ग्रहमान : २३ ते २९ मे २०२०

अनिता केळकर
शुक्रवार, 29 मे 2020

ग्रहमान
 

मेष : ग्रहांची साथ राहील. पूर्वी केलेले कष्ट व प्रयत्नांना यश येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायातील अडचणी काही प्रमाणात कमी होतील. व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल, तरी जादा काम करण्याची तुमची तयारी असेल. नवीन कामे नजरेच्या टप्प्यात येतील. कष्टाच्या प्रमाणात आर्थिक मोबदलाही मिळेल. घरात एखादे शुभकार्य घडेल. सहजीवनाचा आनंद घ्याल. महिलांना यशप्राप्ती होईल, मात्र तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. ज्येष्ठांचा चिंतन करण्यात वेळ जाईल. 

वृषभ : स्वयंसिद्ध राहाल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सक्रिय व्हाल. व्यवसायात नियोजनावर भर राहील. प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक पावले टाकाल. थोडा आर्थिक तणाव जाणवेल. उलाढाल व फायद्याचे प्रमाण वाढवण्यासाठी नव्या पद्धतीचा अवलंब कराल. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड होण्याची शक्यता आहे. मात्र तरुणांनी अतिविश्वास बाळगू नये. घरात एखादी चांगली घटना घडेल. महिलांना आवडत्या छंदात वेळ घालवता येईल.

मिथुन : कर्तव्यपूर्तीसाठी पुढे येऊन कामाला लागाल. तुमच्यातील उर्मी तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. त्यामुळे नियोजनही कराल. व्यवसायात बदलत्या काळानुरूप बदल करून नवीन उपक्रम हाती घ्याल. केलेल्या कष्टाचे चीज व कौतुक होईल. नोकरीत कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. पैशांची तजवीज करावी लागेल. या कामी हितचिंतकांची मदत होईल. घरात काही सुखाचे क्षण येतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. अनपेक्षित लाभाची शक्यता आहे. महिलांचे प्रकृतीमान सुधारेल.

कर्क : भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. त्यामुळे तुम्ही संभ्रमावस्थेत रहाल. व्यवसायात पैशांच्या तंगीमुळे कामाला मर्यादा येतील. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. घरच्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. मात्र भावनेच्या भरात कोणतेही आश्वासन देऊ नये. घरात सर्वांचे तंत्र सांभाळणे कठीण आहे, तरी 'आपले काम बरे नि आपण बरे' हे धोरण ठेवावे. प्रकृतीचीही कुरबुर राहील, तेव्हा चालढकल करू नये. महिलांनी मनन, चिंतन केले, तर लाभदायी ठरेल.

सिंह : अंथरूण पाहून पाय पसरावे. वास्तववादी दृष्टिकोन उपयोगी पडेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. नवे हितसंबंध जोडताना जुने हितसंबंध तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. घरात दोन पिढ्यांमध्ये वैचारिक मतभेद जाणवतील. पैशांची चिंता नसेल, मात्र गरजेपुरतेच पैसे खर्च करावेत. घरातील इतर कामे वाढतील. महिलांना कौशल्य दाखण्याची संधी मिळेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. प्रकृतीमान सुधारेल.

कन्या : अनपेक्षित मार्गाने साथ मिळाल्याने तुम्हालाही थोडा आश्चर्याचा धक्का बसेल. व्यवसायात कोणावरही विसंबून न राहता कामे हातावेगळी करावीत. गरज तिथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. हाती असलेल्या पैशांचा वापर उत्पादन व फायदा वाढवण्यासाठी करावा. सलोख्याने सर्व प्रश्नांची उकल करावी. गरजेनुसार कामांना प्राधान्य द्यावे. नोकरीत, कामात गुप्तता राखावी. बदल किंवा बदलीची दाट शक्यता. सुटीचा उपयोग घरातील कामे करण्यासाठी करावा.

तूळ : शक्ती आणि युक्ती यांचा योग्य समन्वय करून यश द्विगुणीत कराल. व्यवसायात प्रयत्न करीत असलेल्या कामात चांगली कलाटणी मिळेल, त्यामुळे तुमचाही उत्साह वाढेल. योग्य व्यक्तींची योग्यवेळी मिळालेली मदत उपयोगी पडेल. पूर्ण झालेल्या कामाचे पैसे हाती येतील. मात्र कामाचा ताण आणखी वाढेल. बोलण्यापेक्षा तुमचा कृती करण्यावर भर राहील. तूर्तास नवीन नोकरीचा विचार करू नये. घरातील वातावरण चांगले राहील. महिलांना आत्मिक बळ मिळेल.

वृश्चिक : घर, व्यवसाय व नोकरी याकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात खेळत्या भांडवलाची गरज भासेल. त्यासाठी बँका व वित्तीय संस्था यांची मदत घ्यावी लागेल. तंत्रज्ञानाचा  वापर करून व्यवसायात प्रगती करता येईल.  घरात वादाचे प्रसंग येतील, तरी तडजोडीने प्रश्न मार्गी लावावेत. सर्वांचे मूड सांभाळणे अवघड होईल, तरी दुर्लक्ष करावे. निरर्थक खर्च आटोक्यात आणण्यात यशस्वी व्हाल.  महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. तरुणांनी नको तिथे धाडस दाखवू नये.

धनू : तुमची उमेद खूप असेल, परंतु भोवतालच्या व्यक्तींची म्हणावी तशी मदत न मिळाल्याने तुम्हाला स्वयंभू व्हावे लागेल. व्यवसायात कंबर कसून कामाला तयार व्हाल. नातेवाईक, आप्तेष्ट यांची खुशाली कळेल. येत्या काळात कामाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, तरी मनाची तयारी ठेवावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा  वापर करून कामातील गती वाढवाल. त्यामुळे हमखास यश मिळेल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल, त्यामुळे मूड चांगला राहील.

मकर : ग्रहांची मदत मिळेल. व्यवसायात कामे मार्गी लागल्याने काही निर्णय घेऊ शकाल. केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. जोडव्यवसाय असणाऱ्यांना नवीन संधी मिळेल, तरी संधीचे सोने करावे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा आता फायदा होईल. कोणत्याही प्रश्नांची उकल सामंजस्याने करावी. घरात एखादे शुभकार्य घडेल. घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी.  महिलांना मनन, चिंतनात वेळ घालवता येईल. महिलांचे प्रकृतीमान सुधारेल.

कुंभ : तुम्हाला अपेक्षित सुधारणा या सप्ताहात होईल, त्यामुळे तुमचा जीव भांड्यात पडेल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे मिळतील. त्यातून भरपूर पैसे मिळवण्याची तुमची इच्छा पूर्ण करता येईल. भांडवलाची तरतूद हितचिंतक, मित्रमंडळी किंवा अन्य मार्गाने होऊ शकेल. अवघड कामातही यशश्री मिळवाल. मात्र, गैरसमजुतीने होणारे घोटाळे टाळावेत. घरात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. एखादा समारंभ ठरेल. तुमच्या हातून चांगली कामे होतील. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल.

मीन :  माणसांची पारख करणे गरजेचे होईल. त्यामुळे जरा लांबच रहावे. व्यवसायात विसंबून न राहता हातातील कामे वेळेत संपवावीत. नवीन कामाची संधी तुमचे लक्ष वेधून घेईल. आवश्यक ती ताळेबंदी करून मगच निर्णय घ्यावा. हातातील कंटाळवाणे काम संपल्याने हायसे वाटेल. शिवाय पुढील कामे मनाप्रमाणे करता येतील. घरात झालेले गैरसमज दूर होतील. मनोबल उत्तम राहील. घरातील खर्च आटोक्यात येतील. प्रियजनांचा सहवास आनंद देईल. वृद्धांनी पथ्यपाणी सांभाळावे.

संबंधित बातम्या