ग्रहमान : २१ ते २७ मार्च २०२०

अनिता केळकर
सोमवार, 23 मार्च 2020

ग्रहमान
 

मेष : सप्ताहात तुम्हाला निश्‍चयाने मार्गक्रमण करावयाचे आहे, हे लक्षात ठेवावे. कोणत्याही मोहाला बळी न पडता कामाचे नियोजन करावे. व्यवसायात नवीन कामे मिळतील. हितचिंतकांच्या मदतीने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. वरिष्ठांची मर्जी राहील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील आणि त्यासाठी विशेष सवलतही देतील. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळण्याची संधी चालून येईल. घरात तुमचा मूड चांगला राहील. प्रकृतीमान सुधारेल.

वृषभ : अंधारात आशेचा किरण दिसल्याने आशावाद जागृत होईल. व्यवसायात प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून उलाढाल वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. विक्री व फायद्याचे प्रमाण वाढेल. पैशांची चिंता कमी होईल. नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करणे फायद्याचे राहील. प्रगतीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी राहील, तरीही लवचीक धोरण स्वीकारून पुढे जावे. घरात वैचारिक मतभेदाचे प्रसंग आले, तरी जास्त विचार करू नये. अनावश्‍यक खर्चांना फाटे द्यावे. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.

मिथुन : कामातील मरगळ दूर करून महत्त्वाची कामे मार्गी लावावी. व्यवसायात हातातील पैशांचा विनियोग योग्य कारणासाठीच करावा. उधार उसनवार शक्‍यतो टाळावे. नवीन कामे दृष्टिक्षेपात असतील. नोकरीत अतिआत्मविश्‍वास टाळावा. नेहमीच्या कामांकडे दुर्लक्ष करू नये. वरिष्ठ व सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल ही अपेक्षा ठेवू नये. घरात हौसेमौजेसाठी खर्च वाढेल. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष ठेवावे लागेल. प्रियजनांच्या जीवनातील आनंदाचे क्षण साजरे होतील.

कर्क : मनोबल वाढेल, त्यामुळे कामात यशाची खात्री वाढेल. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तीचे नवीन अनुभव येतील, तेव्हा कामात स्वयंसिद्ध राहावे. पैशांची तजवीज होईल. नोकरीत कष्टदायक काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. मनाविरुद्ध वागावे लागेल. परंतु, तुमचा नाइलाज राहील. कामानिमित्त प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. घरात आपलेच म्हणणे बरोबर हा खाक्‍या नको. वादाच्या प्रसंगापासून लांब राहावे. प्रकृतीची कुरबुर राहील, लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी झटून अभ्यास करावा.

सिंह : अडचणींवर यशस्वीपणे मात करून प्रगती कराल. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण करावीत. नवीन योजना तुम्हाला आकर्षित करतील. परंतु, त्यातील धोक्‍यांचाही विचार आधी करावा. गुंतवणुकीपूर्वी माहिती काढावी. नोकरीत आळस करून कामे लांबवलीत, तर त्रास तुम्हालाच होईल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फार चिकित्सा करू नये. हातातील पैशांची बचत करावी. घरात गरज असेल तेव्हाच खर्च करावा.

कन्या : विचार व कृती यांची सांगड घालून कामात गती घ्याल. व्यवसायात आधुनिक मार्गाचा अवलंब करून उलाढाल वाढवाल. तुमचा दृष्टिकोन व्यापक राहील. त्यामुळे, परिस्थितीनुरूप बदल कराल. हितचिंतकांची मदत मिळेल. जुनी येणी वसूल झाल्याने पैशांची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या बुद्धीला चालना देणारे काम मिळेल. केलेल्या कामाचे समाधान लाभेल. सर्वजण कामाचे कौतुक करतील. घरातील व्यक्तींच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरा होईल. नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.

तूळ : 'नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न' ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायात कामात सजगवृत्ती ठेवून कृती करावी. अतिविश्‍वास टाळावा. हातातील कामे वेळेत संपवण्याचा विशेष प्रयत्न करावा. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही ठोस उपाय योजावेत. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल, तरीही कामांची पूर्तता करावी लागेल. स्वार्थ व परमार्थ साधून जमतील ती कामे करावीत. घरात उगीचच चिडचिड न करता सलोख्याचे वातावरण ठेवावे. स्वतःचे स्वास्थ्य जपण्यासाठी विशेष काळजी घ्यावी.

वृश्‍चिक : कामाच्या वेळी काम करून इतर वेळी आराम करण्याकडे कल राहील. व्यवसायात पूर्वीच्या कामाचे पैसे मिळतील. जादा भांडवलाची सोयही होईल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चौफेर नजर ठेवावी. योग्यवेळी योग्य निर्णय घ्यावा. नोकरीत किचकट कामे सहकाऱ्यांवर ढकलून आवडणारी कामे कराल. जोडव्यवसायातून विशेष कमाई करता येईल. घरात गृहसजावटीसाठी बरेच पैसे खर्च होतील. तरुणांचे विवाह ठरतील, मानसिक स्वास्थ्य जपता येईल. चांगली बातमी कळेल.

धनू : कामाचा तुमचा झपाटा उत्तम राहील, तरीही वेळ मिळेल, तेव्हा जीवनाचा आनंद घेण्याकडे कल राहील. व्यवसायात मनोकामना सफल होतील. कामाचा वेग व कामाचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न राहतील. पैशांची चिंता नसेल. नवीन कामेही असतील. नोकरीत तुमच्या कामाचे महत्त्व वरिष्ठांना जाणवेल, त्यामुळे ते तुम्हाला खूश ठेवतील. नवीन ओळखीचा उपयोग होईल. प्रवासाचे योग संभवतात. घरात तडजोडीचे धोरण हितावह ठरेल. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

मकर : कामाला योग्य प्रतिसाद मिळाल्याने तुमचा हुरूप वाढेल. कठीण कामातही यश संपादन कराल. व्यवसायात आर्थिक स्थिती फारशी चांगली नसली, तरी खेळत्या भांडवलावर कामे पूर्ण करता येतील. निकडीच्या गरजा भागवता येतील. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. नोकरीत कामाचा ताण वाढेल. मागणी असेल त्याप्रमाणे काम कराल. घरात नको त्या कामात बराच वेळ जाईल. निरर्थक खर्च आटोक्‍यात आणण्यात यशस्वी व्हाल. नातेवाइकांसमवेत वेळ मजेत घालवाल.

कुंभ : स्वतःच्या तंत्राने काम करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही खूश असाल. व्यवसायात व्यवहार दक्ष राहून निर्णय घ्याल. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामांची पूर्तता कराल. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत कामात फायदा करून घेण्याचा मानस राहील, परंतु त्याची वाच्यता करू नये. कामातील बेत गुप्त ठेवावे. घरात पूर्वी ठरलेले कार्यक्रम पार पडतील. सहजीवनाचा आनंद घेता येईल. वातावरण आनंदी राहील.

मीन : स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा तुमचा अट्टहास उफाळून येईल. मात्र, चुकीच्या मार्गाने न जाता कामाचे स्वरूप ओळखून कृती करावी. व्यवसायात परिणामांचा विचार करून पावले टाकावी. कामाचा वेग वाढवण्यासाठी जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीत नवीन संधी चालून येईल, तिचा फायदा घ्यावा. जोडव्यवसायातून जादा कमाई होईल. बेरोजगार व्यक्तींना नोकरीची संधी मिळेल. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. घरात नवीन जागा, वास्तू, वाहन खरेदीचे मनसुबे ठरतील.

संबंधित बातम्या