ग्रहमान : ३० मे ते ५ जून २०२०

अनिता केळकर
सोमवार, 1 जून 2020

ग्रहमान
 

मेष : सध्या बरेच काम करण्याची इच्छा असेल. परंतु, भोवतालच्या बदलामुळे थोडे साशंक व्हाल. व्यवसायात हवे तसे सहकार्य न मिळाल्याने काही कामे पुढे मागे होतील. माणसांची खरी पारख होईल. व्यवहारात ग्राहकांशी बोलताना जरा जपून बोलावे. नोकरीत नजरचुकीने विसरलेल्या कामांची आठवण येईल. गरज तिथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामे पूर्ण करावीत. खरे हितचिंतक कोण हे ओळखण्याची संधी मिळेल. तरुणांच्या मातांना मित्रमंडळींकडूनच विरोध होईल.

वृषभ : भोवताली नवीन वर्तुळ निर्माण होईल. त्यामुळे जुने हितसंबंध संपुष्टात येण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन कार्यपद्धतीचा अवलंब कराल. नवीन योजना हाती घ्याल. मात्र त्याची वाच्यता लगेचच करू नये. नोकरीत बदली किंवा बदल हवा असल्यास प्रयत्न करावेत. जोडव्यवसायातून विशेष लाभाची शक्यता आहे. घरात तात्विक मतभेद होण्याची शक्यता आहे, तरी डोके शांत ठेवावे. उगीचच नातेसंबंधात गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तरुणांना मात्र कामाचा जोम येईल.

मिथुन : प्रगतीपथावर राहण्यासाठी इतरांच्या कलाने काम करून घेण्याची खुबी आत्मसात केलीत, तर कामांना विलंब होणार नाही. व्यवसायात कोणालाही न दुखावता हेतू साध्य करावा. स्पर्धकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे. बाजारातील चढउतारांचा अंदाज घेऊन कृती करावी. नोकरीत मनाप्रमाणे काम करण्याची मुभा मिळेल. घरात रुसवे फुगवे होतील, तरी जास्त विचार न करणे चांगले. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष केलेत, तर फायदा तुमचाच होईल. तरुणांनी भावनोद्रेक टाळावा.

कर्क : सध्या परस्परविरोधी ग्रहमान आहे. त्यामुळे तुम्ही थोडे संभ्रमात पडाल. व्यवसायात पैशांची आवक समाधानकारक राहील. मात्र हाती असलेल्या पैशांची गुंतवणूक करताना निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. पैशाचा विनियोग योग्य मार्गाने होईल, याची दक्षता घ्यावी. नोकरीतील कामात काही निर्बंध येतील. हातून चूका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नवीन ओळखी होतील, त्या जोपासाव्यात. घरात थोडे गढूळ वातावरण राहील, तेव्हा मौन राहणे उत्तम! तरुणांनी अतिधाडस करू नये.

सिंह : माणसांवर विश्वास ठेवून काम करण्याची रास असल्याने तुम्हीही हीच अपेक्षा भोवतालच्या व्यक्तींकडून कराल. परंतु, त्यांची विश्वासार्हता पडताळून पहावी. व्यवसायात बाजारातील चढउतारांकडे बारीक लक्ष ठेवावे. काही कारणांनी जुने हितसंबंध संपुष्टात येण्याची शक्यता आहे. घरात, व्यवसायात तुमच्या 
वागण्या-बोलण्याने गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्यावी. 'काम बरे नि आपण बरे' हे धोरण उपयोगी पडेल. घरात ज्येष्ठांचा सल्ला तुम्हाला परवडणार नाही, त्यामुळे अडमुठे रहाल.

कन्या : सध्या तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे अनुभव येतील. व्यवसायात तुमच्या कामाचा उत्साह प्रचंड असेल. जेवढे काम कराल, तेवढे थोडेच असेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामानिमित्त जादा अधिकार मिळतील, त्यातून नवीन ओळखी होतील. तूर्तास नवीन नोकरीचा विचार करू नये. घरात एखादा सुखद प्रसंग साजरा होईल, त्यामुळे वातावरण आनंदी असेल. मात्र नको त्या कामात बराच वेळ जाईल. महिलांना त्यांच्या क्षेत्रात प्राविण्य मिळेल.

तूळ : व्यवसायिक समाधान देणारा सप्ताह आहे. व्यवसायात विविध मार्गांनी पैशांची आवक होईल. कामात बदल करून सुधारणा करावीशी वाटेल. योग्य व्यक्तींची मिळालेली मदत उपयोगी पडेल. नोकरीत पूर्वी केलेल्या जादा कामाचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा, मान व मरातब मिळेल. घरात पैशांअभावी रेंगाळलेली मागणी पूर्ण होईल. घरातील सर्वांच्या मागण्या पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आप्तेष्ट, नातेवाईकांची खुशाली कळेल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल.

वृश्चिक : नवीन संक्रमणाची नांदी असणारे ग्रहमान आहे. त्यामुळे भविष्यात प्रगती होईल. व्यवसायात वाढत्या व्यापामुळे कार्यपद्धतीत बदल करण्याचा विचार येईल. कामामुळे भोवतालचे वर्तुळही बदलण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीतील किचकट कामातून सुटका झाल्यामुळे निश्वास टाकाल. सहकारी व वरिष्ठांची कामात मदत मिळेल. मर्जी संपादन कराल. घरात तुम्ही तुमचे विचार ठामपणे मांडाल. तरुणांना नवीन दिशा सापडेल. महिलांनी चिंतन केले, तर लाभदायी ठरेल.

धनू : लक्ष्मी चंचल असते, त्याचा प्रत्यय येईल. तेव्हा खर्चांवर नियंत्रण ठेवावे. व्यवसायात बरेच मोठे बेत मनात असतील, पण ताळेबंद केल्यावर ते आपल्या आवाक्यात नाहीत असा प्रत्यय येईल. नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीत कामामुळे जादा सवलती व अधिकार दिले जातील. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वतःची हौस भागवून घ्याल. महिलांना आवडत्या छंदात मन रामविता येईल.

मकर : भोवतालच्या वातावरणाशी मिळतेजुळते घेतल्याने तुम्ही ताजेतवाने व्हाल. व्यवसायात नवीन कामासंबंधी नियोजन सफल होईल. स्पर्धकांपासून तुम्ही तुमचे बेत गुप्त राखावेत. हातातील पैशांचा विनियोग योग्य कारणांसाठीच करावा. नोकरीत काही कारणास्तव लांबलेला कामे हाती घेऊन पूर्ण कराल. कामाचा उबग आल्याने विश्रांती आवश्यक वाटेल. घरात वातावरण आनंदी राहील. मनःशांती मिळेल. कलावंत, खेळाडूंना स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याची संधी मिळेल.

कुंभ : प्रगतीची वाटचाल सुकर करणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात तुमच्या आचार-विचारात व जीवनपद्धतीत बदल होण्याची नांदी होईल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन पद्धत व नवे तंत्रज्ञान वापरणे गरजेचे होईल. नोकरीत नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. अनपेक्षित लाभाची शक्यता आहे. घरातील व्यक्तींच्या इच्छा सफल होतील. आरोग्यात सुधारणा झाल्याने कामातील हुरूप वाढेल. आप्तेष्ट, नातेवाईकांची खुशाली कळेल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल.

मीन :  प्रकृतीची उत्तम साथ लाभेल. त्यामुळे कामातील हुरूप वाढेल. तुमच्या मनातील सुप्त इच्छा आकांक्षा जागृत होतील. व्यवसायात पैशांची आवक चांगली राहिल्याने नवे प्रयोग करावेसे वाटतील. कामामुळे जुने हितसंबंध संपून नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. नोकरीत जोडव्यवसायातून कमाई होईल. वरिष्ठांना तुमचे महत्त्व कळेल. अनपेक्षित खर्च वाढतील. महिलांचा मनन चिंतनात वेळ जाईल. प्रकृतीमान सुधारेल.

संबंधित बातम्या