ग्रहमान : ७ ते १३ मार्च २०२०

अनिता केळकर
सोमवार, 9 मार्च 2020

ग्रहमान
 

मेष : तुमच्या साध्या सरळ स्वभावाचा उपयोग चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी होईल. बरेच प्रश्‍न मार्गी लागतील. व्यवसायात माणसांची खरी पारख मोलाची ठरेल. हातातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सज्ज रहावे. आर्थिक व्यवहारात गाफील राहू नये. नोकरीत कामाचा अंदाज घ्यावा, नंतरच वरिष्ठांपुढे मागण्या मांडाव्यात. वरिष्ठांच्या सल्ल्याखेरीज महत्त्वाच्या कामात लक्ष घालू नये. घरात अनावश्‍यक खर्च वाढेल. तरुणांनी अतिसाहस करू नये.

वृषभ : महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. त्यामुळे तुमच्या यशाचे प्रमाण वाढेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल. आधुनिकीकरण करून उलाढाल वाढवाल. मेहनतीचे योग्य फळ मिळाल्याने आनंद वाटेल. नोकरीत कामाची योग्य संधी येईल. नव्या कामांसाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. घरात पूर्वी लांबलेले कार्यक्रम पार पडतील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धीबरोबर स्पर्धकांची असूयाही बघायला मिळेल.

मिथुन : तुमच्या कलाकौशल्याला भरपूर वाव मिळाल्याने तुमच्या क्षेत्रात मानमरातब मिळवाल. तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्यांचा ताण कमी होईल. व्यवसायात स्पर्धेला सतत तोंड देण्यासाठी सज्ज रहावे लागेल. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठांच्या सूचना नीट समजून घ्याव्यात. भावनेपेक्षा कृतीला प्राधान्य द्यावे. अंथरूण पाहून पाय पसरावे. घरात खर्चावर नियंत्रण ठेवावे. कुटुंबासमवेत काही क्षण आनंदाचे घालवाल. तब्येतीची काळजी घ्यावी. सामूहिक क्षेत्रात यश व प्रसिद्धी मिळेल.

कर्क : चांगल्या व वाईट दोन्ही अनुभवांतून जावे लागेल. व्यवसायात कामाचा ताण जाणवेल. आर्थिक स्थितीही फारशी अनुकूल नाही. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावे लागतील. नको त्या कामात तुमचा बराच वेळ गेल्यामुळे कामाचा मनस्वी कंटाळा येईल. नोकरीत कितीही काम केले, तरी वरिष्ठांचे समाधान होणार नाही. जुने प्रश्‍न लक्ष वेधून घेतील. घरात मानसिक अस्वस्थता जाणवेल. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.

सिंह : तुमच्या मानी स्वभावाला थोडी मुरड घालून लवचीकता स्वीकारावी लागेल. व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घेतलात, तर लाभ तुमचाच होईल. आळस कामाचा शत्रू आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे होईल. नोकरीत गाफील राहून चालणार नाही. अति आत्मविश्‍वास टाळावा. सडेतोड बोलून इतरांचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. घरात नव्या जुन्या हितसंबंधांना वेगळी कलाटणी मिळेल. सुखासिनता वाढेल. नवीन वास्तूत राहावयास जाण्याचे योग येतील.

कन्या : ग्रहांची अनुकूलता प्रगतीच्या दृष्टीने चांगली आहे. त्यामुळे तुम्ही उत्साही व आनंदी समाधानी राहाल. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. हितशत्रूंवर बारीक नजर ठेवणे गरजेचे होईल. गैरसमजुतीने होणारे घोटाळे टाळावेत. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व कळून आल्याने मान मिळेल. घरात दगदग, धावपळ कमी करावी. खाण्यापिण्यावर बंधन ठेवावे. कलाकार, खेळाडूंना नैपुण्य मिळेल.

तूळ : तुमच्या उतावीळ स्वभावाला थोडा आवर घातलात, तर फायदा तुमचाच आहे. व्यवसायात तुमची ऊर्मी व जिद्द वाखाणण्याजोगी असेल. पूर्वी केलेल्या कामाचे फळ आता हाती येईल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत कामानिमित्त प्रवास घडेल. परदेशगमनासाठी सुयोग्य कालावधी आहे. जोडव्यवसायातून विशेष कमाई होईल. तुमच्या शब्दाला मान मिळाल्याने आनंद होईल. घरात गृहसजावटीसाठी चार पैसे जादा खर्च होतील. नवीन वास्तूत राहायला जाण्याची शक्यता.

वृश्‍चिक : सर्व आघाड्यांवर सतर्क राहून जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना गती द्यावी. ज्या कामांसाठी तुम्ही धडपड करत होता, ती कामे मिळण्याची शक्‍यता आहे. पूर्वी केलेल्या कामातून वसुली होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. अर्धवट कामे मार्गी लागतील. नव्या ओळखी होतील. घरात वाद संपुष्टात येतील. पाहुण्यांची ये-जा राहील. तरुणांचे विवाह ठरतील. सामूहिक कामात प्रतिष्ठा मिळेल.

धनू : आवकपेक्षा जावक वाढेल. परंतु, तीही चांगल्या कारणासाठी असल्याने मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात नवीन कामांना गती द्यावी. सकारात्मक भूमिका अवलंबून कामाचे योग्य नियोजन करावे. नोकरीत सहकारी कामाचा ताण कमी करायला मदत करतील. जोडव्यवसायातून विशेष कमाई करता येईल. बेरोजगार व्यक्तींना नवीन काम मिळेल. घरात मुलांच्या प्रगतीसाठी पैसे खर्च करावे लागतील. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत आखाल. चांगली बातमी कळेल.

मकर : जुने रेंगाळलेले प्रश्‍न हाती घेऊन त्यात यश संपादन कराल. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल्याने आनंद वाटेल. महत्त्वाकांक्षा वाढेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी तुमची खुशामत करतील. आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना, हे मात्र बघावे. बेरोजगारांना काम मिळेल. जोडव्यवसायाची संधी लाभेल. घरात खर्चांवर नियंत्रण ठेवू शकाल. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. प्रकृतीचे तंत्र सांभाळावे लागेल.

कुंभ : व्यवसाय व घर या दोन्हींबाबत तुम्हाला सतर्क रहावे लागेल. व्यवसायात प्रगतीच्या दृष्टीने पावले उचलाल. मनातील सुप्त इच्छा साकार करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. बरेच दिवस हुलकावणी देणारे यश नजरेच्या टप्प्यात तुमची निवड करतील. त्यासाठी जादा सवलती व अधिकारही देतील. प्रवासाचे योग येतील. घरातील कामे संपवाल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. मोठ्यांच्या प्रकृतीची चिंता राहील. पाहुण्यांची ये-जा राहील.

मीन : मृगजळाच्या मागे न लागता वस्तुस्थिती जाणून त्याप्रमाणे कृती कराल. व्यवसायात अनेक अडचणी/विवंचना यावर मात कराल. वातावरण निवळू लागल्याने तुमच्यातील आत्मविश्‍वास वाढेल. प्रत्येक आघाडीवर प्रगतीचे स्वप्न पाहाल. नोकरीत नवीन संधी दृष्टिक्षेपात येईल. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. मनाप्रमाणे खर्च करता येईल. घरात प्रियजनांच्या भेटीचे योग जीवनातील आनंदाचे क्षण साजरे कराल. तरुणांचे विवाह ठरतील.

संबंधित बातम्या