ग्रहमान : २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०१९

अनिता केळकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

ग्रहमान
 

मेष : पैशांची स्थिती सुधारल्याने मनःशांती लाभेल. जीवनाचा स्वतः उपभोग घ्याल व इतरांनाही त्यात सहभागी करून घ्याल. व्यवसायात नेहमीच्या कामाव्यतिरिक्त नवीन कामे हाती घ्याल. नवीन कामामुळे तुमचा उत्साह वाढेल. नोकरीत तुमच्या कामाने तुम्ही स्वतःचे वेगळेपण सिद्ध कराल. सहकारी कामात मदत करतील. घरात इतरांच्या सुखसमाधानासाठी वेळ व पैसे खर्च कराल. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. तरुणांना विवाह बंधनात अडकावेसे वाटेल.

वृषभ : भावनेला महत्त्व देऊन घरातील व संपर्कातील येणाऱ्या व्यक्तींच्या मनाचा विचार कराल. व्यवसायात तुमचे अंदाज अचूक आल्याने उलाढाल वाढेल. जादा कामासाठी भांडवल व कर्ज उभारणी करावी लागेल. कामात रस घ्याल. नोकरीत केलेल्या श्रमाचे चीज होईल. जोडव्यवसायातून विशेष कमाई होईल. कामानिमित्त प्रवास योग येतील. घरात नवीन खरेदीचे योग येतील. वातावरण आनंदी राहील. महिलांना गृहसौख्य उपभोगता येईल.

मिथुन : कामात वेळेचे महत्त्व सांभाळून दिनचर्या ठरवावी. आजचे काम आजच पूर्ण करावे. व्यवसायात विस्तार करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी कधी शक्ती, तर कधी युक्तीचा उपयोग कराल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उलाढाल वाढवाल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. स्वतःचे म्हणणे इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या कौशल्याचा फायदा व्हावा. घरात कुटुंबाला वेळ द्याल व प्रवास ठरवाल. चांगल्या कामाची सुरुवात होईल.

कर्क : तत्त्वाला मुरड घालून भोवतालच्या वातावरणाशी मिळते जुळते घेण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन राहील. उधारी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल, त्यामुळे कामे पुढे ढकलण्याकडे कल राहील. विश्रांती घ्यावीशी वाटेल. घरात आप्तेष्ट नातेवाईक यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. छोटीशी सहल तुम्हाला ताजेतवाने करेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांचे विवाह ठरतील.

सिंह : निश्‍चयाच्या बळावर यशश्री खेचून आणाल. व्यवसायात ऐकावे जनाचे, करावे मनाचे असा तुमचा पवित्रा असेल. कामात तुम्हाला जो योग्य निर्णय वाटतो तोच तुम्ही घ्याल. कुणावरही विसंबून राहू नये. नाहीतर तुमचीच धावपळ होईल. नोकरीत हातातील कामांवर लक्ष केंद्रित करून संपवावे. मगच नवीन कामांकडे वळावे. ऐकीव गोष्टींवर विश्‍वास न ठेवता त्याची खातरजमा करून मगच मत द्यावे. घरात वातावरण हळूहळू निवळेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल.

कन्या : व्यवसायात जमाखर्च समसमान राहतील. त्यामुळे जे पैसे मिळतील ते देणी देण्यात गेल्याने हातात शिल्लक राहणार नाही. कामातील प्रगती मंदावल्यासारखी वाटेल. प्रत्यक्षात प्रगती समाधानकारक असेल. कामाचे योग्य नियोजन व गुप्तता राखून कामे करावीत. नवीन कामे मिळवताना स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. नोकरीत वरिष्ठांनी दिलेले आश्‍वासन ते पाळतील. आवश्‍यक असेल, तर कामात मदतही करतील. घरात आवडत्या व्यक्तींचा सहवास मिळेल.

तूळ : कर्तृत्वाला झळाळी देणारे ग्रहमान लाभत आहे, तरी लाभ घ्यावा. व्यवसायात आर्थिक नियोजन निष्णात व्यक्तीच्या सल्ल्याने करून प्रगती करावी. कामातील तांत्रिक अडथळे दूर होतील. नवीन कामांमुळे महत्त्वाकांक्षा वाढेल. नोकरीत कामात लवचीक धोरण उपयोगी पडेल. कामांवर मात्र योग्य नियंत्रण हवे. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. आशावादी राहाल. त्यामुळे हातून भरपूर काम होईल. घरात वातावरण खेळीमेळीचे राहील. आनंदाचे क्षण कुटुंबासमवेत उपभोगाल.

वृश्‍चिक : सध्या तुमच्या प्रगतीचा वेग वाढणार आहे, त्यामुळे आनंदी राहाल. व्यवसायात खूप प्रयत्न करूनही न झालेल्या कामात आता सुधारणा दिसू लागेल. कामाचा फडशा पाडण्यावर तुमचा कल असेल. नवीन कामे मिळतील. कामाचे स्वरूप निश्‍चित ठरेल. खेळत्या भांडवलाची सोय मात्र करावी लागेल. नोकरीत वरिष्ठ तुमची अडचण समजून घेतील व त्यानुसार उपाययोजनाही करतील. नवीन नोकरीच्या कामात आश्‍वासन मिळेल. घरात वादाच्या मुद्द्यांवर पडदा पडेल.

धनू : मनात बऱ्याच काळ तरळत असलेल्या कल्पना प्रत्यक्षात साकार होतील. व्यवसायात कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करावा लागेल. विचारातही बदल करणे गरजेचे होईल. पैशांची मोठ्या प्रमाणात तजवीज करावी लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळून कामे उरकावीत. मागण्या मान्य करून घ्याव्यात. जोड व्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात चांगली बातमी कळेल. आनंदाचे क्षण उपभोगाल. तरुणांचे विवाह ठरतील.

मकर : तुमचा स्वभाव अत्यंत धोरणी असतो, त्याचा फायदा होईल. अंदाज घेऊन मार्गक्रमण कराल. व्यवसायात उलाढाल व फायद्याचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहील. कामात गुप्तता राखलीत, तर ईप्सित साध्य होईल. पैशांच्या वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत कामात चित्त स्थिर ठेवावे. कमी बोलून कृतीवर भर द्यावा. तुमचे महत्त्व इतरांना कळून येईल. घरात कुटुंबासमवेत विरंगुळा लाभेल. प्रकृतीचे तंत्रही थोडे सांभाळावे लागेल. मुलांकडून अपेक्षित यश मिळेल.

कुंभ : ग्रहांची उत्तम साथ मिळेल. कामांना वेग येईल. त्यामुळे प्रवाहाविरुद्ध जाऊन काहीतरी धाडस करावेसे वाटेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती आल्याने पैशांची स्थिती सुधारेल. कामाच्या पद्धतीत बदल करून नवीन काहीतरी कराल. नोकरीत अपेक्षित सवलती व सुविधा मिळतील. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. प्रवास घडेल. घरात प्रतिष्ठा वाढवणारी खरेदी होईल. चांगली बातमी कळेल.

मीन : प्रगतीचा नवा टप्पा ओलांडण्यासाठी तुम्ही सज्ज राहावे, यश मिळेल. व्यवसायात मनोकामना पूर्ण होतील. कामातील आत्मविश्‍वास वाढेल. मनोधैर्य उंचावेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ वेगळ्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. सहकारी व वरिष्ठांची मदतही मिळेल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. घरात वातावरण आनंदी राहील. नवीन सहवासाचे आकर्षण राहील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. प्रकृतीचीही साथ राहील.

संबंधित बातम्या