ग्रहमान : १८ ते २४ जानेवारी २०२०

अनिता केळकर
गुरुवार, 23 जानेवारी 2020

ग्रहमान
 

मेष : व्यवसाय, नोकरीत कामाच्या उत्तम संधी चालून येतील. संघर्ष, वादविवाद टाळण्यात यशस्वी व्हाल. आर्थिकप्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची मने जिंकून घ्याल. मनाप्रमाणे कामे करता येतील. तसेच खर्चही मनाप्रमाणे कराल. आरोग्य चांगले राहील. महिलांना मुलांकडून प्रगतीच्या बातम्या समजतील. नोकरदार महिला कर्तव्य तत्पर राहतील. आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

वृषभ : सकारात्मक दृष्टिकोन ठेवून व्यवसायात प्रगती कराल. अनपेक्षित कामे मिळतील. जुनी येणी वसूल होतील. कामात मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. नोकरीत इतरांचे सहकार्य लाभेल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. कामात थोडी कार्यक्षमता वाढवावी लागेल. महिलांनी मात्र मनःस्वास्थ्य सांभाळावे. तब्येतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लागतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. धार्मिक, सामाजिक कामात विशेष रस घ्याल.

मिथुन : ग्रहांची साथ मिळेल, त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहील. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे आता चीज होईल. नवीन अनुभव येतील. कामात यश मिळेल. अर्थप्राप्ती होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. कृतीवर जास्त भर द्याल. महिलांना मनःशांती मिळेल. आनंदवार्ता कळतील. आवडीच्या क्षेत्रात मन रमेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ग्रहमान, तरी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

कर्क : तुमच्या अंगी असलेले सुप्त कलागुण दाखवण्याची उत्तम संधी मिळेल. कर्तव्याला कल्पकतेची जोड मिळेल. व्यवसायात पूर्वीच्या अनुभवांचा चांगला उपयोग होईल. नवीन कामे मिळतील. कामातील बेत मात्र गुप्त ठेवावे. नोकरीत पैशांच्या मोहापायी पाशापासून चार हात लांब राहावे. कामात बिनचूक राहून कामे वेळेत पूर्ण करावी. महिलांची अपेक्षित कामे पूर्ण होतील. मात्र, खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रकृतीमान चांगले राहील. नवीन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांनी मनन व चिंतन करावे.

सिंह : 'इच्छा तेथे मार्ग' हे धोरण सार्थ ठरेल. व्यवसायात रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन कामाची संधी चालून येईल. खेळत्या भांडवलाची सोयही होईल. व्यवहारात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील, त्यासाठी जादा अधिकार व सवलतही देतील. कामामुळे ताण वाढेल. महिलांना इतरांकडून व घरातून मिळणारा अनुभव मोलाचा असेल. शुभकार्ये ठरतील. तरुणांचे विवाह जमण्याची शक्यता. महिलांनी नोकरीत अतिस्पष्टवक्तेपणा टाळावा.

कन्या : जिद्द व चिकाटीच्या जोरावर महत्त्वाची कामे धसास लागतील. आर्थिक प्रगती उत्तम राहील. व्यवसायात ओळखीचा उपयोग होईल. कामात चांगले बदल घडतील. दगदग, धावपळ वाढेल. नोकरीत कर्तव्यपूर्तीसाठी वेळ व पैसा खर्च करू शकाल. मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर कराल. कामे यशस्वी होतील. महिलांना परोपकाराची संधी चालून येईल. नवीन वस्तू खरेदी करता येतील. नोकरदार महिलांचा आत्मविश्‍वास वाढेल. सामाजिक कार्यात विशेष रस घ्याल.

तूळ : तुमच्या बुद्धिकौशल्याने तुम्ही येणाऱ्या अडचणींवर मात कराल. व्यवसायात नवीन शिकण्याची संधी मिळेल. अर्थप्राप्ती समाधानकारक होईल. कामानिमित्त प्रवास घडेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. नोकरीत कामाचा उरक दांडगा राहील. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व इतरांना कळून येईल. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. महिलांना मनाप्रमाणे कामे झाल्याचा आनंद मिळेल. चांगली बातमी कळेल.

वृश्‍चिक : मानी व अहंमन्य स्वभावाला थोडी मुरड घातली, तर कामाचा आनंद मिळेल. व्यवसायात इतरांकडून कसे व कोणते काम करून घेता यावर यशाची मदार अवलंबून राहील. कामात कार्यक्षमता वाढवण्याकडे कल राहील. पैशांची स्थिती चांगली राहील. नोकरीत तुमच्या कामाने तुम्ही इतरांची मने जिंकून घेऊ शकाल. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळून येईल. जादा कमाईची संधी मिळेल. महिलांना कामात रस वाटेल, त्यामुळे मनापासून कामे करतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

धनू : व्यवसाय नोकरीत अपेक्षित यश मिळेल. मनातील ईप्सित साध्य होतील. कार्यतत्परता दाखवाल. व्यवसायात सामंजस्याने प्रश्‍न मार्गी लावाल. मिळालेला वेळ व संधीचा फायदा करून घ्याल. अर्थप्राप्ती चांगली होईल. नोकरीत तुमची आनंदी व समाधानी वृत्ती कामाचा तणाव हलका करेल. वरिष्ठ व सहकारी मदत करतील. बेरोजगारांना नोकरी मिळेल. महिलांना गृहसौख्य उत्तम लाभेल. नवीन खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश प्राप्ती होईल.

मकर : व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामात बदल कराल. व्यवसायात विस्ताराच्या कामना फलद्रूप होतील. बॅंका व हितचिंतकांची मदत घेऊन खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. प्रत्येक प्रश्‍न सामंजस्याने मार्गी लावाल. परदेशगमनाची संधी चालून येईल. नोकरीत कामे मार्गी लागल्याने मनावरचा ताण कमी होईल. बचतीकडे विशेष लक्ष द्याल. शेअर्स व्यवहारातून विशेष लाभ संभवतो. महिलांचा आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. शिवाय विवाह, शुभकार्ये यात बराच वेळ जाईल.

कुंभ : ग्रहमान व वातावरणाची साथ मिळेल. व्यवसायात प्रगतीचा आलेख चढता राहील. नशिबाची साथही मिळेल. अवघड व अशक्‍यप्राय कामात यश संपादन कराल. आर्थिकप्राप्ती समाधानकारक राहील. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामात कर्तबगारी दाखवण्याची संधी मिळेल. त्यामुळे आत्मविश्‍वास वाढेल. चांगली कार्ये हातून घडतील. महिलांना कामात हुरूप येईल. सामाजिक व कलाक्षेत्रात प्रगती करता येईल. नावलौकिक मिळवाल.

मीन : तुमच्या आनंदी व स्वच्छंदी स्वभावाने तुम्ही इतरांना आपलेसे करून घेता, याचा विशेष लाभ होईल. कर्तव्यपूर्तीकडे विशेष लक्ष द्याल. व्यवसायात वेळेचा व संधीचा योग्य उपयोग करून कामे मार्गी लावाल. नवीन कामे मिळतील. नोकरीत नवीन कामे हाताळण्याची संधी मिळेल. मानसन्मान मिळतील. परदेशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. महिलांची मुलांच्या प्रगती व प्रकृतीबाबतची चिंता दूर होईल. चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.

संबंधित बातम्या