ग्रहमान : १३ ते १९ जून २०२०

अनिता केळकर
सोमवार, 15 जून 2020

ग्रहमान
 

मेष : वेळेचे महत्त्व ओळखून त्याप्रमाणे कामाची आखणी कराल. व्यवसायात महत्त्वाच्या कामात स्वतः जातीने लक्ष द्याल. ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. पैशांची आवक समाधानकारक राहील. विनाकारण होणारा विलंब व गैरसोय तुमची चिडचिड वाढवेल. नोकरीत आळस केलात, तर त्याचा त्रास नंतर होईल. मिळालेल्या पैशांचा वापर योग्य कारणांसाठीच होत आहे ना, याकडे लक्ष द्यावे. घरात मुलांकडून चांगली बातमी कळेल. महिलांना मानसिक स्वास्थ्य मिळेल. 

वृषभ : माणसांची पारख करण्यात यश आले, तर बरेच काही मिळवू शकाल. भोवतालच्या व्यक्तींच्या वागण्याने कोड्यात पडाल. व्यवसायात कामांना कुठून व कशी सुरुवात करावी असा संभ्रम राहील. त्यामुळे थोडा विलंब सहन करावा लागेल. परिस्थितीशी मिळतेजुळते घेतले, तर त्रास होणार नाही. नोकरीत कामात चोख रहावे. पैशांच्या मोहापासून चार हात लांब रहावे. सामंजस्याने प्रश्नांची उकल केलीत, तर लाभ तुमचाच होईल. घरात जीवनातील एखाद्या शुभ घटनेची नांदी होईल.

मिथुन : ग्रहांची साथ मिळेल. गतिमान होऊन महत्त्वाच्या कामात कृती केलीत, तर त्याचा उपयोग सर्वांगाने तुम्हालाच होईल. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी आधुनिक तंत्र अमलात आणाल. नोकरीत महत्त्वाच्या कामात तुमचा सहभाग राहील. वरिष्ठ व सहकाऱ्यांमध्ये तुमच्या कामामुळे स्वतःची छाप पाडाल. महत्त्वाचे निर्णय घेताना निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. एखादी चांगली बातमी कळेल. महिलांचा आत्मविश्वास वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

कर्क :  रवी, शुक्र अनुकूल आहेत, त्यामुळे कामाची विस्कटलेली घडी नीट व्हायला मदत होईल. व्यवसायात पैशांच्या व्यवहारांना महत्त्व दिलेत, तर बरेचशी कामे मार्गी लागतील. नेहमीच्या कामापेक्षा वेगळ्या कामात लक्ष घालण्याचा आनंद मिळेल. अडकून पडलेले पैसे मिळतील. नोकरीत विरोधकांचा बिमोड करू शकाल, त्यामुळे कामातील अडथळे दूर होतील. घरातील लांबलेले शुभकार्य मूर्तस्वरूपात येईल. महिलांना कामात घरातील व्यक्तींची साथ मिळेल. वातावरण आनंदी राहील.

सिंह : अडथळ्यांची शर्यत पार करून कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात पूर्वी केलेल्या तडजोडीचा चांगला परिणाम दिसून येईल. पैशांची बाजू सुधारेल. तुमच्यातील चैतन्य जागृत होईल. नोकरीत कामानिमित्त एखादी सुविधा मिळेल. प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. जोडव्यवसायातून विशेष लाभ होतील. घरात काही मतभेद असतील, तर ते संपुष्टात येतील. विवाह व करिअर संदर्भातील तरुणांचे प्रश्न मार्गी लागतील. महिलांना नवीन दिशा मिळेल.

कन्या : योग्य वातावरण लाभेल. कामात आलेला विस्कळीतपणा पूर्वस्थितीवर आणू शकाल. व्यवसायात कामात व्याप वाढेल. मात्र कामात सुधारणा दिसू लागेल. तत्त्वाशी तडजोड व हितचिंतकांची मदत यामुळे कामे मार्गी लागतील. नोकरीत नवीन कामाची पद्धत व वातावरणातील बदल यामुळे अस्वस्थता येईल. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे लक्ष द्यावे. बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी.

तूळ :  ठरलेली कामे पूर्ण करण्याचा चंग बांधाल. वेळ व पैशांचे गणित आखून त्याप्रमाणे कृती कराल. व्यवसायात प्राधान्यक्रमाने कामे पूर्ण करावीत. मिळालेल्या संधीचा योग्य तो फायदा घ्यावा. योग्य वेळी कामात योग्य व्यक्तींची मदत घेऊन कामे पूर्ण करावीत. विलंब झालेली कामे मार्गी लावू शकाल. नोकरीत बढाया न मारता कामावर लक्ष द्यावे. वरिष्ठ व सहकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवावे. घरात चांगल्या कारणांसाठी मोठे खर्च होतील. तरुणांचे विवाह ठरण्याचे योग आहेत.

वृश्‍चिक :  केलेल्या कष्टाचे चीज होईल. त्यामुळे समाधानाचा आनंद मिळेल. तुमच्या प्रगतीच्या रथाला गती येईल व परिस्थिती झपाट्याने बदलेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. लांबलेली कामे मार्गी लागतील. कामात विस्तार करण्याचा विचार येईल. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या कामाविषयी वरिष्ठांना खात्री वाटेल. नवीन जबाबदारी वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. प्रतिष्ठा वाढेल. घरात छानसा कार्यक्रम ठरवाल. प्रियजनांचा सहभाग राहील. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील.

धनू :  ताणतणाव कमी झाल्याने निःश्वास टाकू शकाल. अनपेक्षित सुखद दिलासा मिळेल. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींकडून कडू-गोड अनुभव येतील. त्यातून बरेच काही शिकाल. कामात चोख राहून कामे वेळेत पूर्ण करावीत. नवीन कामे मिळतील. नोकरीत चांगल्या कामासाठी तुमची निवड होईल. बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न केल्यास यश येईल. मात्र, अतिआत्मविश्वास बाळगू नये. घरात कौटुंबिक प्रश्न कमी होतील. तुमच्या सल्ल्याला मान मिळेल.

मकर : मंगळ अनुकूल असल्याने मनोबल उत्तम राहील. आशावादी दृष्टिकोन ठेवून प्रगती कराल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन पूर्ण कराल. खर्च व जमा यांचे प्रमाण समसमान राहील. तुमचा आत्मविश्वास बळावेल. त्या जोरावर अशक्यप्राय कामे हाती घेऊन पूर्ण कराल. नोकरीत कामाचे समाधान मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. सहकारी व वरिष्ठ कामासाठी तुमची खुशामत करतील. मात्र, भावनेच्या आहारी जाऊ नये. 

कुंभ :  भोवतालच्या व्यक्तींशी तुम्ही जुळवून घेण्यात यशस्वी झालात, तर तुमचा कार्यभाग साधेल. व्यवसायात स्पर्धेला तोंड देण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक ठरेल. जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. खेळत्या भांडवलाची गरज भासेल. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः हाताळावीत. कामच्यावेळी काम करून इतर वेळी अाराम कराल. कामाचा थोडासा ताण कमी होईल. तरुणांना नवीन व्यक्तीविषयी आकर्षण वाटेल.

मीन :  योग्य दिशा मिळाल्याने कामात गती येईल. व्यवसायात योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. आशेचा किरण दिसेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामेही मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवलेत, तर पैशांची चणचण भासणार नाही. नोकरीत 'आपले काम बरे नि आपण बरे' हे धोरण ठेवावे. सहकाऱ्यांची मदत मिळेल ही अपेक्षा नको. घरात मतभेदाचे प्रसंग आले, तरी डोके शांत ठेवावे. महत्त्वाचे निर्णय तूर्तास लांबणीवर टाकावेत. अनावश्यक खर्च टाळावेत.
 

संबंधित बातम्या