ग्रहमान : २२ ते २८ फेब्रुवारी २०२०

अनिता केळकर
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

ग्रहमान

मेष : तुमचे मनोधैर्य चांगले असल्याने अडथळ्यांवर मात कराल. व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी काही ठोस पावले उचलाल, त्याचा फायदा तुम्हालाच होईल. नोकरीत कामे स्वीकारताना स्वतःची पात्रता ओळखून पुढे जावे. नोकरदारांना कामानिमित्त प्रवास संभवतो. कलावंतांना प्रसिद्धीचे योग येतील. कवी, साहित्यिकांच्या हातून उत्तम लेखन होईल. महिलांनी भोवतालच्या व्यक्तींशी होणारे वादविवादाचे प्रसंग टाळावेत. विद्यार्थ्यांपुढे भविष्याबाबत कोडे निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

वृषभ : कामाच्यावेळी काम व इतर वेळी आराम असे धोरण असेल. आर्थिक घडी नीट बसण्यासाठी प्रयत्नशील राहाल. व्यवसायात उधारी वसुलीकडे लक्ष केंद्रित करावे. पैसा चांगला मिळेल, परंतु खर्चही तसाच असेल. नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्‍वासने ते पाळतील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपवतील. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना कौटुंबिक सौख्य उत्तम मिळेल. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या भेटीचे योग. 

मिथुन : कर्तव्याला प्राधान्य देऊन अवघड कामे मार्गी लावाल. व्यवसायात स्वतःचे वेगळेपण सिद्ध कराल. आर्थिक उन्नती झाल्याने कार्यक्षमता वाढेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' हे धोरण ठेवावे. मात्र वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे लागेल. बेरोजगारांना कामाची संधी मिळेल. शेअर्सच्या व्यवहारात फायदा संभवतो. महिलांना कौटुंबिक जीवनात सहजीवनाचा आनंद मिळेल. नवीन जागा, वास्तू, वाहन खरेदीचे योग. 

कर्क : ग्रहमान अनुकूल असल्याने आर्थिकदृष्ट्या विशेष लाभ होईल. व्यवसायात विस्ताराचे बेत साकार होतील. पूर्वी केलेल्या कामातून पैसे मिळतील. अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. सुखसुविधा मिळतील. परदेशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. तरुणांचे विवाह जमतील. महिलांचा दिनक्रम धावपळ दगदगीचा राहील. मात्र छंदात वेळ मजेत घालवतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. घरगुती कार्यक्रम होतील. 

सिंह : व्यवसाय-उद्योगात खेळत्या भांडवलाची सोय होईल. मनातील सुप्त इच्छा-आकांक्षा सफल होतील. कामात उलाढाल वाढेल व फायद्याचे प्रमाणही वाढेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत तुमच्या कौशल्याला पुरेपूर वाव मिळेल. सहकारी व वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल. बेरोजगारांना काम मिळेल. महिलांचा वेळ घरसजावटीमध्ये जाईल. भावंडांचे सुख उत्तम मिळेल. विद्यार्थ्यांनी मनोनिग्रह करावा. 

कन्या : आशा व निराशा या दोन्हींचा अनुभव येईल. आनंदाची बातमी नवीन आशा पल्लवीत करेल, तर एखादी घटना मन साशंक करेल. व्यवसायात कामाची योग्य आखणी करून कामे वेळेत संपवावी. उधार उसनवार टाळावे. व्यवहार चातुर्यामुळे काही क्षेत्रांत उत्तम यश मिळेल. नोकरदार व्यक्तींनी तापट स्वभावावर नियंत्रण ठेवावे. नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे. व्यवसायातून विशेष फायदा होईल. महिलांनी कामाचा बाऊ न करता कामे उरकावीत व जमल्यास छोटासा फेरफटका मारून पुन्हा ताजेतवाने व्हावे. 

तूळ : व्यवसायात प्रगतीचा वेग उत्तम राहील, त्यामुळे नवीन गुंतवणूक करणे गरजेचे होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नवीन आवक वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. नोकरीत मनाप्रमाणे कामे केल्याचा आनंद मिळेल. परदेशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. महिलांनी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नयेत. प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थी चिकाटीने ज्ञानार्जन करतील व यशही संपादन करतील. 

वृश्‍चिक : आत्मविश्‍वासाने नवीन कामे हाती घ्याल. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून फायद्याचे प्रमाण वाढवाल. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. बढती मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. बेरोजगारांना काम मिळेल. महिलांचा वेळ एखाद्या छंदात मजेत जाईल. जिवाभावाची माणसे भेटल्याने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान. 

धनू : व्यवसायात व नोकरीत लवचित धोरण ठेवाल. जशी कामाची गरज असेल, तसे कामाचे नियोजन कराल. व्यवसायातील तांत्रिक अडथळे दूर करून कामे वेळेत बिनचूक पूर्ण कराल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे कराल. कामानिमित्त सवलती मिळतील, त्याचा गैरफायदा घेऊ नये. छोटा प्रवास घडेल. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी. दगदग, धावपळ करू नये. अतिस्पष्टवक्तेपणा टाळावा. 

मकर : व्यवहारी धोरणाचा अवलंब करून व्यवसायात फायदा मिळवाल. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामे हाती घ्याल व तडीस न्याल. जुनी येणी वसूल होतील. व्यापारांना यशाचा काळ. खर्चावर नियंत्रण ठेवावे. नोकरीत महत्त्वाची कामे वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. अशक्‍य वाटणाऱ्या कामात यशश्री संपादन कराल. दगदग, धावपळ वाढेल. महिलांना मुलांच्या प्रगतीविषयी चांगली बातमी कळेल. शुभकार्ये ठरतील. तरुणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण वाटेल.

कुंभ : या सप्ताहात तुमच्याबाबतीत 'प्रयत्न वाळूचे कण रगडिता, तेलही गळे' ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल. जादा कामातून उत्पन्न मिळेल. हितचिंतकांच्या मदतीतून कामे मिळतील. नोकरदार व्यक्तींना सहकारी व वरिष्ठांशी जमवून घ्यावे लागेल. कामानिमित्त दूरचे प्रवास व परदेशवारीही होईल. महिलांचा वेळ पाहुण्यांच्या तैनातीत जाईल. घरात नातेवाईक, प्रियजन आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. मोठी खरेदी कराल. 

मीन : नशीब व प्रयत्न यांची सांगड घालून कामातील प्रगतीचा वेग वाढवाल. कामातील अडथळ्यांवर आत्मविश्‍वासाने मात कराल. व्यवसायात तुमच्या हौशी स्वभावाचा फायदा होईल. खरेदी वाढेल. जितके काम जास्त तितकी कमाई जास्त कराला. आर्थिकमान उंचावेल. नोकरीत विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क होईल व त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होईल. महिलांचा कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. काम करण्यात मजा वाटेल. प्रकृतीमान उत्तम राहील. चांगली बातमी कळेल.

संबंधित बातम्या