ग्रहमान : २ ते ८ मे २०२०

अनिता केळकर
बुधवार, 6 मे 2020

ग्रहमान
 

मेष : 'केल्याने होत आहे रे' ही म्हण लक्षात ठेवून कामात प्रगती करावी. व्यवसायात भावनेच्या आहारी न जाता व्यवहारी रहावे. प्रकृतीमान सांभाळून नवीन कामे स्वीकारावीत. कामात झालेले दुर्लक्ष तुम्हाला  सहन  होणार नाही. घरातील कामामुळे जास्त थकवा  जाणवेल. सहकाऱ्यांची कामात मदत होईल, ही अपेक्षा ठेवू नये. स्वयंसिद्ध रहावे. तसेच पैशांच्या व्यवहारातही चोख रहावे. मनाविरुद्ध वागावे लागले, तरी रागवू नये. घरात तडजोडीचे धोरण फायदेशीर ठरेल. 

वृषभ : कामात यशस्वी वाटचाल कराल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. 'आपलेच म्हणणे खरे' असे न म्हणता  सलोख्याने, सामंजस्याने प्रश्न हाताळावेत, त्याचा लाभ होईल. पैशांचा विनियोग योग्य कारणांसाठीच करावा. अनावधानाने झालेली चूक पुढे महागात पडेल, तरी सावधगिरी बाळगावी. 'आपले काम बरे नि  आपण बरे' हे धोरण ठेवावे. गैरसमजुतीने होणारे वाद टाळावेत. दगदग, धावपळ कमी करून तब्येतीचे तंत्र सांभाळावे. घरात इतरांचे विचार समजून घेऊन वागावे.

मिथुन : द्विधा मनःस्थिती  राहील, तरी चिंता, काळजी करू नये. व्यवसायात दक्ष राहून घेतलेले निर्णय उपयोगी पडतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भोवतालच्या व्यक्तींवर बारीक नजर ठेवावी. उत्साहाच्या भरात जादाची कामे स्वीकारू नयेत. नवीन तंत्रज्ञानाचा  वापर करून उलाढाल वाढवाल. स्वास्थ्य जपून काम केले, तर  भविष्यात लाभ होईल. मनाला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा. घरात न चिडता स्वतःचे म्हणणे इतरांना पटवून द्यावे. आवश्यक तेथे मोठ्यांचा सल्ला घ्यावा.

कर्क : मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलाल. व्यवसायात पैशांचे कितीही नियोजन केले, तरी खर्च प्रमाणाबाहेर झाल्याने तुम्हाला चणचण भासेल. नोकरीत अस्वस्थता राहील. कितीही काम केले, तरी वरिष्ठांचे समाधान होणार नाही, त्यामुळे कामाचा आळस येईल. घरात ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. घरात  झालेला विरोध सहन होणार नाही, तरी मौनव्रत ठेवावे. विचार पटले नाहीत, तरी न चिडता कृतीतून व्यक्त व्हावे.

सिंह : मनाप्रमाणे कामे होतील, त्यामुळे उत्साही रहाल. व्यवसायात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. कामाचे योग्य नियोजन केलेत, तर लाभ होईल. नवीन कामे मिळतील. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत काही तडजोडी कराव्या लागतील, मात्र वरिष्ठ मदतही करतील. गोड बोलून कामे करून घ्यावीत. घरात वैचारिक मतभेद होतील. मुलांची प्रगती व प्रकृतीबाबत माहिती कळेल. पाहुणे, नातेवाईक यांची खुशाली कळेल.

कन्या : तुमच्या कामात तुम्ही दक्ष राहता, इतरांनी केलेली ढवळाढवळ तुम्हाला सहन होत नाही, तेव्हा न रागवता कामे संपवावीत. वेळेचे गणित मांडून त्याप्रमाणे कामांना प्राधान्य द्यावे. नोकरीत काही कामांत तुम्हाला इतरांवर अवलंबून रहावे लागेल, त्यामुळे तुमचा नाईलाज होईल. कामातील बेत गुप्त ठेवावे लागतील. घरातील व्यक्तींकडून विचित्र अनुभव येईल. ठरलेले कार्यक्रम बदलावे लागतील, तरी त्याचा जास्त विचार करू नये.

तूळ : ग्रहांची मर्जी राहील, तशी कासवाच्या चालीने  तुमची प्रगती होईल. व्यवसायात निष्णात व्यक्तींचा सल्ला घेऊन कामे केलीत, तर लाभ होईल. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. मात्र पैशांच्या व्यवहारात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे लक्ष द्यावे. घरातील लहान मुलांविषयी थोडी चिंता वाटेल, तरी काळजी घ्यावी. महिलांना  आवडत्या छंदात वेळ घालवता येईल.  तरुणांनी अति साहस करू नये.

वृश्चिक : आर्थिक दिलासा देणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. सध्या  नको त्या कामात बराच वेळ जाईल. दुर्लक्ष केलेल्या कामांकडे लक्ष देऊन ती वेळेत पूर्ण करावी लागतील. पैशांच्या व्यवहारात थोड्या त्रुटी राहतील. घरात प्रत्येक व्यक्तीशी जमवून घेणे कठीण जाईल. अनावश्यक खर्च वाढल्याने चिडचिड होईल. जुने प्रश्न पुन्हा डोके वर काढतील, तेव्हा सामंजस्याने सोडवावेत. आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल व्हावी.

धनू : स्वच्छंदी जगणे हा तुमचा स्थायी भाव आहे, त्याचा अनुभव येईल. वातावरणाची साथ मिळेल. व्यवसायात कार्यतत्पर राहून कामे केलीत तर यश मिळेल. आर्थिक चिंता मिटेल. अनपेक्षित लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. तुमच्या बोलण्याचा गैरफायदा इतर लोक घेणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कोणाशीही कामापुरते  संबंध ठेवणे हितावह राहील. घरात तटस्थ राहून लक्ष ठेवावे. वादाचे प्रसंग टाळले, तर कुटुंबासमवेत वेळ मजेत जाईल. प्रकृतीची उत्तम साथ मिळेल.

मकर : तुमचा स्वभाव अत्यंत धोरणी आहे, त्याचा फायदा होईल. अंदाज घेऊन मार्गक्रमण कराल. कमी बोलून कृतीवर भर दिलात, तर  इतरांना तुमचे महत्त्व कळून येईल. घरात कुटुंबासमवेत विरंगुळा लाभेल. प्रकृतीचे तंत्र थोडे सांभाळावे. कामाच्या पद्धतीत बदल करून नवीन काहीतरी कराल. व्यवसायातील व्यवहारी दृष्टिकोन भविष्यात लाभ देईल. पैशांच्या व्यवहारात काटेकोर रहावे. घरात आपल्या वागण्याबोलण्याने कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

कुंभ : तुम्ही मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जीवाचे रान करता, वेळ काळ न बघता स्वतःला कामात झोकून देता, याचा लाभ होईल. व्यवसायात तडजोडीचे धोरण ठेवलेत,  तर केलेल्या कामाचे समाधान मिळेल. भावनेच्या भरात एखादा चुकीचा निर्णय घेऊ नये. पैशांच्या बाबतीत चोख रहावे. घरात प्रत्येक व्यक्तीला सांभाळून घेणे कठीण जाईल. बोलण्यापेक्षा कृतीवर भर राहील. हलक्या कानाने विनाकारण गैरसमज होण्याची शक्यता आहे. महिलांनी प्रकृतीस जपावे.

मीन : पाण्यात राहून इतरांशी वैर करता येत नाही हे लक्षात ठेवावे. व्यवसायात आपमतलब साध्य करण्यासाठी शत्रूलाही गोंजारावे लागते, हेही लक्षात ठेवावे व त्याप्रमाणे वागावे. कामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कृती करावी. एखादी गोष्ट पटली नाही, तर शांत रहावे. पैशांच्या मोहापासून दूर रहावे. हातचे सोडून पाळत्याच्या पाठी लागू नये. घरात विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. स्वतःच्या मर्यादा ओळखाव्यात. तरुणांनी अतिविश्वास बाळगू नये. महिलांनी मनन-चिंतनात वेळ घालवावा.
 

संबंधित बातम्या