ग्रहमान - २७ जून ते ३ जुलै २०२०

अनिता केळकर
बुधवार, 1 जुलै 2020

ग्रहमान

मेष : कामाचा ताणतणाव कमी झाल्याने पुन्हा नव्या जोमाने उभे राहाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. पैशांची ऊब मन प्रसन्न करेल. सकारात्मक दृष्टिकोन लाभ घडवून आणले. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाची कामे तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा अधिकार व सवलतही देतील. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. बेरोजगार व्यक्तींना आशादायक संधी दृष्टिक्षेपात येईल. विद्यार्थ्यांसाठी चांगले ग्रहमान आहे.

वृषभ : केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. व्यवसायात कामाचा विस्तार करण्याचा बेत आखाल. हातातील कामे वेळेवर पूर्ण करण्याकडे भर राहील. कामामुळे धावपळ दगदग होईल. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. नोकरीत नेहमीची कामे करून इतरांनाही कामात मदत कराल. वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. घरात केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. स्वतःचीच मते इतरांच्या गळी पडाल. चांगली बातमी कळेल. नवीन खरेदीचे योग येतील.

मिथुन : जिद्द व चिकाटी या जोरावर कामात प्रगती साधाल. प्रगतीला पूरक ग्रहमान आहे. व्यवसायात मनातील बेत कृतीत आणण्याचा विचार असेल. योग्य व्यक्तींची मिळालेली संगत लाभदायी ठरेल. नोकरीत कामानिमित्त वरिष्ठ एखादी सुविधा देतील. जोडव्यवसायातून फायदा होईल. घरात आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. शुभकार्ये ठरतील. सामूहिक क्षेत्रात मान मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता मिळेल.

कर्क :  आशा निराशेचा खेळ सुरू राहील, तरी सकारात्मक धोरण ठेवावे. व्यवसायात थोडी सबुरी धरलीत, तर केलेल्या कष्टाचे चीज होईल. गोंधळात टाकणारी स्थिती असेल, तर वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. पैशांच्या व्यवहारात चोख रहावे. नोकरीत सतर्क रहावे. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मनाविरुद्ध वागावे लागले, तरी मतप्रदर्शन करू नये. घरात सलोख्याचे संबंध ठेवावेत. दुसऱ्यांच्या मतांचा आदर करावा. प्रकृतीची हेळसांड करू नये. चांगली बातमी कानावर पडेल.

सिंह : प्रयत्नाला नशिबाची साथ मिळाली, तर सर्व गोष्टी सुरळीत वेळेत पूर्ण होतील. मनोबल चांगले असेल. व्यवसायात तुमच्या मनाला पटेल, रुचेल असेच धोरण ठेवावे व त्याप्रमाणे कृती करावी. महत्त्वाचा धाडसी निर्णय घ्यावा लागेल. तात्पुरत्या खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. आर्थिक घडी सुधारण्यासाठी योग्य ती पावले उचलाल. नोकरीत एखादी चांगली संधी चालून येईल, तिचा लाभ घ्यावा. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. घरात सामंजस्याने प्रश्न सोडवावेत.

कन्या : कामात लवचिकता ठेवलीत, तर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ आता मिळेल. नवीन कामे मिळतील. पैशांची वसुली होईल. नोकरीत सहकाऱ्यांच्या मदतीने कामाचा भार हलका कराल. मनाविरुद्ध वागावे लागले, तरी तडजोडीचे धोरण ठेवावे. बेरोजगार व्यक्तींना कामाची संधी चालून येईल. घरात इतर व्यक्ती 'आवळा देऊन कोहळा काढत नाहीत ना?' याची खबरदारी घ्यावी. कामात चोख रहावे. प्रियजनांचा सहवास आनंद देईल.

तूळ : रेंगाळलेली कामे मार्गी लागल्याने कामाचा हुरूप वाढेल. वेळेचे व खर्चाचे योग्य नियोजन केलेत, तर सर्व काही साध्य होईल. व्यवसायात ओळखीतून नवीन कामे मिळतील. कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल वाढवावी. नोकरीत वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. शिवाय महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. सर्व ठिकाणी सतर्क राहून कामे संपवावीत. घरात अनावश्यक खर्च टाळावा. घरातील लोकांच्या सुख समाधानासाठी प्रयत्न कराल.

वृश्‍चिक : आजचे काम आजच करावे. कुणावरही विसंबून राहू नये. व्यवसायात आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. कामाच्या नवीन योजना मनात घोळतील. मात्र त्या प्रत्यक्षात साकार करण्यापूर्वी त्यातील त्रुटींचा अभ्यास करावा. नोकरीत कामाचा थोडासा आळस येईल, परंतु हलगर्जीपणा करू नये. कामच्यावेळी काम व इतर वेळी आराम कराल. घरात एखादी चांगली बातमी कळेल. आप्तेष्टांची गाठभेट होण्याची शक्यता. नवीन जागा खरेदीचे योग येतील.

धनू :  मनाला पटेल तेच काम हाती घेऊन मार्गी लावाल. व्यवसायात कामानिमित्त महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट व चर्चा कराल. खेळत्या भांडवलाची सोय होईल. नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत मनाप्रमाणे काम करता येईल. काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे, परंतु सलोख्याचे संबंध ठेवावेत. कामानिमित्त प्रवास घडेल, तरी लांबचा प्रवास टाळावा. घरात खरेदीचे बेत पार पडतील. सजगवृत्तीने वागून कामांना गती द्याल.

मकर : कामाचा ताण कमी झाल्याने मनावरचा ताणही कमी होईल. व्यवसायात कामाची योग्य दिशा ठरवाल व त्याप्रमाणे पावले उचलाल. दैनंदिन व्यवहारांना गती येईल. कामाचा व्याप वाढवण्याचा विचार असेल. नोकरीत मानाचे पद भूषवाल. कामात झालेला बदल सुखावह ठरेल. जोडव्यवसायातून फायदा मिळेल. घरात बोलण्यामुळे रागलोभाचे प्रसंग येतील. अतिस्पष्टवक्तेपणा टाळावा. मुलांच्या प्रगती व प्रकृतीची चिंता कमी होईल. नातेवाई, आप्तेष्ट यांची खुशाली कळेल.

कुंभ : विचारांना कृतीची जोड दिलीत, तर यशाचे प्रमाण वाढेल. कामाचा उरक राहील. व्यवसायात कामांना गती येईल. आर्थिक प्रश्न सुटतील. हितचिंतक मदत करतील. मनातील सुप्त बेत प्रत्यक्षात साकार होण्यास मूर्त स्वरूप येईल. नोकरीत फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. सहकारी व वरिष्ठांच कामात मदत होईल. एखादी चांगली बातमी कळेल. घरात तुमच्या कामाचे सर्वजण गोडवे गातील. केलेल्या कष्टाचे चीज मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला हुरूप येईल.

मीन : पैशांच्या व्यवहारांना उत्तम संधी मिळेल, त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. व्यवसायात उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून त्याप्रमाणे पावले उचलावीत. कमी श्रमात जास्त यश मिळवाल. मात्र चार पैसे राखून ठेवावेत. नोकरीत वरिष्ठ तुमच्याकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवतील. रागावर नियंत्रण ठेवावे. हट्टी स्वभावाला आळा घालावा. घरात 'नाचता येईना, अंगण वाकडे' अशी अवस्था असेल. सर्वांच्या मागण्या पुरवताना तारांबळ उडेल. कौटुंबिक कारणाने नातेवाईक एकत्र येतील.

संबंधित बातम्या