ग्रहमान : २५ एप्रिल ते १ मे २०२०

अनिता केळकर
सोमवार, 27 एप्रिल 2020

ग्रहमान
 

मेष : या सप्ताहात आवश्यक व्यक्तींशी संपर्क साधून महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. मात्र, त्यात दिरंगाई करू नये. पैशांची चिंता नसेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत तुमच्या सरळसोट व धधाडीच्या स्वभावामुळे सहकाऱ्यांना फायदा होईल. कामातून नवीन ओळखी होतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. घरात आनंदी व उत्साही वातावरण राहील. आवडत्या व्यक्तींच्या सहवासाने आनंद मिळेल. महिलांनी मानले, तर समाधान मिळेल. आरोग्य सुधारेल.

वृषभ : संमिश्र ग्रहमान आहे. कामाच्या बाबतीत चोखंदळ रहाल. व्यवसायात स्वतःला नेहमीपेक्षा जास्तच गुंतवून घ्याल. कोणतेही काम लगेचच होईल ही अपेक्षा ठेवू नये, थोडा धीर व सबुरी ठेवावी. पैशांची बाजू समाधानकारक राहील. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. वरिष्ठांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. घरात किरकोळ कारणांनी वादविवाद होतील, तरी डोके शांत ठेवावे. मोठी खरेदी करण्याचा बेत आखाल.  तरुणांचा नको त्या कामात बराच वेळ जाईल.

मिथुन : सर्व आघाड्यांवर पुढाकार घ्याल. प्रकृतीमान सुधारेल. व्यवसायात काही नवीन प्रस्ताव येतील, त्यांचा विचार कराल. इतरांची कामात मदत होईल. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत याची काळजी घ्यावी. जास्तीची कामे स्वतःहून ओढवून घेऊ नयेत. घरात दोन पिढ्यांमध्ये वैचारिक मतभेद जाणवतील. तुम्हाला मोठ्या व्यक्तींचा उपदेश रुचणार  नाही. व्यक्तिगत जीवनात नवीन मैत्री होईल. महिलांनी चंचलता कमी करून ध्येय गाठावे. कमी श्रमात जास्त यश मिळेल.

कर्क : मनातील बेत प्रत्यक्षात साकार होण्यास उत्तम कालावधी आहे. व्यवसायात सहकाऱ्यांची मदत घेऊन कामे मार्गी लावाल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यपद्धतीत आवश्यक ते बदल कराल. नोकरीत तुम्ही केलेल्या कामावर वरिष्ठ खूश होतील. काम थोडेच असेल, पण दर्जा उत्तम असेल. घरात प्रियजनांसोबत वेळ मजेत जाईल. शुभकार्य ठरतील. महिलांना आवडता छंद जोपासता येईल, त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. तरुणांनी आणि नोकरदारांनी मात्र प्रवास टाळावा.

सिंह : प्रयत्न व नशीब यांची सांगड घालून कामे पुढे न्याल. व्यवसायात तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा राहील. अपेक्षित व्यक्तींकडून साथ मिळाल्याने तुमचे मनोधैर्य वाढेल. नवीन योजना व कामांना वेळ देण्यासाठी छोटा प्रवास घडेल. नोकरीत तडजोड केलीत तर कामे होतील. घरात शुभकार्य ठरेल व पार पडेल. मात्र एक प्रकारचा तणाव राहील. नोकरदार महिलांना वरिष्ठांकडून सवलती मिळतील. त्यामुळे त्यांना मानसिक समाधान लाभेल.

कन्या : सर्व आघाड्यांवर सतर्क राहाल. व्यवसायात पैशांची आवक चांगली असल्यामुळे गुंतवणुकीच्या नवीन पर्यायांचा विचार कराल. व्यवसायात जादा भांडवलाची गरज भासेल, त्यासाठी हितचिंतकांची मदत घ्याल. नोकरीत कष्टाचे व जिकिरीचे काम वाट्याला येईल. परंतु, केलेल्या कामाचा मोबदला चांगला मिळेल. घरातील व्यक्तींच्या गरजा व इच्छा पूर्ण करताना भावूक व्हायला होईल.  वेळेचे सोने कराल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. महिलांना छंद जोपासता येतील.

तूळ : या सप्ताहात अचूक अंदाज व योग्यवेळी केलेली कृती याचा फायदा होईल. व्यवसायात अवघड व कठीण कामात मार्ग सापडेल. नोकरीत इतरांना न जमलेले काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील व ते तुम्ही अक्कल हुशारीने पूर्ण कराल. गैरसमजुतीने होणारे घोटाळे टाळावेत. आर्थिक स्थिती चांगली राहील, मात्र गरज असेल तेव्हाच खर्च करावा. घरात एखादा आनंदाचा क्षण साजरा कराल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. नोकरदार व्यक्तींना बक्षीस स्वरूपात बढती संभवते. 

वृश्चिक : ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात उत्पन्नाचे प्रमाण चांगले असेल, परंतु खर्चाचे प्रमाण वाढेल. सरकारी देणी देता येतील. नवीन बेत, योजना सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होईल. नोकरीत पूर्वी जे काम आळसाने लांबवले होते, ते करावे लागेल. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे उरकावी लागतील. महिलांचा घरातील सर्वांना खूश ठेवण्याचा प्रयत्न राहील. स्वार्थ व परमार्थ साधून जमतील ती कामे करावीत. निरर्थक खर्च आटोक्यात आणण्यात यशस्वी व्हाल.  

धनू : पैशांची ऊब मिळाल्याने तुम्ही खूश असाल. परंतु, पैशांच्या हव्यासापोटी वाईट संगत धरू नये. माणसांची पारख करून त्यातील खरे कोण व खोटे कोण ते ओळखावे. व्यवसायात विविध मार्गांनी पैशांचा ओघ सुरू राहील. जुनी येणी वसूल होतील. गुंतवणुकीचे नवीन पर्याय खुले होतील. कामांना वेग येईल. नोकरीत कामाच्या स्वरूपात फेरफार झाल्यास तुमचा फायदा होईल. नवीन ओळखी होतील. जोडव्यवसायातून लाभ होईल. घरात तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल.

मकर : या सप्ताहात विनाकारण धावपळ, दगदग झाल्यासारखे वाटेल. व्यवसायात साध्या, सरळ कामात गोंधळ होईल. हातातोंडाशी आलेले काम तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलावे लागेल. प्रयत्न व चिकाटी ठेवलीत, तर मात्र यश तुमचेच असेल. नोकरीत अधिकाराची व्याप्ती वाढेल. बेरोजगार व्यक्तींना कामासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागेल. घरातील व्यक्तींच्या सहवासात वेळ मजेत जाईल. खर्चामुळे बजेट कोलमडेल. महिलांनी कर्तव्याला प्राधान्य द्यावे. पैशांच्या व्यवहारात चोखंदळ राहावे.

कुंभ : 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ'चा प्रत्यय येईल. व्यवसायात भोवतालच्या परिस्थितीनुरूप ध्येय धोरण ठरवाल. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून कामात प्रगती कराल. प्रतिष्ठित व्यक्तींचे तंत्र सांभाळून काम करावे लागेल. वेळप्रसंगी साठवलेले पैसे वापरावे लागतील. नोकरीत नवीन पद्धतीने कामे हाताळाल. बुद्धीचातुर्याने कामात यशस्वी व्हाल. घरात पूर्वी ठरलेले कार्यक्रम पार पडतील. मात्र, घरातील कामामुळे महिलांची तारांबळ होईल आणि त्यामुळे चिडचिड होईल.

मीन : 'अति तेथे माती' हे लक्षात ठेवावे. संयम ठेवून कृती करावी. व्यवसायात अतिउत्साहाच्या भरात कामे ओढवून घेऊ नयेत. तुमच्या इच्छा आकांक्षा जरी मोठ्या असल्या, तरी स्वतःची कुवत ओळखून पुढे जावे. नोकरीत एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करावे. कामात झालेली हयगय तुम्हाला व वरिष्ठांना खपणार नाही. घरात सर्वांचे समाधान करणे कठीण आहे, हे लक्षात येईल. वृद्धांनी पथ्यपाणी सांभाळावे. कामात गुप्तता ठेवावी. महिलांनी मनावर ताबा ठेवावा.
 

संबंधित बातम्या