ग्रहमान : १६ ते २२ नोव्हेंबर २०१९

अनिता केळकर
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

ग्रहमान

मेष : व्यवसायात प्रगती करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. पैशांची तजवीज होईल. नोकरीत वरिष्ठांच्या सल्ल्याचा मान राखावा. वेळेचे भान ठेवून काम करावे. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. महिला हौसेमौजेखातर खर्च करतील. कामाचा उरक दांडगा राहील. प्रकृतीमान सुधारेल. मानसिक शांतता लाभेल. विद्यार्थ्यांचे नवीन शालेय वर्षात अभ्यासात मन लागेल त्यामुळे अपेक्षित यशही मिळेल.

वृषभ : ग्रहांची साथ असल्याने कामात विस्तार करून फायदा मिळवाल. नवीन कामेही मिळतील. पैशांची स्थिती सुधारेल. नोकरीत अनपेक्षित चांगली कामे होतील. नवीन अनुभव येईल. नोकरदार महिलांचे मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील. कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लागतील. परंतु, अधूनमधून आरोग्याची कुरबुर राहील तरी काळजी घ्यावी. तरुणांना मनपसंत साथीदार भेटेल.

मिथुन : व्यवसायात योग्य वेळी केलेली कृती पुढे भविष्यात फायदेशीर ठरेल. रेंगाळलेल्या कामांना गती येईल. बेरोजगार व्यक्तींना काम मिळेल. नोकरीत केलेल्या कामाचे कौतुक होईल. सहकारी व वरिष्ठांची मदत मिळेल. अपेक्षित पत्रे येतील. महिलांना प्रियजनांच्या भेटीने आनंद वाटेल. नवीन खरेदीचे बेत ठरतील. घरात संयमाने वागून कामे संपवावीत, फायदा होईल.

कर्क : व्यवसायातील घडी नीट बसवण्याचा विशेष प्रयत्न कराल. नको त्या कामात बराच वेळ जाईल. आर्थिक आवक वाढेल. नोकरीत पूर्वी झालेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी वरिष्ठ देतील. हितचिंतकांची मदत मिळेल. कामात गुप्तता राखावी. महिलांनी झेपेल तेवढेच काम करून चिडचिड कमी करावी. अनावश्‍यक खर्चावर बंधन ठेवावे. विद्यार्थ्यांनी धांदरटपणा कमी करावा. त्यांना परिश्रमाचे श्रेय मिळेल.

सिंह : महत्त्वाचे ग्रह फारसे साथ देणारे नाहीत, तरीही व्यवसायात आव्हाने स्वीकारून कामे कराल. तुमचा आत्मविश्‍वास दांडगा राहील. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील, त्यासाठी जादा अधिकार व सवलती देतील. कामानिमित्त प्रवास घडेल. महिलांना रागावर नियंत्रण ठेवून सामंजस्याने प्रश्‍न सोडवावे लागतील. एखादी चांगली बातमी कळावी. तरुणांनी अतिधाडस करू नये.

कन्या : व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवावा. कामाचे योग्य नियोजन करून उलाढाल वाढवावी. खेळत्या भांडवलाची तरतूद करून ठेवावी. नवीन दृष्टिकोन भविष्यात लाभदायी ठरेल. नोकरीत रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. अपेक्षित पत्रव्यवहारांना चालना मिळेल. नवीन ओळखीचा उपयोग होईल. आवडत्या छंदात मन रमेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

तूळ : कामाचा ताण वाढेल. व्यवसायात कर्तव्यदक्ष राहून कामे संपवावीत. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत कामाचे महत्त्व कळून आल्याने वरिष्ठ व सहकारी खुशामत करतील. तसेच नोकरीमध्ये चांगल्या संधी चालून येतील. जुनी येणी वसूल होतील. महिलांना मनाप्रमाणे वागण्याची मुभा मिळेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. विवाहोत्सुक तरुणांचे विवाह ठरतील.

वृश्‍चिक : पूर्वी केलेल्या कामाचा लाभ या सप्ताहात मिळेल. व्यवसायात उलाढाल वाढेल. मानसिक समाधान मिळेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. इतरांनाही कामात मदत कराल. महिलांचा कामातील उत्साह दांडगा राहील. नवीन खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील. पैशांचा अपव्यय टाळावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. कलाकार, खेळाडू आणि राजकारणी लोकांनी प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखू नये.

धनू : व्यवसायात विस्तार करण्याचे बेत यशस्वी होतील. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे मिळतील. अर्धवट रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत कामात बदल करावासा वाटेल. केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. जोडव्यवसायातून पैसे मिळतील. महिलांना घरातील व्यक्तींबाबत नवीन अनुभव येईल. घरकामात त्यांचा बराच वेळ जाईल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.

मकर : धोरणी राहाल. व्यवसायात कामात गुप्तता राखाल. ज्या कामातून लाभ होईल तीच कामे हाती घ्याल. पैशांचे आणि कामाचे नियोजन कराल. नोकरीत मानसिक ताण कमी होईल. कामाचा उत्साह व हुरूप वाढेल. कामात सहकारी व वरिष्ठांची मदत मिळेल. महिलांना मनाप्रमाणे वागता येईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. प्रकृतीमान सुधारेल. कमी श्रमात जास्त यश मिळेल.

कुंभ : डोळ्यासमोर एक उद्दिष्ट ठेवून प्रगती कराल. आळस झटकून कामाला लागाल. व्यवसायात पैशांची तजवीज होईल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत केलेल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. महिलांना आप्तेष्टांच्या सहवासाचा आनंद मिळेल. नवीन खरेदीचे योग येतील. त्यामुळे खर्च वाढतील. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यास करावा.

मीन : हरहुन्नरी स्वभावाला पूरक ग्रहमान आहे. उत्साही व आनंदी राहाल. व्यवसायात प्रगतीचा आलेख चढता राहील. पैशांची ऊब मिळेल. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. नोकरीत मिळालेल्या संधीचा लाभ करून घ्याल. योग्य व्यक्तींचा योग्य वेळी उपयोग करून यश मिळवाल. महिलांना आनंदाची बातमी कळेल. कौतुक होईल.

संबंधित बातम्या