ग्रहमान : २८ डिसेंबर २०१९ ते ३ जानेवारी २०२०

अनिता केळकर
सोमवार, 30 डिसेंबर 2019

ग्रहमान
 

मेष : प्रगतीला वाव देणारे ग्रहमान. व्यवसायात संपर्कामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. पैशांचा वापर काटकसरीने करावा. भावनेच्या भरात अव्यवहारी वागू नये. महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत कर्तव्य श्रेष्ठ मानून कामे करावी. कामात हलगर्जीपणा झाला तर महागात पडेल. सहकाऱ्यांच्या शब्दांवर अतिविश्‍वास ठेवू नये. घरात मनावर संयम ठेवावा. खर्चावर नियंत्रण ठेवावे. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी.

वृषभ : रागावर नियंत्रण ठेवून कामात प्रगती करावी. व्यवसायात विशाल दृष्टिकोन ठेवावा. सलोख्याचे संबंध ठेवावे. शब्द हे शस्त्र आहे लक्षात ठेवावे. कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कराल. नोकरीत तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या, तरी शांत राहावे. सामंजस्याने प्रश्‍नांची उकल करावी. आवश्‍यक तेथे सहकाऱ्यांची मदत घ्याल. घरात पाहुण्यांची सरबराई करण्यात वेळ जाईल. आप्तेष्ट, प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील.

मिथुन : कार्यक्षेत्र विस्तृत करून प्रगती करण्याचा मानस राहील. व्यवसायात जुनी वसुली होईल व कर्जे फिटतील. त्यामुळे पैशांची चिंता मिटेल. मनाला मानसिक समाधान लाभेल. नोकरीत 'आपले काम बरे नि आपण बरे' हे धोरण योग्य राहील. 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' ही म्हण लक्षात ठेवावी. कामात चोख राहावे. घरात तुमच्या कल्पनांना इतरांकडून प्रतिसाद मिळणार नाही. आवश्‍यक वाटल्यास मोठ्यांचा सल्ला घ्यावा. पैशांचा अपव्यय टाळावा.

कर्क : उद्योगाप्रिय स्वभावाला पूरक ग्रहमान. यशदायी कामासाठी पावले टाकावी. मात्र, कोणतेही निर्णय घाईने घेऊ नये. व्यवसायात कामात अडीअडचणींवर मात करावी लागेल. नको त्या कामात बराच वेळ जाईल. नोकरीत सावध दृष्टिकोन ठेवावा. अतिविश्‍वास टाळावा. कामानिमित्त प्रवास घडेल. घरात किरकोळ वादविवाद होतील. आवश्‍यक तिथे मोठ्यांचा सल्ला घ्यावा. मन शांत ठेवावे. महिलांनी विनाकारण दगदग, धावपळ करू नये. पैशांच्या व्यवहारात चोख राहावे.

सिंह : 'रात्र थोडी, सोंगे फार' अशी स्थिती असेल. कामाचा वेग अफाट असेल. व्यवसायात उद्दिष्ट पूर्ण करण्याचा चंग बांधाल. मात्र, त्यासाठी वाईट संगत धरू नये. टप्प्याटप्प्याने केलेली प्रगतीच उपयोगी पडेल. नोकरीत फुशारक्‍या मारून कामाचा बोजा वाढवू नये. वरिष्ठ कामानिमित्त जादा सवलती देतील, त्याचा लाभ घ्यावा. बेरोजगार व्यक्तींनी मिळेल ते काम स्वीकारावे, हिताचेच राहील. घरात हलके कान ठेवून वाद घालू नयेत. सामूहिक क्षेत्रांत प्रतिष्ठेला जपावे. महिलांनी विश्रांती घ्यावी.

कन्या : प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामाची आखणी करावी. व्यवसायात तांत्रिक अडथळ्यांवर मात करून प्रगती करावी लागेल. खेळत्या भांडवलाची उभारणी आवश्‍यक राहील. हितचिंतकांची कामात मदत घ्याल. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी वरिष्ठांना तुमची गरज भासेल. सहकाऱ्यांनाही तुमची किंमत कळेल. मात्र, सुविधा देताना थोडी टंगळमंगळ करतील. निराशा येईल. घरात वातावरण तप्त व गढूळ राहील. नाराजी पत्करून पावले उचलाल.

तूळ : कृती न करता सर्वंकष विचार करून निर्णय घ्यावा. व्यवसायात कामांना गती देण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब कराल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. परंतु, त्याबरोबर येणारे धोकेही लक्षात घ्यावे. नोकरीत कामात गती घ्याल. पण चुकाही भरपूर होतील, तरी गाफील राहू नये. घरात मुलांच्या हट्टापायी चार पैसे जादा खर्च होतील. विचित्र वागण्याने वादविवादही होण्याची शक्‍यता. महिलांनी बोलून श्रम वाया घालवू नये.

वृश्‍चिक : बऱ्याच दिवसानंतर सुसंबद्ध जीवनाचा आनंद घ्याल. व्यवसायात कामात वेळ व काळाचे बंधन आखून त्याप्रमाणे कामाला लागाल. अनपेक्षित येणाऱ्या अडचणींवर मात करून यश संपादन करावे. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल संभवतो. मिळालेल्या संधीचा सदुपयोग करावा. घरातील काही प्रश्‍न चित्त विचलित करतील. खर्चाचे प्रमाणही वाढेल. मुलांच्या मागण्या, हट्ट पुरवताना तारांबळ उडेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. त्यामुळे मन आनंदी राहिल.

धनू : कल्पनांना कृतीची जोड मिळेल. कामांना चालना मिळेल. त्यामुळे इतरांना कष्ट करूनही यश मिळत नव्हते ते यश तुम्ही मिळवाल. व्यवसायात घाईने निर्णय घेऊ नये. पैशांचा वापर योग्य ठिकाणी करावा. नोकरीत गृहीत धरून कामे करू नये. नकार सहन होणार नाही. वरिष्ठ व सहकाऱ्यांपासून चार हात लांबच राहावे. घरात रागावर नियंत्रण ठेवावे. स्वतःचे म्हणणे खरे करण्याचा आग्रह धरू नये. पाहुण्यांची ये-जा राहील. महिलांचा घरात वेळ मजेत जाईल.

मकर : चाकोरीबद्ध जीवन जगण्याचा मनस्वी कंटाळा आला असेल, तर निर्धास्तपणे राहावे. चिंता, काळजी करू नये. व्यवसायात आलेला प्रत्येक दिवस साजरा करावा. मात्र, जादा पैशांच्या मोहापायी चुकीची पावले टाकू नयेत. नवीन कामे स्वीकारण्यापूर्वी त्यातील संभाव्य धोक्‍यांचा अंदाज घ्यावा. येणी वसूल होतील व जुनी देणी देता येतील. नोकरीत वरिष्ठ अधिकार देतील, त्याचा वापर योग्य ठिकाणी करावा. घरात जिभेवर साखर ठेवून बोलावे. तुमच्या व्यवहारी स्वभावाची चेष्टा सर्वजण करतील.

कुंभ : उत्साह संचारून कामाची पूर्तता कराल. दिलेला शब्द पाळाल. अचानक कृतिशील होऊन सर्वांना आश्‍चर्याचा सुखद धक्का द्याल. व्यवसायात कामाची पद्धत बदलून उलाढाल वाढवावी. खेळत्या भांडवलाची उभारणी करावी लागेल. पैसे खर्च करण्याची मनापासून तयारीही असेल. नोकरीत बदल करावासा वाटेल. परंतु घाई नको. दुसऱ्यावर जादा विश्‍वासही ठेवू नये. घरात प्रश्‍नाची उकल करून ठोस पावले उचलाल. शुभकार्यानिमित्त आप्तेष्टांचा सहवास लाभेल.

मीन : सध्या आर्थिक ऊब चांगली मिळेल. पण त्याचा विनियोग योग्य मार्गाने करावा. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे नजरेच्या टप्प्यात येतील. हातातील कामेही वेळेत पूर्ण करू शकाल. नोकरीत सहकारी व वरिष्ठांची कामात मदत होईल. जोडव्यवसाय असणाऱ्यांना लाभ होईल. घरात महिलांना छंद जोपासता येईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. सामूहिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. तरुणांचे विवाह ठरतील.

संबंधित बातम्या