ग्रहमान : ९ ते १५ मे २०२०

अनिता केळकर
सोमवार, 11 मे 2020

ग्रहमान
 

मेष : सध्या तुमची मानसिक उमेद चांगली असेल. भविष्यात व्यवसायातील नवीन योजना तुमचे लक्ष आकर्षित करतील. उलाढाल वाढवण्यासाठी जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर कराल. नवीन ओळखीतून विशेष फायदा होईल. तुमच्या नेतृत्व गुणांना प्रोत्साहन मिळेल. घरात तुमचा मूड चांगला राहील. शिवाय घरातील कामांचा उरकही दांडगा राहील. आवडत्या व्यक्तींशी संवाद होईल. लहान मुले आणि ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. महिलांनी  मनन चिंतनात वेळ घालवावा.

वृषभ : महत्त्वाचे ग्रह तुमच्या इच्छा आकांक्षा सफल करणारे आहेत. त्यामुळे मनोबल चांगले राहील. व्यवसायात आधी हाती असलेली कामे वेळेत संपवावीत, मगच नवीन कामांकडे लक्ष द्यावे. काही कामांसाठी  तुम्हाला इतरांवर अवलंबून रहावे लागेल, तरी थोडा धीर धरावा. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. अनपेक्षित चांगली बातमी कळेल. कौटुंबिक स्वास्थ उपभोगाल. खर्चाचे प्रमाण वाढले, तरी चांगल्यासाठी असल्याने आनंदच मिळेल. 

मिथुन : आहे त्यात समाधान मानायला शिकावे, म्हणजे त्रास होणार नाही. व्यवसायात नवीन काहीतरी करावेसे वाटेल, परंतु स्वतःची शारीरिक व आर्थिक क्षमता ओळखून पुढे जावे. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याकडे कल राहील. महत्त्वाच्या कामांना विशेष प्राधान्य द्याल.  बाहेरचा राग घरातील व्यक्तींवर काढू नये. घरात आपल्या वागण्या-बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. मुलांच्या प्रगती व प्रकृतीबाबत विनाकारण चिंता कराल.

कर्क : तुमच्या उत्साही स्वभावाला पूरक ग्रहमान आहे. व्यवसायात तुमच्या अंगी असलेल्या गुणांची चुणूक दाखवण्याची संधी मिळेल, त्याचा लाभ घ्यावा. भविष्यात घडणाऱ्या चांगल्या घटनांची पायाभरणी कराल. कामात बदल करावासा वाटेल, परंतु थोडा धीर ठेवावा. कामात लवचिक धोरण स्वीकारून गरज असलेल्या कामांना प्राधान्य द्यावे. मनाजोगी कामे झाल्याने आनंद वाटेल. घरात इच्छा आकांक्षा पल्लवीत करणारे वारे वाहील. मात्र  घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

सिंह : घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल, त्याचा योग्य तो समन्वय साधावा. आपली प्रतिमा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल. गतिमान जीवन जगावे लागेल. तब्येतीची काळजी घ्यावी. घरातील जबाबदाऱ्या पेलून जीवनाचा आस्वाद घ्याल. कर्तव्यदक्ष राहून कामेही वेळेत पूर्ण कराल. शिवाय घरातील कामातही तुमचा पुढाकार राहील. कामात नवीन तंत्रज्ञान वापरून फायद्याचे  प्रमाण वाढवाल. यामध्ये हितचिंतकांचीही मदत होईल. 

कन्या : तुमच्यातील उर्मी व जोश वाखाणण्यासारखा असेल. कामे पूर्ण करण्यासाठी कधी शक्ती, तर कधी युक्तीचा अवलंब कराल. जुनी येणी वसुलीसाठी प्रयत्न राहील. घरातील मोठ्या व्यक्तींना सांभाळून घ्यावे लागेल. तसे केल्यास कुटुंबातील व्यक्तींबरोबर वेळ मजेत जाईल. महिलांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. लहान मुलांना उत्तम एकाग्रता साधता येईल. तरुणांना अपेक्षित संधी चालून येण्याची शक्यता.

तूळ : ग्रहांची अनुकूलता कमी श्रमात जास्त यश देईल. मात्र, नोकरीत बदल करण्यापूर्वी जबाबदारीचा विचार करावा. आवडीच्या क्षेत्रात यश प्राप्त होईल. कृतिशील राहाल. मुलांच्या प्रगती व प्रकृतीबाबत माहिती कळेल. एखादी महत्त्वाची घटना मन आनंदी करेल. मात्र, पैशांच्या व्यवहारात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. पाहुणे, नातेवाईक यांची खुशाली कळेल. महिलांना आवडत्या छंदात वेळ घालवता येईल. ज्येष्ठांना  मनःशांती लाभेल.

वृश्चिक : 'दिसते तसे नसते' हे लक्षात ठेवून वागावे. व्यवसायात अडथळे अडचणींवर मात करून प्रगती करण्याचा चंग बांधाल. वातावरणात थोडाफार तणाव जाणवेल. कामातील सकारात्मक दृष्टिकोन भविष्यात सफलता देईल. भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्यावे. पैशांच्या व्यवहारात हयगय नको. घरात हाताचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये. हलके कान न ठेवता प्रश्न व गैरसमज सामंजस्याने सोडवावे. अनपेक्षित सुखद बातमी कानावर येईल. तरुण मुलांनी अतिसाहस करू नये.

धनू : 'दुरून डोंगर साजरे' या म्हणीचा प्रत्यय येईल. व्यवसायात माणसांची पारख करून कामे सोपवाल. ऐकीव गोष्टींवर विश्वास न ठेवता त्याची खातरजमा करून मगच मत द्यावे. अतिविश्वास टाळावा. नवीन कामे तुम्हाला आकर्षित करतील, तरी सध्या करत असलेल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. बोलताना कामासंबंधातील निर्णय राखून बोलावे. घरात बिघडलेले संबंध सुधारतील. महिलांचा घरातील कामात बराच वेळ जाईल. नवीन संक्रमणाचे पर्व सुरू होईल.

मकर : जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रगती कराल. व्यवसायात जरी संथ गतीने प्रगती असली तरी केलेल्या कष्टाचे फळ मिळणारच, मात्र त्यासाठी थोडी सबुरी ठेवावी लागेल. रखडलेली कामे ओळखीतून मार्गी लावावीत. पैशांची चणचण थोडा काळ जाणवेल. मैत्री व व्यवहार यांची गफलत नको. उधार उसनवारीही करू नये. घरात भविष्यातील खर्च कमी करण्यासाठी मांडलेल्या प्रस्तावाला घरातील इतर सदस्य दुजोरा देतील. महिलांना अंगी असलेले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.  

कुंभ : सध्या इतर व्यक्तींची कसे जुळवून घेता, त्यावर तुमचे यश अवलंबून आहे. योग्यवेळी योग्य व्यक्तींची मदत घेऊन कामे संपवावीत. पैशांची तात्पुरती सोय होईल. नोकरीत कामातील बदल तुम्हाला उत्साही करेल. कामाचा ताण वाढला, तरी आनंदाने स्वीकाराल. कामातील प्रगती मंदावल्यासारखी वाटेल, मात्र प्रत्यक्षात समाधानकारक प्रगती असेल. घरात मानसिक स्थैर्य मिळेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. महिलांनी सलोख्याने वागून कामे संपवावीत. 

मीन : 'ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान' हे लक्षात ठेवून वागावे. व्यवसायात कृती व विचार यांचा योग्य समन्वय साधून येणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा. योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करावी. हाती मिळणाऱ्या पैशांचा विनियोग योग्य कारणांसाठीच  करावा, तसे केल्यास  आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.  मात्र घरात सर्वांच्या सुखसमाधानासाठी चार पैसे खर्च करावे लागतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. कुटुंबासमवेत आनंदाचे क्षण उपभोगाल.

संबंधित बातम्या