ग्रहमान : १ ते ७ फेब्रुवारी २०२०

अनिता केळकर
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

ग्रहमान
 

मेष : सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. व्यवसायात सुसंवाद साधून कामे करण्यावर भर राहील. केलेल्या कष्टाचे चीज होईल. वेळेचा योग्य उपयोग करून घ्याल. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत महत्त्वाची कामे मार्गी लागतील. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. बेरोजगारांना काम मिळेल. महिलांना कलागुण दाखवण्याची संधी मिळेल, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल.

वृषभ : ग्रहमानाची साथ असल्यामुळे सुप्त इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसायात नवीन कामे मिळतील. नवीन आव्हाने स्वीकारून यश मिळवाल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता. नोकरीत बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. सहकारी व वरिष्ठांची कामात मदत होईल. मन:शांती लाभेल. अधिकाराचे पद मिळेल. महिलांना अध्यात्मिक प्रगती करता येईल. आरोग्य चांगले राहील.

मिथुन : व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी काही ठोस पावले उचलाल. प्रगतीचा वेग वाढेल. आर्थिक येणी वसूल होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांची कामात मदत मिळेल. तुम्ही तुमचे विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. महिलांना अनावश्‍यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लागतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांचे विवाह ठरण्याची शक्यता.

कर्क : भाकीत खरे ठरेल. व्यवसायात उत्साही स्वभावाचा फायदा होईल. अंदाज व आडाखे अचूक ठरतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. आर्थिक चिंता मिटेल. नोकरीत मिळालेल्या संधीचे सोने कराल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. व्यवसायातून विशेष लाभ होतील. घरात मानसिक समाधान मिळेल. मनोनिग्रह राहील. सलोख्याच्या वातावरणाने आनंद मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

सिंह : कामाचे लवचीक धोरण फायदेशीर ठरेल. व्यवसायात कामाचा उरक दांडगा राहील. आर्थिक लाभ हरतऱ्हेने होतील. नवीन कामामुळे नवीन कार्यक्षेत्राशी परिचय होईल. नोकरीत वरिष्ठांनी दिलेला शब्द ते पाळतील. केलेल्या कामाचे कौतुकही करतील. कलाकार, खेळाडूंना आपले नैपुण्य दाखवण्याची संधी मिळेल. महिलांना वैवाहिक सुख मिळेल. घरात वातावरण चांगले राहील. आरोग्य सुधारेल.

कन्या : शुक्र, शनी अनुकूल आहेत. व्यवसायात विस्ताराचे बेत घोळतील. अधिक गुंतवणूक कराल. नशिबाची साथही मिळेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. नवीन प्रशिक्षणासाठी निवड होईल. महिलांचा पाहुण्यांची सरबराई करण्यात वेळ जाईल. चांगली बातमी कळेल. कुटुंबासमवेत छोटी सहल काढाल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

तूळ : धीर धरलात तर सर्व सुरळीत होईल. व्यवसायात द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचे मार्गदर्शन अवश्‍य घ्यावे. हातातील कामे वेळेत पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळावे. नोकरीत तडजोडीचे धोरण हितावह ठरेल. मनाविरुद्ध वागावे लागेल. संयम व सहनशीलता दाखवून कामे मार्गी लावाल. सणासमारंभानिमित्त महिलांच्या भेटीगाठी होतील.

वृश्‍चिक : नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात इतरांना कठीण वाटणारी कामे स्वतः हाती घेऊन पूर्ण कराल. आर्थिक प्रश्‍न धसास लागतील. मानसिक समाधान मिळेल. नोकरीत कामानिमित्त प्रवास घडेल. कार्यक्षमता वाढवून कामे संपवाल. महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. कामामुळे इतरांची मने जिंकून घ्याल, फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.

धनू : आत्मविश्‍वास व चिकाटीच्या जोरावर प्रगती कराल. व्यवसायात वेळेचा व संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. नवीन कामे मिळतील. नोकरीत संयमाने प्रलोभनांपासून दूर राहावे. स्वतःची कामे संपवून इतरांनाही कामात सहकार्य कराल. नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. महिलांना मनाप्रमाणे खर्च करता येईल. आनंदवार्ता समजतील. घरात प्रसन्नता राहील. गृहसौख्य मिळेल.

मकर : आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केल्यामुळे कामाचा तणाव कमी होईल. व्यवसायात व्यवहारी राहून बचतीकडे लक्ष द्याल. कामात कल्पकता दाखवून कामे मार्गी लावाल. नोकरीत कामात इतरांना मदत कराल. नव्या उमेदीने कामाला लागाल. शेअर्समधून विशेष लाभ होईल. घरात नवीन खरेदीचे मनसुबे ठरतील. महिलांना कौटुंबिक सौख्याचा आनंद मिळेल; शिवाय प्रकृतीची साथही मिळेल.

कुंभ : व्यवसायात बदल करून तो वाढवण्याकडे कल राहील. आर्थिक बाजू सशक्त असण्यासाठी तात्पुरत्या कर्जाची सोय कराल. कार्यतत्पर राहून कामे मार्गी लावाल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांशी जमवून घ्यावे लागेल. परदेशगमनास योग्य काळ. लेखक, कलावंतांना प्रसिद्धी मिळेल. महिलांना वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी अधिक श्रम पडतील, मात्र मेहनतीला फळ मिळेल. चांगली बातमी कळेल.

मीन : व्यवसायात मेहनतीवरच भर द्यावा लागेल. कामात कार्यतत्परता दाखवून कामे करण्यावर भर राहील. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामात इतरांचे सहकार्य मिळवाल. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. सामंजस्याने वागून सलोख्याचे संबंध ठेवाल. महिलांना आनंदाची बातमी कळेल. प्रवास लाभदायक होईल. जुन्या मित्रमैत्रिणींच्या, आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. उत्साही राहाल.

संबंधित बातम्या