ग्रहमान : १५ ते २१ फेब्रुवारी २०२०

अनिता केळकर
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

ग्रहमान

मेष : केलेल्या कामाचे श्रेय निश्‍चित मिळेल. कामाचे वेळेनुसार केलेले नियोजन यश द्विगुणीत करेल. व्यवसायात कामात गती येण्यासाठी आवश्‍यक ते बदल कराल. भेटीगाठी व प्रवास कराल. योग्य वेळी योग्य व्यक्तींची केलेली निवड भविष्यात लाभदायी ठरेल. नोकरीत नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. बेकार व्यक्तींनी कामासाठी प्रयत्न करावेत. घरात काही प्रश्‍नांमध्ये मार्ग सापडेल. शुभकार्ये ठरतील. कलाकार, खेळाडूंच्या कष्टाचे चीज होईल.

वृषभ : घर व व्यवसाय दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात इतरांशी कसे जुळवून घेता यावर सर्व भिस्त अवलंबून राहील. नवीन करारमदार कराल. नोकरीत नेहमीपेक्षा वेगळे काम हाताळण्याची संधी मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल. घरात आप्तेष्ट, नातेवाईक यांची ये-जा राहील. घरगुती प्रश्‍न हाती घेऊन धसास लावाल. प्रकृतीचे तंत्र सांभाळावे लागेल. तरुणांनी मनपसंत जोडीदार शोधण्यास हरकत नाही. सणसमारंभानिमित्त महिलांच्या भेटीगाठी होतील.

मिथुन : कौटुंबिक व आर्थिक बाबतीतील तणाव कमी झाल्याने हायसे वाटेल. तुमच्यात काम करायला जोश व उत्साह निर्माण होईल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. फायद्याचे प्रमाण वाढेल. जीवनात नवे ध्येय गाठण्याची मनीषा निर्माण होईल. नोकरीत कामात लवचीक धोरण स्वीकाराल. वरिष्ठांना तुमची गरज भासेल. कामानिमित्त मागण्या मान्य करून घ्याल. घरात कामात सतर्क राहाल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. महिलांना कलागुण दाखविण्याची संधी मिळेल.

कर्क : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन पूर्ण कराल. व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. पूर्वीची देणी देण्यासाठी सतत सतर्क राहावे लागेल. नोकरीत वरिष्ठ कामात सवलती देतील, त्याचा लाभ घ्यावा. कामाचा भार हलका झाल्याने मानसिक समाधान मिळेल. जुन्या प्रॉपर्टीमधून लाभ व्हावा. घरात महत्त्वाची जबाबदारी व कर्तव्य पार पाडावी लागतील. लांबलेली शुभकार्ये व समारंभ पार पडतील. तरुणांचे विवाह ठरतील. स्वप्ने साकार होण्याची शक्‍यता.

सिंह : मुंगीच्या पावलाने प्रगती करून ध्येय गाठाल. धीराने वाटचाल कराल. व्यवसायात कामाच्या वेळी काम करून इतर वेळी जीवनाचा आस्वाद घ्यायचा तुमचा इरादा असेल. केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. नोकरीत एखादी चांगली संधी वरिष्ठ तुम्हाला देतील, त्याचा लाभ घ्यावा. पूर्वी केलेल्या कामाचे आर्थिक स्वरूपात फळ मिळेल. व्यवसायातून विशेष लाभ होतील. घरात आनंदाचा प्रसंग साजरा कराल. कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी झोतात राहता येईल. आरोग्य चांगले राहील.

कन्या : पैशांच्या व्यवहारात अत्यंत चोखंदळ असता. त्यामुळे व्यवसायात डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून कामे केलीत, तर फायदा होईल. सध्या येणारे पैसे मिळण्यास जरी विलंब झाला, तरी चिडचिड करू नये. कामात थोडाफार ताण जाणवेल. गिऱ्हाइकांनी संबंध बिघडू न देता गोड बोलून वसुली करावी. नोकरीत जे झेपेल तेच काम करावे. वरिष्ठ व सहकाऱ्यांना आश्‍वासन देण्यापूर्वी स्वतःची क्षमता ओळखावी. घरात 'मानले तर समाधान' असे धोरण ठेवावे. गरजा भागवण्याचा प्रयत्न करावा.

तूळ : तुमच्या मनातील इच्छा व महत्त्वाकांक्षा वाढीला खतपाणी घालणारे ग्रहमान लाभल्याने आर्थिक स्थिरताही लाभेल. व्यवसायात मोठी उडी घेण्याची तुमची मनीषा असेल. खूप पैसे मिळतील. तेवढेच कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीत कामानिमित्त परदेशगमनाची संधी येईल. विचार करून निर्णय घ्यावा. घरात तरुणांचे विवाह पार पडतील. सलोख्याच्या वातावरणाने आनंद मिळेल; आनंदाचे कौटुंबिक स्वास्थ्याचे क्षण उपभोगाल.

वृश्‍चिक : जीवनाला एक नवी दिशा मिळेल. तुमच्या सुप्त इच्छा आकांक्षांची पूर्तता होईल. ग्रहांची साथही उत्तम मिळेल. व्यवसायात पैसे मिळण्यास विलंब होईल. त्यामुळे थोडी धावपळ होईल. पण जे मिळेल त्याचा आनंद घ्यावा. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. हितचिंतक मदत करतील. नोकरीत रेंगाळलेली कामे पूर्ण कराल. नवीन कामे स्वीकारताना वरिष्ठांना त्याबद्दलची माहिती विचारावी. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे थोडी कुरबुर होण्याची शक्‍यता आहे. डोके शांत ठेवावे.

धनू : ज्या कामांना गती यावी व जी कामे सुधारणा होऊन पूर्ण व्हावीत असे वाटते, अशा कामांना प्राधान्य द्यावे. व्यवसायात चित्र सुधारेल. कार्यपद्धतीत बदल करून फायदा वाढवता येईल. संयम व सहनशीलता दाखवली तर कामे मार्गी लागणतील. कामातील अडथळे कमी झाल्याने उत्साही राहाल. घरात छोटी पार्टी व समारंभ कराल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. महिलांना अध्यात्मिक प्रगती करता येईल. वातावरण आनंदी राहील.

मकर : विचार व कृती यांचा योग्य तो समन्वय साधून कामे करावी. सर्व आघाड्यांवर सजग राहणे गरजेचे होईल. व्यवसायात पैशांच्या मागे लागू नये. तसेच तुमच्या आवाक्‍याबाहेर जाऊन धोका पत्करू नये व धाडसही करू नये. योग्य वेळी योग्य व्यक्तींची मदत लाभदायी ठरेल. नोकरीत मिळालेल्या अधिकाराचा वापर जपून करावा. कमी श्रमात जास्त यश मिळवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती मिळण्याची शक्‍यता आहे. घरात सुखासमाधानासाठी थोडा वेळ व पैसे खर्च कराल.

कुंभ : ध्येय धोरणे ठरवून त्याप्रमाणे पावले टाकलीत, तर फायदा तुमचाच होईल. व्यवसायात महत्त्वाचे करार होतील. कामाचा उत्साह वाढेल. नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. रेंगाळलेली कामे गती घेतील. घरात पैशांची कुमक लाभल्याने मनाप्रमाणे खर्च करता येईल. इतरांच्या मागण्या मान्य कराल. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. कलाकार, खेळाडूंना कार्यक्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. पाहुण्यांची सरबराई करण्यात महिलांचा वेळ जाईल.

मीन : ग्रह अनुकूल आहेत. त्यामुळे सतत आघाडीवर राहून प्रगती करण्याची तुमची मनीषा सफल होईल. व्यवसायात आर्थिक अडचणी आल्या तरी त्यावर मात कराल. तांत्रिक अडथळ्यांवर जिद्दीने यश मिळवाल. कामाचे योग्य नियोजन लाभदायी ठरेल. नोकरीत आजची कामे आजच केलीत, तर फायदा होईल. मनोधैर्य चांगले राहील. जादा कामातून पैसे मिळवता येतील. घरात गोडीने वागून इतरांकडून कामे करून घ्याल. प्रकृतीचे तंत्र सांभाळावे लागेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

संबंधित बातम्या