कोणी घेणार नाही याची काळजी घ्यावी. घरात खर्च वाढेल. वादाचे प्रसंग येतील, तरी मनावर संयम ठेवावा.

सिंह : बराच काळ पैशांअभावी रेंगाळलेली कामे हाती घ्याल. कामांना गती देण्यासाठी कामाचा झपाटा वाढवाल. व्यवसायात अडथळे दूर होतील. नवीन कामाची संधी दृष्टिक्षेपात येईल. मात्र, ती स्वीकारताना त्यातील धोक्‍यांचा आधी विचार करावा. नोकरीत तुमच्या गुणांचे कौतुक होईल. बढती, पगारवाढ होण्याची शक्‍यता. बेकारांना नव्या नोकरीची संधी मिळेल. कामाच्या प्रमाणात यश मिळेल. घरात ठरलेले कार्यक्रम पार पडतील. करमणुकीत वेळ मजेत जाईल.

कन्या : जमा खर्चाचा मेळ आखून त्याप्रमाणे कृती करावी. व्यवसायात जे खर्च अत्यावश्‍यक आहेत, तेवढेच करावे. प्रगतीला पोषक ग्रहमान लाभेल. एखादी लाभदायक संधी चालून येईल. बोलण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. त्यासाठी जादा सवलती व अधिकार देतील. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. देणीघेणी, इतर खर्च यांमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. जुन्या वादावर पडदा पडेल. महिलांनी दगदग, धावपळ कमी करावी.

तूळ : ग्रहांची मर्जी तुमच्यावर राहिल्याने केलेल्या कष्टाचे श्रेय मिळेल. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात नवीन संधीचा पाठपुरावा करावा. कामातील त्रुटी कमी करून कामात बदल करण्याचा विचार राहील. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. कामाच्या वेळी काम करून इतर वेळी विश्रांती घ्याल. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात वातावरण चांगले राहील. अपेक्षित पत्रव्यवहारांना गती मिळेल.

वृश्‍चिक : काम व कर्तव्य यांची गल्लत करू नये. व्यवसायात हातातील कामे वेळेत संपवावीत, मगच नवीन कामांकडे लक्ष द्यावे. हितचिंतकांची मदत महत्त्वाची ठरेल. पैशांची तजवीज होईल. नोकरीत वरिष्ठांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. त्यातील काही अपेक्षांकडे कानाडोळा कराल. तुम्हाला पटेल तेच कराल. घरात दैनंदिन जीवनात थोडासा विरंगुळा मिळेल. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल. महिलांना मनातील बेत प्रत्यक्षात साकार करता येईल.

धनू : निर्भय स्वभावाचा तुम्हाला लाभ होईल. व्यवसायात महत्त्वाच्या कामांत मध्यस्थ व प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घेऊन कामे कराल. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. छोटा प्रवास घडेल. पैशांची स्थिती जुनी येणी वसूल झाल्याने सुधारेल. मनाप्रमाणे कामे झाल्याने कामाचा आनंद मिळेल. परदेशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. नोकरीत कामात बिनचूक राहून मगच वरिष्ठांपुढे ते मांडावे. वेळेचे व पैशांचे गणित यांची सांगड घालून कामाचे नियोजन करावे. पैशांच्या प्रलोभनांपासून दूर राहावे.

मकर : आशावादी दृष्टिकोन तुम्हाला पुढे प्रगतीला प्रवृत्त करेल. व्यवसायात खेळत्या भांडवलाची सोय झाल्याने कामे मार्गी लागतील. कामात हितचिंतकांची मदत होईल. नोकरीत कुणाशीही वाद न घालता तुम्ही तुमचे काम तुमच्या पद्धतीने सुरू ठेवावे. स्वतःच्या मनाचा कौल अजमावून त्याप्रमाणे कृती करावी. घरात आपल्या व्यक्तींची साथ मिळेल. थोडेसे स्वास्थ्य अनुभवण्याचा मानस सफल होईल. पैशांची चिंता मिटेल. मुलांकडून उत्तम यश मिळेल. प्रकृतीमान सुधारेल.

कुंभ : ताणतणाव कमी करण्याचा विशेष प्रयत्न राहील. त्याला योग्य व्यक्तींची साथ मिळेल. त्यामुळे तुमची उमेद वाढेल. व्यवसायात ''शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ'' या म्हणीची आठवण ठेवावी. कामाची आखणी स्वतःची शारीरिक व आर्थिक क्षमता ओळखून करावी. अनपेक्षित खर्चांची तरतूद करून ठेवावी. नोकरीत दुसऱ्यांवर दोषारोप करण्यापूर्वी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आळस झटकून हातातील कामे वेळेत संपवण्याचा प्रयत्न करावा. घरात दुरुस्ती, डागडुजी यावर पैसे खर्च होतील.

मीन : चंचलता कमी करून हातातील कामे संपवावी, मगच नवीन कामांकडे वळावे. कामाचा कंटाळा येण्याची शक्‍यता आहे. व्यवसायात तांत्रिक अडीअडचणींमुळे वेळेचे व पैशांचे गणित कोलमडेल. नको त्या कामात बराच वेळ जाईल. पैशांची चणचण भासेल. त्यावर तात्पुरता उपाय म्हणजे ओळखीतून भांडवलाची सोय होईल. नोकरीत तुमच्या उत्साहाला कोणीतरी प्रोत्साहन द्यावे असे वाटेल. पण वरिष्ठ दिलेले आश्‍वासन पाळणार नाहीत, त्यामुळे तुमची चिडचिड होईल. डोके शांत ठेवावे.

संबंधित बातम्या