ग्रहमान : २१ ते २७ सप्टेंबर २०१९

अनिता केळकर
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

ग्रहमान
 

मेष : ग्रहांची मर्जी हळूहळू सुधारत आहे, त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात कामे करण्यास सज्ज व्हाल. व्यवसायात योग्य निर्णय व कृतीची सांगड घालून प्रगती कराल. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. नोकरीत छोटीशी सहल ठरेल. सहकाऱ्यांच्या मदतीने हातातील कामे संपवू शकाल. तणाव कमी झाल्याने हायसे वाटेल. घरात टाळता न येणारे खर्च होतील. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. महिलांना मनःशांती मिळेल.

वृषभ : तुमची कृतिशीलता वाढवणारे ग्रहमान आहे. व्यवसायात पैशांच्या कामांना प्राधान्य द्याल. कामातील अडचणी, अडथळे कमी होतील. नवीन योजना, कामे दृष्टिक्षेपात असतील. नोकरीत कामाचे योग्य नियोजन करून कामात गुप्तता पाळणे गरजेचे आहे. वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे धावपळ होईल. तूर्तास नवीन नोकरीच्या कामात पडू नये. घरात वातावरण चांगले राहील. केलेल्या कामाचे कौतुक होईल. महिलांना मनाजोगते वागता येईल. चांगली बातमी कळेल.

मिथुन : सकारात्मक दृष्टिकोन राहील, त्यामुळे प्रगतीला पूरक वातावरण मिळेल. व्यवसायात योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. देणी वेळेत द्यायचा प्रयत्न करावा. सामंजस्याने प्रश्‍नांची उकल करता आल्याने गैरसमज टळतील. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्याल. केलेल्या कामाबाबत चर्चा अथवा मतप्रदर्शन न करणेच चांगले राहील. घरात कर्तव्य व सुखसोयींसाठी खर्च कराल. महिलांनी सजगवृत्ती ठेवून वागावे.

कर्क : तुमच्यातील उत्साह व जोश वाखाणण्याजोगा राहील. नवीन आशावादी दृष्टी राहील. व्यवसायात दूरदर्शीपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. नोकरीत जादा कामाची तयारी असेल, तर जादा कमाई करता येईल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. घरात पैशांचे हिशोब चोख ठेवावे, नाहीतर गैरसमज निर्माण होतील. महिलांनी कृतीवर भर द्यावा.

सिंह : जीवनाला नवीन कलाटणी देणारे ग्रहमान लाभले आहे. योग्य परिस्थितीनुरूप निर्णय घेऊन मार्गक्रमण कराल. व्यवसायात कामात यश मिळवण्याची मनीषा सफल होईल. स्वतःची आर्थिक व शारीरिक कुवत ओळखून मगच कामात उडी मारावी. जुन्या हितसंबंधांबरोबर नवीन हितसंबंधही जोडले जातील. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षांना पुरे पडणे कठीण जाईल. कामाचा उरक चांगला राहील. पैशांची आवक चांगली राहील. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. आप्तेष्टांचा सहवास लाभेल.

कन्या : घरगुती गोष्टींना या सप्ताहात प्राधान्य द्यावे लागेल. काही ठोस निर्णय घेऊन त्याप्रमाणे केलेली कृती भविष्यात लाभदायी ठरेल. व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल. त्यामानाने कष्टाचे प्रमाण कमी पडेल. विलंबाने कामे पूर्ण होतील. आधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञान वापरण्याचे विचार मनात येतील. परंतु, घाई करू नये. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होईल. दगदग धावपळ वाढेल. सहकाऱ्यांवर अतिविश्‍वास ठेवू नये. घरात मोठ्यांच्या प्रकृतीचे तंत्र सांभाळावे. कलावंत, खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात उत्तम संधी मिळेल.

तूळ : तुमचा आशावादी दृष्टिकोन तुम्हाला लाभदायी ठरेल. कामाचे व वेळेचे केलेले अचूक नियोजन उपयोगी पडेल. ध्येयपूर्तीसाठी कार्यात मग्न राहाल. पैशांचीही तजवीज होईल. व्यवसायात मोठी झेप घ्यावीशी वाटेल. मात्र, अंथरूण पाहून पाय पसरावे. नोकरीत इतरांना न जमलेले काम साध्य करून दाखवाल. स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याची संधी मिळेल. घरात नवीन खरेदी कराल. कुटुंबासमवेत घालवलेले क्षण आनंद देतील. प्रकृतीची साथ मिळेल.

वृश्‍चिक : मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागल्या, तरी चिडचिड करू नये. व्यवसायात सतर्क राहून योग्य ते बदल करावे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागेल. पैशांची चणचण भासेल. नोकरीत भोवतालच्या व्यक्तींकडून खुबीने काम करून घ्यावे. तुमचे कौशल्य दाखवण्याची मिळणारी संधी सोडू नये, तिचा लाभ घ्यावा. घरात दोन पिढीतील वैचारिक तफावत जाणवेल, तरी डोके शांत ठेवावे. ऐकीव गोष्टींवर विश्‍वास न ठेवता, शहानिशा करून गैरसमजुतीने होणारे घोटाळे टाळावे.

धनू : तुमच्या स्वच्छंदीप्रिय स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या सुखासाठी काही खास बेत आखाल. व्यवसायात प्रगतीचे प्रमाण चांगले राहील. खेळत्या भांडवलाची सोयही होईल. नोकरीत कामात आलेली शिथिलता घालवण्यासाठी ठोस पावले उचलाल. कामाचा ताण कमी करण्यासाठी वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत घ्याल. कामानिमित्त लांबचा प्रवास घडेल. घरात गृहसजावट, दुरुस्ती यांमध्ये खर्च होईल. महिलांचा विश्रांती घेण्याकडे कल राहील.

मकर : नेहमीच्या स्वभावाला झुगारून जीवनाचा आनंद घ्याल. भविष्याचा फारसा विचार न करता पैसे खर्च कराल. व्यवसायात नवीन कामे मिळवण्यासाठी विशेष लक्ष द्याल. व्यवसायात तुमचे स्थान उच्च राहील. आर्थिक स्रोतही चांगला राहील. नोकरीत नवीन कल्पनांचा विचार कामाचा दर्जा वाढवण्यासाठी कराल. सहकाऱ्यांचा वापर खुबीने करून प्रगती कराल. वेळेत कामे संपवून वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. घरातील समारंभात सहभागी व्हाल. चांगली बातमी मन प्रसन्न करेल.

कुंभ : पैशांचे गणित बिनसले, की तुम्ही अस्वस्थ होता, त्यामुळे एकटेपणा तुम्हाला भावतो. व्यवसायात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कृती करावी. कमी श्रमात जास्त यश मिळेल. तुमचे अचूक अंदाज कामाची पूर्तता करताना उपयोगी पडतील. नोकरीत सहकाऱ्यांकडून गोड बोलून कामे करून घ्याल. अनावश्‍यक खर्चाला फाटे द्याल. घरात मौजमजा करण्यासाठी मनपसंत व्यक्तींची साथ ठेवाल. तुमच्या विनोदी बुद्धीने व वाक्‌चातुर्याने भोवतालच्या व्यक्तींना खूश ठेवाल.

मीन : सध्या तुमची द्विधा मनःस्थिती झालेली आहे, तरी थोडी सबुरी ठेवावी. व्यवसायात काही कारणाने बेत बदलावे लागतील. आवश्‍यक तेवढीच कामे करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवावीत. पैशांचा अपव्यय टाळावा. नोकरीत वरिष्ठांना खूश ठेवणे हेच तुमचे ध्येय राहील. जास्तीत जास्त फायदा त्यांच्याकडून घेता येईल याचा प्रयत्न करावा. कामात गुप्तता राखावी. घरात कुटुंबासमवेत छोटीशी सहल काढाल. नवीन जागा, वास्तू, वाहन खरेदीस उत्तम काळ. तरुणांनी अतिसाहस करू नये.

संबंधित बातम्या