ग्रहमान २० ते २६ जून २०२०

अनिता केळकर
बुधवार, 24 जून 2020

ग्रहमान

मेष : सध्या तुमचा उत्साह वाढवणारे ग्रहमान लाभले आहे. व्यवसायात ठरविलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. खेळत्या भांडवलाची तरतूद हितचिंतक व बँकांच्यामार्फत करावी. कामात कसूर झालेली सहन होणार नाही. सरकारी कामात दक्ष राहावे. नोकरीत मरगळ नाहीशी करणारे काम वाट्यास येईल. नवीन ओळखी होतील. अनपेक्षित लाभ होतील. घरात प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. महिलांना घरात मान मिळेल.

वृषभ : मनातील ईप्सित साध्य करण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात सहज सोप्या वाटणाऱ्या कामात बराच वेळ व पैसा खर्ची पडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे तात्पुरती पैशांची चणचण जाणवेल. नोकरीत सहकारी व वरिष्ठांची कामात मदत मिळेलच, हे गृहीत धरू नये. स्वयंसिद्ध राहावे. कामाचे नियोजन योग्य प्रकारे करावे. म्हणजे प्रकृतीवर ताण येणार नाही. घरातील व्यक्तींचे हट्ट पुरवताना दमछाक होईल. मानसिक समाधान मात्र मिळेल. महिलांना मनाप्रमाणे वागता येईल.

मिथुन : जीवनाचा आनंद घेण्याकडे तुमचा कल राहील, त्यामुळे आत्मविश्वास बळावेल. व्यवसायात कामाची नवी ऊर्मी जागृत होईल. स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा विशेष प्रयत्न राहील. हवी असलेली संधी मिळाल्याने खूश असाल. प्रतिष्ठित व्यक्तींचाही कामात उपयोग होईल. नोकरीत लांबलेल्या कामांना चालना मिळेल. चांगल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. वरिष्ठांना तुमचे महत्त्व कळेल. घरात सर्वांसाठी आवश्यक गोष्टींची खरेदी कराल. मन प्रसन्न राहील.

कर्क :  प्रकृतीमान सुधारल्याने आनंदी व उत्साही दिसाल. तुमच्या आनंदात भोवतालच्या व्यक्तींनाही सहभागी करून घ्याल. व्यवसायात ओळखीचा उपयोग होऊन कामांना वेग येईल. पैशांची चिंता मिटेल. तुमचे काही बेत सफल होतील. मात्र कामात दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीत अडचणींवर मात करून नेटके काम संपवाल. जोडव्यवसायातून विशेष लाभ होतील. घरात प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत घालवाल. त्यांचे हट्ट पुरवाल. महिलांना अंगी असलेले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.

सिंह : हात आखडता घेऊन राहिलात, तर लाभ तुमचाच होईल. भविष्यातील तरतुदींसाठी जागरूक असाल. व्यवसायात कामाचा विस्तार करण्याचा विचार असेल. प्रतिष्ठा टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी पैसे खर्च कराल. त्यामुळे तुमच्या वर्तुळात तुमचा दबदबा राहील. नोकरीत वरिष्ठ केलेल्या कामाचे कौतुक करतील. कामानिमित्त काही नवीन ओळखी होतील. घरातील आवश्यक वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून एखादी चांगली बातमी कळेल. महिलांना मानसिक शांतता लाभेल.

कन्या : सध्या आर्थिकदृष्ट्या चांगले ग्रहमान आहे. व्यवसायात पैशांअभावी रखडलेले बेत आता सफल होतील. कामाचे प्रमाण मनाप्रमाणे असेल. नवीन योजना व कल्पना प्रत्यक्षात साकार करता येतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत कामानिमित्त जादा सवलती मिळतील. शिवाय वरिष्ठ तुमच्या रास्त मागण्या मान्य करतील. घरात सर्व सुखसोयी वाढवण्याकडे तुमचा कल राहील. नवीन खरेदीचा आनंद वाढेल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण राहील. महिलांना प्रतिष्ठा मिळेल.

तूळ : बऱ्याच काळाने दिलासा देणारे ग्रहमान लाभले आहे. त्यामुळे शांतता वाटेल. व्यवसायात भोवतालच्या परिस्थितीचा फायदा करून घेतलाच, तर आर्थिक लाभ होईल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत वरिष्ठ अवघड उद्दिष्टे तुमच्यापुढे ठेवतील. जोडव्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ होईल. महिलांना त्यांच्या वर्तुळात प्रसिद्धी मिळेल. मनन, चिंतनात वेळ जाईल.

वृश्‍चिक : ग्रहांची मर्जी आहेच, त्याचा लाभ घ्यावा. व्यवसायात मोठे बेत साकार करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी वेळ व पैशांचा वापर करून तुमचे ईप्सित साधू शकाल. खेळत्या भांडवलाची तरतूद करून घ्याल. गरजेनुसार कामासाठी योग्य व्यक्तींची निवड कराल. नोकरीत ठरवलेली कामे पूर्ण होतील. कामाचा ताणही कमी होईल. प्रकृतीच्या तक्रारी कमी झाल्याने उत्साही राहाल. घरात अत्यावश्यक खर्च करावे लागतील. स्वतःच्या आवडीनिवडीला मुरड घालून इतर व्यक्तींचे मन राखावे लागेल.

धनू :  ध्येय-धोरणे ठरवून त्याप्रमाणे प्रगती कराल. व्यवसायात मोठ्या कामना आणि त्यातून मिळणारा जादा फायदा असे उद्दिष्ट असेल. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोगही त्याकामी कराल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत जादा काम करून जादा पैसे मिळवण्याची संधी मिळेल. नवीन नोकरीच्या कामात सफलता लाभेल. घरात कुटुंबासमवेत वेळ मजेत घालवाल. मानसिक समाधान व गृहसौख्याचा आनंद घेता येईल. मुलांना अपेक्षित यश मिळेल.

मकर : तुम्ही तुमचे धोरण लवचिक ठेवून बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात कामाचा भार वाढेल. पण त्यातून पैसे मिळणार असल्याने त्याचे तुम्हाला काही वाटणार नाही. कंटाळवाण्या कामातून तुमची सुटका झाल्याने हायसे वाटेल. गोड बोलून सहकाऱ्यांकडून खुबीने कामे करून घ्यावी लागतील. नोकरीत वरिष्ठ कामानिमित्त जादा सवलती व सुविधा देतील. नवीन ओळखी होतील. घरात इतरांच्या इच्छापूर्तीसाठी सढळ हाताने खर्च कराल. मानसिक समाधान मिळेल.

कुंभ : नवीन अनुभव येतील, तरी सतर्क राहावे. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींकडून बरेच काही शिकता येईल. अनुभवाची शिदोरी घेऊन पुढची ध्येयधोरणे आखावीत. बँका, हितचिंतक यांच्याकडून कर्जे मिळतील. त्याच्या जोरावर विक्री व उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. नोकरीत तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घेता येईल. जोडव्यवसाय असणाऱ्यांना नवीन कामे मिळतील. घरात आनंदी वातावरण राहील. सहजीवनाचा आनंद घ्याल. प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नये.

मीन : मानले तर समाधान मिळेल. व्यवसायात जे काम करत आहात त्याचा फायदा किती व कधी मिळेल, याविषयी साशंकता असेल. संथ गतीने काम करून यशश्री मिळवण्याचे ध्येय राहील. खेळत्या भांडवलासाठी वेळ व शक्ती खर्ची पडेल. नोकरीत स्वतःचे काम संपवून सहकाऱ्यांनाही कामात मदत करावी लागेल. वरिष्ठ गोड बोलून जादाची कामे करून घेत नाहीत ना, याकडे लक्ष ठेवावे. घरात तात्त्विक मतभेद होतील, तरी रागावू नये. तरुणांनी अतिआत्मविश्वास बाळगू नये.

संबंधित बातम्या