ग्रहमान : ९ ते १५ नोव्हेंबर २०१९

अनिता केळकर
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

ग्रहमान
 

मेष : तुमचा कृतिशील स्वभाव कामांना गती देईल. व्यवसायात फार विचार न करता धाडसी निर्णय घ्याल. फायद्याचे प्रमाण सारखेच राहील. मनातील सुप्त इच्छा साकार होतील. कामात बदल करून प्रगती व लौकिक मिळवण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत बदल किंवा बदलीच्या कामात यश येईल. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हातात येतील. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. प्रियजनांच्या सहवासातील आनंदाचे क्षण साजरे होतील.


वृषभ : भोवतालची परिस्थिती झपाट्याने बदलेल, त्यामुळे सजगवृत्तीने वागा. व्यवसायात सहज सोप्या वाटणाऱ्या कामात विलंब व गैरसोय सहन करावी लागेल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्याल. नोकरीत कंबर कसून कामाला सिद्ध व्हावे. लाभदायक काम संपून कष्टाची कामे वाट्याला येतील. घरात खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे होईल. मुलांच्या प्रकृती व प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल.


मिथुन : ग्रहांची अनुकूलता राहील. व्यवसायात कामाची दिशा निश्‍चित करता येईल व त्याप्रमाणे पुढचे बेतही आखता येतील. आर्थिकदृष्ट्या लाभदायक कामे मिळतील. पैशांची चिंताही मिटेल. नोकरीत वरिष्ठांनी पूर्वी दिलेल्या आश्‍वासनांचा खऱ्या अर्थाने फायदा मिळेल. कामात सवलतीही मिळतील. पैशांअभावी लांबलेली कामे मार्गी लागतील. घरात सुखद प्रसंगाचे क्षण येतील. कौटुंबिक सोहळा साजरा कराल. प्रकृतीमान सुधारेल.


कर्क : तुमच्या बऱ्याच काळच्या प्रतीक्षेचा अंत होईल व तुमची साहसीवृत्ती उफाळून येईल. व्यवसायात कृतिशील व्हाल. येणाऱ्या अडचणींना धीराने तोंड देऊन मार्गक्रमण कराल. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत मनाप्रमाणे गोष्टी घडतील. तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व इतरांना कळून येईल. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. घरात जुने प्रश्‍न धसास लागतील. महत्त्वाचे निर्णय घेताना तुमचा पुढाकार राहील. प्रवासाला जाण्याचे योग येतील.


सिंह : सर्व महत्त्वाचे ग्रह साथ देतील, त्यामुळे तुमच्यातील आशावाद व उत्साह वाढेल. व्यवसायात अपेक्षित यशप्राप्ती होईल. केलेल्या कामाचे चांगले पैसेही मिळू शकतील. तणाव कमी झाल्याने हायसे वाटेल. नोकरीत कामाचे नक्की स्वरूप लक्षात येईल, त्याप्रमाणे कामाचे नियोजन करू शकाल. कामानिमित्त हितसंबंध जोडले जातील. वरिष्ठ तुमच्या मागण्यांचा विचार करतील. ध्येयपूर्तीसाठी तुम्ही सज्ज राहाल. घरात नवीन वस्तू खरेदीचा आनंद मिळेल.


कन्या : तुम्हाला या सप्ताहात कोणतीही कृती करताना त्याचा सखोल विचार करावा लागेल. मृगजळाच्या पाठीमागे धावण्यात काहीच तथ्य नाही, असा अनुभव येईल. व्यवसायात वेळेत कामे पूर्ण करूनही पैसे हाती मिळण्यास विलंब होईल, त्यामुळे तुमची चिडचिड होईल. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नोकरीत कामाचा ताण सहन होणार नाही, तरी झेपेल तेवढेच काम करावे. कामातील बेत गुप्त ठेवावे. थोड्याशा ‍या विश्रांतीने उत्साह वाढेल.


तूळ :  ग्रहमान तुमच्या जीवनात रंग भरणारे आहे. जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. व्यवसायात पैशांची ऊब मिळाल्याने नवीन बेत आखाल. लांबलेली कामे गती घेतील. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ आवश्‍यक त्या सवलती देतील. आपले काम बरे नि आपण बरे हे धोरण ठेवाल. घरात शुभकार्याची नांदी होईल. करमणुकीत वेळ मजेत घालवाल. कौटुंबिक सहल काढाल. प्रियजन, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.


वृश्‍चिक : कामाची घडी नीट बसण्यासाठी वेळेचे गणित आखून त्याप्रमाणे नियोजन करावे. व्यवसायात तुमची पत सुधारेल. त्याचा फायदा नवीन कामे मिळवताना होईल. पैशांची चणचण कमी होईल. तसेच जुनी येणी वसूल झाल्याने चिंता मिटेल. नवीन कामाच्या संधी येतील. त्याचा लाभ घ्यावा. नोकरीत तुमचे मत विचारून त्याप्रमाणे कार्यवाही होईल. प्रतिष्ठा मिळेल. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. घरात कामात वेळ मजेत जाईल.


धनू : 'अति तेथे माती' हे लक्षात ठेवावे. कामात अति उत्साह दाखवू नये. कायद्याच्या चौकटीत राहून नियमांचे पालन करावे. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील बारकाव्यांचा अभ्यास करावा. खर्चाची तरतूद करून नंतरच पैशांचे व्यवहार करावे. व्यवहारदक्षता पाळावी. नोकरीत मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर होत नाही ना याची काळजी घ्यावी. कामात गुप्तता राखावी. गैरसमजुतीने होणारे वाद टाळावेत. घरात पाहुण्यांची सरबराई कराल.


मकर : कमी श्रमात जास्त यश मिळेल. व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. कामाचे प्रमाण कमी असले, तरी पैशांची आवक समाधानकारक राहील. नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. कामाचा मनस्वी कंटाळा येईल, त्यामुळे कामे पुढे ढकलण्याकडे कल राहील. घरात नवीन खरेदीचे बेत ठरतील. नवीन जागा, वाहन खरेदीचे योग येतील. मानसिक स्वास्थ्य मिळेल.


कुंभ : संमिश्र ग्रहमान आहे. व्यवसायात स्वतःची कुवत ओळखून पुढे जावे. कामे वेळेत पूर्ण करण्यावर तुमचा भर राहील. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्याल. पैशांची आवक चांगली राहील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत वेगळ्या कामाचा व वातावरणाचा अनुभव मिळेल. नव्या नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. पगारवाढ व बदलीच्या कामांना गती येईल. घरात मोठ्यांच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल, तरी शांत राहावे. कुटुंबासमवेत छोटी ट्रिप काढाल.


मीन : नशीब साथ देईल. तुमच्या स्वभावाला पूरक वातावरण लाभेल. व्यवसायात प्रगतीचा टप्पा गाठण्यात यश येईल. कामाला योग्य दिशा मिळेल. पैशांची तजवीज होईल. नोकरीत केलेल्या कामाचे वरिष्ठ कौतुक करतील. मानसन्मान, प्रतिष्ठा मिळेल. वातावरण आनंदी राहील. नवीन  ओळखी होतील. घरात मनाप्रमाणे वागता येईल. छोटासा छंद जोपासता येईल. श्रमाचे चीज होईल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांच्या भेटीने आनंद मिळेल.

संबंधित बातम्या