ग्रहमान : १४ ते २० मार्च २०२०

अनिता केळकर
सोमवार, 16 मार्च 2020

ग्रहमान

मेष : तुमचा उत्साह दिवसेंदिवस वाढत जाईल. व्यवसायात नवीन कामे मिळतील, त्याचा लाभ घ्यावा. आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन गुंतवणुकीचे पर्याय मनात येतील. नोकरीत विचारांमध्ये संभ्रम राहील. वरिष्ठांच्या उलटसुलट सूचनांमुळे कामात चुका होण्याची शक्‍यता राहील. जुनी येणी वसूल झाल्याने पैशांची चिंता मिटेल. घरात ''शब्द हे शस्त्र आहेत'' हे लक्षात ठेवावे; शिवाय रुसवे फुगवे सहन करावे लागतील. महिलांनी मानले, तर समाधान मिळेल. 

वृषभ : तुमच्यातील रसिकता जागृत होईल. ग्रहांची साथही लाभेल. मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायात रेंगाळलेल्या कामांना गती येईल. कामात तुमचा पुढाकार राहील. आर्थिक स्थितीही समाधानकारक राहील. नवीन केलेली गुंतवणूक लाभदायी ठरेल. नोकरीत विशेष सवलती मिळतील, लाभ घ्यावा. नवीन संधीसाठी तुमची निवड होईल. नवीन नोकरीच्या कामात गती येईल. घरात शुभकार्ये ठरतील व पारही पडतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. कुटुंबासमवेत छोटी सहल काढाल.

मिथुन : या सप्ताहात सहज सोप्या वाटणाऱ्या कामात अनपेक्षित अडचणी येतील, तरी पर्यायी व्यवस्था करून कामे मार्गी लावावी. व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे पूर्ण करावी. भोवतालच्या परिस्थितीनुरूप कामात बदल करून प्रगती करावी. नोकरीत, कामात केलेला आळस वरिष्ठ सहन करणार नाहीत. सहकारी व वरिष्ठांची आवश्‍यक वाटल्यास मदत घेता येईल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. सर्वांना खूश ठेवण्याचा तुमचा प्रयत्न राहील. महिलांना पाहुण्यांची सरबराई करावी लागेल.

कर्क : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात पूर्वीच्या कामांचा व जुन्या हितसंबंधांचा नवीन काम मिळवण्याकरता बराच उपयोग होईल. केलेल्या कामाचे ताबडतोब पैसे मिळतील ही अपेक्षा नसावी. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे. नवीन कामे पूर्ण करताना ज्येष्ठांचा सल्ला घेतला, तर फायदा होईल. घरात तुमच्या विचारांना इतरांचा विरोध राहील, परंतु नंतर सहकार्य मिळेल. बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. प्रकृतीमान सुधारेल.

सिंह : तुमच्यातील जिद्द व महत्त्वाकांक्षा उफाळून येईल. व्यवसायात तुमच्या डोळ्यासमोर मोठे उद्दिष्ट असेल. मात्र, स्वतःची शारीरिक व आर्थिक क्षमता ओळखून कामे हाती घ्यावीत. पैशांच्या व्यवहारात चोख राहावे. उधारउसनवार शक्‍यतो टाळावेत. नोकरीत प्रगतीसाठी काम करावे लागेल. व्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात प्रियजनांच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरे होतील. मोठ्या व्यक्तींच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. महिलांची विनाकारण धावपळ वाढेल.

कन्या : माणसांची पारख तुम्हाला करता आली, तर तुम्ही बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात कामात दक्ष राहावे. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे खुबीने सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. परिस्थितीनुरूप कामात लवचीक धोरण ठेवावे. नोकरीत चांगल्या संधीसाठी तुमची निवड होईल, त्याचा लाभ घ्यावा. कामात गुप्तता राखावी. नवीन कामे मिळतील. घरात मनाप्रमाणे खरेदी कराल. करमणूक, मनोरंजनाचे कार्यक्रम यात महिलांचा वेळ मजेत जाईल. प्रकृतीमान सुधारेल.

तूळ : तडजोडीचे धोरण ठेवून शांत चित्ताने कामाचे नियोजन केलेत, तर लाभ होईल. व्यवसायात हातातील कामे संपवून मगच नवीन कामांकडे वळावे. आर्थिक गोष्टींचा परामर्श घ्यावा. आहे त्यात समाधान मानलेत, तर बरेच काही मिळवू शकाल. नोकरीत महत्त्वाच्या कामात इतरांवर अवलंबून न राहता अशी कामे स्वतः हाताळावी. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. प्रवासाचे योग येतील. घरात शुभकार्ये ठरतील. महिलांचा पाहुण्यांचे आदरातिथ्य व खरेदी करण्यात वेळ जाईल. खर्चाचे बजेट कोलमडेल.

वृश्‍चिक : तांत्रिक अडथळ्यांमुळे कामांना विलंब होईल. स्वयंसिद्ध राहून कामे करण्याचा अट्टहास सोडावा लागेल. योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करणे गरजेचे होईल. व्यवसायात जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग करून फायद्याचे प्रमाण वाढवता येईल. आर्थिक चिंता मिटेल. नोकरीत तुमचे काम तुम्हाला योग्य पद्धतीने करावे लागेल. वरिष्ठांच्या दिलेल्या आश्‍वासनांवर फारसे अवलंबून राहू नये. घरात नको त्या कामात वेळ जाईल. नाइलाजास्तव सढळ हात सोडावा लागेल.

धनू : सकृतदर्शनी सर्व काही चांगले राहील, परंतु अनपेक्षित येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मात्र सज्ज राहावे. व्यवसायात सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून त्याप्रमाणे कामे हाती घ्यावीत. कामगारांकडून जास्त अपेक्षा ठेवण्यापूर्वी त्यांच्या मागण्यांचा विचार करावा. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. नोकरीत इतरांकडून मदतीची अपेक्षा न ठेवता तुम्हाला झेपेल तेवढेच काम करावे. कमी श्रमात जास्त यश मिळवण्याचा तुमचा मानस राहील.

मकर : तुम्हाला उत्साही करणारे ग्रहमान आहे. व्यवसायात बऱ्याच गोष्टी मार्गी लावू शकाल. हितचिंतक व मध्यस्थ यांचा उपयोग नवीन कामे मिळवताना होईल. आर्थिक चिंता मिटेल. मनोकामना पूर्ण होईल. नोकरीत आवश्‍यक तेवढेच काम करण्याचा विचार असेल. व्यवसायातून लाभाची शक्‍यता राहील. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरातील व्यक्तींसाठी व स्वतःसाठी थोडा वेळ काढावा असा विचार येईल. विचार न करता त्याची ताबडतोब अंमलबजावणीही कराल. महिलांना शांतताही मिळेल.

कुंभ : घर व व्यवसाय या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा साधारण राहील. तरीही तुमचा प्रयत्न सुरूच असेल. कामांची आखणी करून त्याप्रमाणे कामे हाती घ्याल. नोकरीत कामाचा आळस येईल, त्यामुळे कामे पुढे ढकलण्याकडे तुमचा कल राहील. नवीन वाहन, वास्तू खरेदीच्या दृष्टीने मात्र हा सप्ताह महत्त्वाचा राहील. घरात स्वास्थ्य टिकवण्याचे तुमचे प्रयत्न सफल होतील. हवापालट करण्यासाठी कौटुंबिक सहल काढाल.

मीन : तुमच्या सुप्त इच्छा सफल होतील. व्यवसायात कामांचे नियोजन योग्य प्रकारे करावे. नाहीतर गोंधळ होण्याची शक्‍यता राहील. कोणताही निर्णय घेताना घाईने घेऊ नये. योग्य व्यक्तींचा संपर्क होण्यासाठी तुमची बरीच धावपळ होईल. नोकरीत आवश्‍यक सुविधा मिळतील. कामातील तुमचा उत्साह वाढेल. घरात किरकोळ कारणाने होणारे वाद टाळावेत. सर्वांशी मिळतेजुळते धोरण ठेवून कामे करावीत. मुलांकडून चांगली बातमी कळेल. मानसिक समाधान राहील. प्रकृतीमान सुधारेल.

संबंधित बातम्या