ग्रहमान : ७ ते १३ डिसेंबर २०१९ 

अनिता केळकर
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

ग्रहमान
 

मेष : या सप्ताहात ग्रहांची साथ लाभदायी ठरेल. चिंता कमी झाल्याने मन प्रसन्न राहील. व्यवसायात आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. कामाच्या नव्या योजना मनात घोळतील. नवीन ओळखी होतील. नोकरीत नवीन कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. त्यासाठी जादा अधिकार व सवलतीही देतील. घरात जवळच्या व्यक्तीच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरा कराल. प्रियजन, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. मानसन्मान मिळेल.

वृषभ : पैशांअभावी तुमच्या मनातील सुप्त इच्छा आकांक्षांना मुरड घालावी लागेल. मनात मोठ्या योजना असतील. परंतु, थोडा धीर धरावा. व्यवसायात हातातील कामांवर लक्ष केंद्रित करून मगच नवीन कामांकडे वळावे. आता केलेल्या कामाचा फायदा भविष्यात नक्की होईल. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेत राहून कामे करावीत. चिडचिड करू नये. घरात खर्चाचे बजेट कोलमडेल. तरी अवास्तव खर्च करू नये. नवीन वर्षात बरेच संकल्प सिद्धीस नेण्याचा महिलांचा मानस पूर्ण होईल.

मिथुन : व्यवहार चातुर्य हा गुण तुमच्यात आहे. त्याला ग्रहांची साथ मिळाल्याने कामात नवीन उद्दिष्टे गाठू शकाल. व्यवसायात नवीन कार्यपद्धतींचा अवलंब करून नवीन ध्येयधोरणे ठरवाल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क राहाल. नोकरीत स्वतःचे काम संपवून इतरांनाही कामात मदत कराल. घरात कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. नव्या उमेदीने व जिद्दीने आशा उराशी बाळगून नवीन कामाला लागाल, यशस्वी व्हाल. मुलांकडून चांगली बातमी कळेल.

कर्क : कामाचा ताण कमी करण्यासाठी थोडी विश्रांती घ्यावीशी वाटेल. तेव्हा छोटीशी सहल काढावी व विरंगुळ्यातून मनःशांती मिळवावी. व्यवसायात ज्या कामात साशंकता वाटते, ती कामे लक्षपूर्वक करावी. कामाचे योग्य नियोजन करून कामांना गती द्यावी. मनाप्रमाणे कामे होतील. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. त्यामुळे कामे पुढे ढकलाल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. घरात आप्तेष्ट मित्रमंडळींच्या सहवासात वेळ मजेत जाईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

सिंह : स्वच्छंदी, आनंदी, उत्साही स्वभाव राहण्यास पूरक ग्रहमान व वातावरण लाभेल. त्यामुळे मन प्रफुल्लित राहील. व्यवसायात कमी श्रमात जास्त यश मिळवण्याकडे कल राहील. फायदा मिळवून देणारी कामे करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. पैशांची आवक सुधारेल. नोकरीत स्वतःहून कामाची जबाबदारी पेलाल व यश संपादन कराल. केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. सहकारी व वरिष्ठांना तुमचे महत्त्व कळून येईल. घरात वातावरण आनंदी राहील. पाहुण्यांची ये-जा राहील.

कन्या : स्वभावतः पैशांच्या बाबतीत चोखंदळ असता. शारीरिक क्षमता फार नसल्याने जिवाचा आटापिटा न करता जेवढे झेपेल तेवढेच काम करा. या सप्ताहात व्यवसायात गोड बोलून हाताखालच्या लोकांकडून खुबीने कामे करून घ्याल. सुखासीन जीवन जगण्याकडे कल राहील. नोकरीत स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याची संधी येईल. त्याचा लाभ घ्याल. वरिष्ठांची मर्जी राहील. घरातील नवीन खरेदीसाठी उत्सुक असाल, पण बजेटमध्ये राहून खर्च कराल. कुटुंबासमवेत वेळ मजेत घालवाल.

तूळ : मनात रेंगाळत असलेली स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. त्यादृष्टीने पावले उचलाल. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून नवीन प्रयोग कराल व यशही मिळवाल. पैशांचे गणित व ताळमेळ जमवून त्याप्रमाणे कृती करावी. नोकरीत नवीन प्रशिक्षणाची संधी येईल, लाभ घ्यावा. तुमच्यातील कलागुणांना वाव मिळेल. घरात पूर्वी ठरलेले समारंभ पार पडतील. प्रवासाचे बेत आखाल. इतर व्यक्तींच्या मागण्या पुरवण्यात धन्यता मानाल. सामूहिक कामात मानसन्मान मिळेल.

वृश्‍चिक : निराशेचा सूर मावळून उमेदीने नव्या कामांकडे वळाल. आयुष्याला गती येईल. व्यवसायात प्रगतीचा आलेख चढता राहील. त्यामुळे नवे बेत आखाल. जुन्या कामाचे पैसे हातात आल्याने आनंद मिळेल. मानसिक समाधान लाभेल. नोकरीत कामानिमित्त जादा अधिकार व सवलती मिळतील. सहकारी कामात मदत करतील. घरात नवीन खरेदी, समारंभ यात पैसे खर्च होतील. तरुणांचे विवाह ठरतील. वातावरण आनंदी राहील. महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल.

धनू : बोलणे व कृती यांचा समन्वय साधून कामे करावीत. कामाचा बोजा वाढला, तरी नियमाने वागून कामे संपवावीत. व्यवसायात काही बेत पूर्ण करण्यासाठी पैशांकडे बघणार नाही. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्याल. नोकरीत स्वतःच्या जबाबदाऱ्या न टाळता कामे वेळेत संपवा. जादा कामातून वरकमाई करता येईल. गृहसजावट व इतर गोष्टींसाठी खर्च होईल. नवीन कामात मोठी आशा राहील.

मकर : शनी प्रधान जरी असला, तरी तुमच्या आवडीच्या कामात तुम्ही रस घेता व वेळेचे बंधन न पाळता मोठ्या उत्साहाने कामे करता, त्याचा लाभ या सप्ताहात होईल. व्यवसायात तुमचे बुद्धिचातुर्य इतरांना दिसेल. पूर्वी केलेल्या कामातून पैसे हाती येतील, त्यामुळे पैशांची चिंता मिटेल. नोकरीत तुमचे महत्त्व कळून येईल, त्यामुळे दबदबा वाढेल. चांगले काम करून स्वतःचा उद्देश साध्य करून घेऊ शकाल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. पण खर्च चांगल्या गोष्टींसाठी असल्याने समाधान वाटेल.

कुंभ : 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' ही म्हण या सप्ताहात सार्थ ठरेल. मनातील इच्छा साकार होतील. पैशांची स्थितीही समाधानकारक असल्याने व्यवसायात कामाचा दर्जा उंचावेल. व्यवसायात प्रतिष्ठा व पत वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. नवीन जागा, यंत्रे वाढवून कामात उलाढाल वाढवाल. नोकरीत वरिष्ठांनी पूर्वी दिलेली आश्वासने ते पाळतील. कामासाठी जादा सवलती व अधिकार देतील. घरात कष्टाशिवाय फळ नाही हे लक्षात येईल. अपेक्षाभंग होण्याची शक्‍यता, तरी शांत राहावे.

मीन : कामे वेळेत पूर्ण झाल्याने मनावरचा भार हलका होईल. भोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. हरहुन्नरी स्वभावाला पूरक वातावरण लाभेल. व्यवसायात उत्साहाने कामाला लागला. तुम्हाला नवीन कल्पना सुचतील. कामात उत्पन्नाचे प्रमाणही वाढेल. नोकरीत पगारवाढ व बढती मिळावी. परदेश व्यवहारांच्या कामांना चांगली चालना मिळेल. घरात मित्रमंडळींचा सहवास व समारंभ यात वेळ मजेत जाईल. प्रकृतीची साथ मिळेल.

संबंधित बातम्या