ग्रहमान : ६ ते १२ जून २०२०

अनिता केळकर
रविवार, 7 जून 2020

ग्रहमान
 

मेष : या सप्ताहात ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात पैशांअभावी थांबून राहिलेली कामे मार्गी लागतील. हातातील पैशांचा विनियोग विचारपूर्वक करावा. हितचिंतकांची साथ उपयोगी पडेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामानिमित्त जास्त सवलती मिळतील, त्याचा लाभ घ्यावा. सहकारी व वरिष्ठांची कामात मदत होईल. जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाई चांगली होईल. महिलांना घरातील व्यक्तींची उत्तम साथ मिळेल.

वृषभ : मनातील बेत प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा निर्धार करावा. कृतिशील करणारे ग्रहमान आहे. व्यवसायात नवीन योजना हाती घेता येतील. फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन त्यांना गती द्यावी. कामामुळे दगदग धावपळ वाढेल. नोकरीत कामात बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. केलेल्या कामाचे समाधान राहील. तुमचे व कामाचे महत्त्व कळून येईल. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता. घरात हट्टापायी वैचारिक मतभेद होतील. महिलांनी न रागवता कामे करावीत.

मिथुन : प्रगतीला पूरक वातावरण व ग्रहमान लाभले आहे, त्याचा लाभ घ्यावा. व्यवसायात विनाकारण रेंगाळलेली कामे हाती घेऊन मार्गी लावावीत. तांत्रिक अडथळ्यांवर मात करून कामाची पद्धत बदलून उलाढाल वाढवावी. नवीन करारमदार होतील. नोकरीत कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. तुमचे महत्त्व वाढेल. बेरोजगार व्यक्तींना चांगल्या संधी चालून येतील. पैशांची तजवीज होईल. घरात एखादी चांगली बातमी कळेल. वातावरण आनंदी राहील. महिलांना आवडत्या छंदात मन रमवता येईल.

कर्क : परिस्थितीनुरूप बदल करून ध्येयधोरणे ठरवावीत. व्यवसायात तुमचा हुद्दा चांगला असेल. कामे आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. कोणत्याही कामात चोख राहावे. हातून चुका होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ऐकीव गोष्टींवर विश्वास न ठेवता शहानिशा करावी. घरात कामाची आखणी करून त्याप्रमाणे प्राधान्य द्यावे व कामाचा उरक पाडावा. प्रियजन, आप्तेष्ट यांची खुशाली कळेल. महिलांचा वेळ मजेत जाईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल.

सिंह : स्वतः सिद्ध राहून कामे करावीत, त्याचा फायदाच होईल. व्यवसायात काही ठोस पावले उचलून कामांना गती द्याल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. पूर्वीचे हितसंबंध संपून नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीतील काही प्रश्न सुटतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. घरात महिलांनी कोणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये. मात्र, स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक रहावे. सामंजस्याने घरातील वैचारिक मतभेद मिटवावेत.

कन्या : कामाचे नियोजन करून त्याप्रमाणे कृती करावी. दुसऱ्यावर फारसे अवलंबून राहू नये. व्यवसायात हातातील कामांवर लक्ष ठेवावे. भागीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. पैशांच्या व्यवहारात चोख राहावे. पूर्ण झालेल्या कामाचे पैसे हाती येण्यास विलंब होईल. घरात महिलांना कामाचा ताण पडेल. तणावाचे वातावरण राहील. परंतु, बोलून वाईट होण्यापेक्षा शांत रहावे. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटीचे योग.

तूळ : कामात म्हणावी तशी प्रगती नाही, त्यामुळे निराशा येईल. थोडी सबुरी ठेवलीत तर यश मिळावे. व्यवसायात महत्त्वाची कामे होतील. खेळत्या भांडवलाची गरज भासेल. हितचिंतकांची मदत मिळेल. भावनेच्या भरात मोठी उडी मात्र घेऊ नये. वेळ व काळाचे भान ठेवून कामे संपवावीत. नोकरीत वरिष्ठांच्या पुढे पुढे न करता आपली क्षमता ओळखून कामे स्वीकारावीत. गोड बोलून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्यावीत. घरात महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक : घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागेल. व्यवसायात कामात आलेला विस्कळीतपणा कमी होईल. कामात कर्तव्य व आनंद दोन्हींचा उपभोग घेता येईल. आर्थिक आवक सुधारेल. नोकरीत निश्चय पक्का असेल, तर यश मिळणारच. प्रगतीचा मार्ग अवघड असला तरी त्यासाठी केलेल्या प्रयत्नांनी आनंद मिळेल. ओळखीचा उपयोग होईल. महिलांचे घरात अनावश्यक कारणांसाठी पैसे खर्च होतील. महिलांचा मनन, चिंतनात वेळ जाईल.

धनू : जादुई कांडी फिरावी व विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत व्हावी अशी तुमची अपेक्षा असेल, परंतु, थोडा धीर धरलात तर बरेचसे प्रश्न सुटतील. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेऊन कामाची आखणी करावी. यशासाठी थोडी वाट पाहावी लागेल. काही प्रश्नांना चालना मिळेल. नोकरीत सहकारी व वरिष्ठांकडून मदतीची अपेक्षा करू नये. कामात अडीअडचणी आणण्याचा प्रयत्न ते करतील, त्यातून तुम्ही तुमची सुटका करून घ्याल. घरात तुमचा आग्रही स्वभाव राहील.

मकर : पैशांसंबंधीच्या व्यवहारांना महत्त्व द्यावे. व्यवसायात कामात झालेला विलंब तुम्हाला सहन होणार नाही. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. ती हाती घेण्यापूर्वी त्यातील त्रुटींचा अभ्यास करावा. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामे करावीत. महत्त्वाचे निर्णय घेताना निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरीत प्रत्येक पाऊल सावधानतेने टाकावे. शब्द जपून वापरावेत. बोलण्यातून होणारे गैरसमज टाळावेत. पैशांचा अपव्यय टाळावा. घरात विचारपूर्वक निर्णय घेऊन खर्च करावा. कामात काटेकोर रहावे.

कुंभ : हाती घ्याल ते तडीस न्याल. विचार स्वातंत्र्य मिळेल. व्यवसायात आवश्यक ते बदल करून उलाढाल वाढवावी. तडजोडीचे धोरण स्वीकारून कामात लवचिकता आणावी. प्रगती करावी. नोकरीत कामात गुप्तता राखावी. स्वतःच्या उन्नतीसाठी हालचाली कराल. त्यात यश येईल. पैशांचा मोह होईल, परंतु अव्यवहाराने वागू नये. घरात तुमच्या विचित्र वागण्याचा इतर व्यक्ती वेगळाच कयास बांधतील, तरी दुर्लक्ष करावे. वागण्या-बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.

मीन : तुमचा मूड बदलायला वेळ लागत नाही, तेव्हा सारासार विचार करावा आणि मगच कृती करावी. व्यवसायात मृगजळाच्या पाठीमागे न धावता हाती असलेल्या कामांना प्राधान्य द्यावे. नवीन योजना तुमच्या दृष्टीक्षेपात असतील. हाती असलेल्या पैशांचा वापर जपून करावा. नोकरीत हलक्या कानाने निर्णय घेऊ नयेत. मनाला पटेल, रुचेल तेच निर्णय घ्यावेत व त्याप्रमाणे वागावे. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. घरात महिलांनी स्वयंसिद्ध रहावे. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.

संबंधित बातम्या