ग्रहमान : १४ ते २० डिसेंबर २०१९

अनिता केळकर
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

ग्रहमान 
 

मेष : कामात लवचिकता आणून कामांना गती द्यावी. व्यवसायात आर्थिक पकड घट्ट करावी. कष्टाच्या प्रमाणात यश प्राप्ती होईल. हितचिंतकांच्या मदतीने कामे मिळतील. नोकरीत कामात बिनचूक राहावे. वरिष्ठांपुढे कामाचे स्वरूप स्पष्टपणे मांडावे. मनाविरुद्ध वागावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक. घरात कामाचा उरक दांडगा राहील. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याशी जास्त सलगी नको. चार हात लांबच राहावे. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे.

वृषभ : पैशांमुळे हितसंबंध बिघडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. व्यवसायात कामांची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कामे हाती घ्यावीत. वेळ व पैसे यांचे योग्य गणित मांडावे. अनावश्‍यक खर्चाला फाटा द्यावा. नोकरीत वरिष्ठांचा मूड सांभाळावा. शब्द हे शस्त्र आहेत हे लक्षात ठेवून जपून वापरावे. कामानिमित्त प्रवास घडेल. परदेशगमनाची संधी येईल. घरात वादविवाद टाळावे. समजुतीचा घोटाळा होण्याची शक्‍यता. कौटुंबिक जीवनात अस्वस्थता जाणवेल. सामूहिक कामात अतिविश्‍वास टाळावा.

मिथुन : तुमची प्रगती ही तुमच्या केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून राहील. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कर्तव्यदक्ष राहावे. हितशत्रूंपासून सावध राहावे. पैशांची गुंतवणूक भावनेच्या भरात करू नये. नोकरीत तात्त्विक मतभेद होण्याची शक्‍यता. सहकारी व वरिष्ठांची मदत कामात व्हावी. माणसांची योग्य पारख बरेच काही देईल. घरात महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. मन शांत ठेवावे. आवश्‍यक तिथे मोठ्यांचा सल्ला घ्यावा.

कर्क : कामाचा उरक दांडगा असेल. तरीही महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवावीत. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल झाल्यामुळे नवीन हितसंबंध जोडले जातील व जुने संपुष्टात येतील. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत संयमाने राहावे. नवीन नोकरीत कामाचे समाधान मिळेल. पगारवाढ व बढती मिळावी. घरात छोटे वादविवाद होतील, दुर्लक्ष करावे. भागीदारीच्या प्रकृतीची चिंता वाटेल. तरुणांनी तूर्तास विवाहाची घाई करू नये. महिलांनी मनन व चिंतन करावे.

सिंह : कामात तडजोडीचे धोरण स्वीकारावे. परिस्थितीनुरूप बदल करून कामे मार्गी लावावीत. व्यवसायात आवश्‍यकतेनुसार तत्त्वांशी तडजोड करावी लागेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. शक्यतो प्रवास टाळावा. बोलण्यामुळे इतरांचा रोष ओढवून घेऊ नये. घरात महत्त्वाचे प्रश्‍न धसास लावावे. भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व द्यावे. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.

कन्या : आत्मविश्‍वासाच्या जोरावर यश खेचून आणावे. व्यवसायात कामाची आखणी आणि पैशांची तरतूद योग्य प्रकारे करावी लागेल. जुनी येणी वसूल होतील. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत ऐकीव गोष्टींवर विश्‍वास न ठेवता शहानिशा करावी. वरिष्ठांपुढे तुमचे मत योग्य प्रकारे मांडावे. पैशांची हाव धरू नये. बदल किंवा बदलीची शक्‍यता. घरात इतरांच्या तंत्राने वागू नये. स्वयंसिद्ध राहावे. शांत राहणेच पसंत करावे. महिलांनी आध्यात्मिक प्रगती करावी.

तूळ : कामात केलेली टंगळमंगळ तुम्हाला त्रासदायक ठरण्याची शक्‍यता आहे. व्यवसायात तांत्रिक अडचणीवर वेळीच उपाय करावा. कामात झालेला विलंब सहन होणार नाही. वेळ व पैसा यांचा अपव्यय टाळावा. हातातील कामे पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळावे. नोकरीत कमी बोलून कृती करावी. इतरांकडे बोटे दाखवण्यापेक्षा स्वतः कामात बिनचूक राहावे. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. घरात मुलांकडून चांगली बातमी कळेल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल.

वृश्‍चिक : विचारांना कृतीची जोड देऊन मनातील इच्छांना वाट मोकळी करून द्यावी. व्यवसायात कामात दक्ष राहावे. मोठी उडी घेऊ नये. पैशांच्या व्यवहारात चोखंदळ राहावे. बेधडकपणे निर्णय घेऊ नये. मात्र, नवीन कामांसाठी मोठी गुंतवणूक कराल. नोकरीत रागावर नियंत्रण ठेवावे, वादविवाद टाळावा. कामात केलेला बदल फायद्याचा ठरेल. घरात पूर्वी रेंगाळलेले कार्यक्रम पार पाडाल. पैशांची सोय होईल. मुलांना व इतरांना त्यांच्या मनाजोगता खर्च करता येईल. तरुणांचे विवाह जमतील.

धनू : कमी वेळात बरेच काही साध्य करायचे असा मानस असेल. त्यामुळे कामात थोडा बदल करावा लागेल. व्यवसायात ओळखीतून नवीन कामे मिळतील. महत्त्वाचे करार मदार करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. आर्थिक गोष्टीत योग्य नियोजन भविष्यात लाभदायी ठरेल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहावे. हातातील कामे वेळेत पूर्ण करावी. कमी बोलून कृतीवर भर द्यावा. व्यवसायातून विशेष लाभ व्हावा. घरात निर्णय घेताना भागीदाराची गरज भासेल.

मकर : येणाऱ्या गोष्टींना जिद्द व विश्‍वासाने सामोरे जाण्याचा मानस असेल. व्यवसायात गोंधळात टाकणारे ग्रहमान. तूर्तास कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नये. सहज सोप्या वाटणाऱ्या कामात अडचणी येतील. पैशांची उभारणी करावी लागेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी गोड बोलून नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. आवळा देऊन कोहळा मात्र काढीत नाहीत ना याची काळजी घ्यावी. घरात आपल्याच माणसांकडून नवीन अनुभव येईल. आपमतलबी स्वभावाची चुणूक दिसेल.

कुंभ : व्यवसायात कामात उत्साह चांगला राहील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. रेंगाळलेली कामे गती घेतील. पैशांची स्थिती सुधारेल. तुमच्या कामातील बेत मात्र गुप्त ठेवावेत. नोकरीत हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. आग्रही धोरण न ठेवता लवचिकता बाळगावी. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे. मूड बघून तुमच्या मागण्या मान्य करून घ्याव्या. घरात अनावश्‍यक खर्च वाढेल. पाहुण्यांची ये-जा राहील. डागडुजी, मुलांची हौसमौज इत्यादी गोष्टींमध्ये खर्च होईल. सामूहिक क्षेत्रात खट्टामिठा अनुभव येईल.

मीन : तुमच्या भावनांना तडा गेल्याने निराशा पदरी येईल. परंतु, थोडी सबुरी ठेवलीत तर गाडी पुन्हा रुळावर येईल. व्यवसायात नवीन योजना कार्यान्वित करण्याचा बेत आखाल. पैशांची तजवीज होईल. नियमांचे उल्लंघन न करता कृती करावी. नोकरीत बदल किंवा बदलीचे विचार येतील. मनाविरुद्ध एखादी घटना घडेल. त्यामुळे अस्वस्थता येईल. माणसांची पारख करावी. घरात वादाचे प्रसंग टाळावे. कोणतेही निर्णय घेताना तटस्थ राहावे. बोलण्याने मोठ्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी.

संबंधित बातम्या