ग्रहमान : २३ ते २९ नोव्हेंबर २०१९ 

अनिता केळकर
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

ग्रहमान
 

मेष : आजचे काम आजच करण्याचा निश्‍चय केलात, तर फायदा तुमचाच आहे. व्यवसायात कामात प्रगती करण्यासाठी कामाचे व वेळेचे केलेले योग्य नियोजन फायदेशीर ठरेल. पूर्वी रेंगाळलेली कामे आता मार्गी लागतील. कामाच्या बाबतीत सजगता बाळगाल. नोकरीत कामाचा झपाटा राहील. कामाची पूर्तता झाल्यावर त्याची शहानिशा करून मगच वरिष्ठांपुढे ठेवावे. घरात प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करावीत.

वृषभ : महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालणारे वातावरण व ग्रहमान असल्याने कामाचा उत्साह वाढेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. व्यवसायात खेळत्या भांडवलाची गरज जाणवेल. हितचिंतकांची मदत मोलाची ठरेल. पैशांचे व्यवहार करताना दक्ष राहावे. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मान्य करून घ्याव्यात. जोडव्यवसायातून विशेष लाभाची शक्‍यता. कामानिमित्त नवीन ओळखी होतील.

मिथुन : हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये. महत्त्वाच्या कामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. व्यवसायात स्वतःची कामे स्वतः करावीत. मिळालेल्या संधीचा व क्षणाचा लाभ घ्यावा. पैशांचा अपव्यय टाळावा. नोकरीत स्वतःच्या अंगी असलेले कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. घरात महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्यावा. महिलांना आवडत्या छंदात वेळ घालवता येईल.

कर्क : सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यातील मरगळ व आलेली निराशा दूर करेल. मनाप्रमाणे कामे होतील. त्यामुळे आनंद वाटेल. व्यवसायात महत्त्वाच्या प्रश्‍नात तोडगा निघेल. हितचिंतकांची कामात मदत होईल. अनावश्‍यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवाल. पैशांची आवक समाधानकारक राहील. नोकरीत आपले काम बिनचूक करून मगच सहकाऱ्यांना कामात मदत कराल. वेळेचे गणित अचूक ठरेल.

सिंह : कामाच्या वेळी काम करून इतर वेळी आराम करण्याकडे कल राहील. व्यवसायात पैशांची ऊब चाखता येईल. जुनी येणी वसूल झाल्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. नवीन कामाची संधी मिळेल. नोकरीत केलेल्या कामाचे श्रेय व समाधान मिळेल. वरिष्ठांना तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व कळून आल्याने पत वाढेल. घरात गृहसौख्याचा आनंद घ्याल. नवीन जागा, वाहन खरेदीचे योग येतील.

कन्या : परिस्थितीचा अंदाज करून त्याप्रमाणे पावले उचलाल. पैशांची घडी नीट बसवण्यासाठी हातपाय हालवावे लागतील. व्यवसायात नवीन विचार व आचार यांना चालना मिळेल. योग्य वेळी योग्य व्यक्तींची केलेली निवड लाभदायी ठरेल. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. कामात प्रगतीचा आलेख वाढता राहील. नोकरीत नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर राहील. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.

तूळ : व्यवसायात कामात प्रगती करून थोड्याच अवधीत मनातील ईप्सित साध्य करू शकाल. हातून चांगली कामगिरी घडेल. पैशांची आवक वाढेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत तुमचा उद्देश साध्य करण्यासाठी सहकाऱ्यांशी गोड बोलावे लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळून कामाचा उरक पाडावा. बेकार व्यक्तींना काम मिळेल. खर्चांवर नियंत्रण ठेवण्यात यश येईल. महिलांना नवीन वर्षात नवीन बेत आखता येतील.

वृश्‍चिक : नशिबाची व महत्त्वाच्या ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात पूर्वीचे रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लागतील. विरोधकांचा विरोध मावळेल. नवीन योजना प्रत्यक्षात साकार होतील. पैशांची ऊबही मिळेल. नोकरीत नवीन कामाची संधी चालून येईल, लाभ घ्यावा. चांगल्या कामामुळे वरिष्ठ कौतुकाची थाप देतील. घरात लांबलेली कामे गती घेतील. प्रियजनांच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरा होईल. लांबच्या प्रवासाचे बेत ठरतील.

धनू : तुमच्या स्वच्छंदी स्वभावाला थोडी मुरड घातलीत, तर कामाची योग्य दिशा सापडेल. व्यवसायात कामातील बेत गुप्त ठेवावे. हितशत्रूंच्या कारवायांवर बारीक नजर ठेवावी. पैशांचा अपव्यय टाळावा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. स्वतःची कुवत ओळखून कामे हाती घ्यावीत. सहकारी व वरिष्ठांबरोबर चांगले हितसंबंध ठेवावेत. तुमच्याकडून इतरांच्या बऱ्याच अपेक्षा राहतील. मनःशांती टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल.

मकर : 'रात्र थोडी सोंगे फार' अशी तुमची स्थिती असेल. व्यवसायात सुरू असलेल्या चालू कामाशिवाय वेगळे काम स्वीकाराल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे मिळतील. शेअर्ससारख्या जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. नोकरीत कामामुळे वरिष्ठ जादा सवलती व सुविधा देतील. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊ नये. घरात नातेवाईक, प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. सुखद आनंद मिळेल.

कुंभ : मनाप्रमाणे काम केल्याचा आनंद निराळाच असतो. त्याची मजा चाखाल. चांगल्या ग्रहमानाचा लाभ घ्यावा. व्यवसायात प्रगतीला पूरक वातावरण मिळेल. नवीन ओळखी होतील. पैशांची तजवीज करून भविष्यात फायदा उठवाल. नोकरीत कामाच्या नवीन जबाबदाऱ्या पेलाल. पगारवाढ व बढती मिळण्याची शक्‍यता आहे. तरुणांचे विवाह ठरतील. घरात चांगली संधी चालून येईल. प्रकृतीची साथ मिळेल.

मीन : चंचल व अविचारी स्वभावाला लगाम घालून संयमाने वागावे. व्यवसायात मनातील स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्याची संधी मिळेल. ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. पैशांची वसुली झाल्याने चार पैसे हातात शिल्लक राहतील. नोकरीत कामाचा ताण व कष्ट कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. सहकारी व वरिष्ठांची याकामी मदत होईल. घरात तडजोडीचे धोरण ठेवाल. चांगली बातमी कळेल.
 

संबंधित बातम्या