ग्रहमान - ४ ते १० जुलै २०२०

अनिता केळकर
सोमवार, 6 जुलै 2020

ग्रहमान

मेष : सकारात्मक घटना तुमचा उत्साह द्विगुणित करतील. व्यवसायात काही कामे तत्परतेने कराल. महत्त्वाच्या कामात पुढाकार राहील. पैशांची आवक वाढेल. नोकरीत कितीही काम केले तरी वरिष्ठांचे समाधान होणे कठीण आहे. कामात कार्य तत्पर राहावे. आपल्या बोलण्याने गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. महिलांचा वेळ घरातील कामात जाईल. एखाद्या प्रश्नामुळे तणाव जाणवेल, तरी शांत राहावे. मनन, चिंतनात वेळ घालवावा. तरुणांनी अतिधाडस टाळावे.

वृषभ : काही कारणाने लांबलेली कामे मार्गी लागतील व त्यासाठी तुम्ही केलेल्या कष्टाचे सार्थक होईल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. परंतु, आर्थिक चणचण जाणवेल, तेव्हा थोडा धीर धरावा. कामातील बेत गुप्त ठेवावेत. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. वागण्या-बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत, याची विशेष खबरदारी घ्यावी. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे होईल. मित्रमंडळी नातेवाईक यांच्या भेटीचे योग. 

मिथुन : एका जबाबदारीतून मोकळे होता न होता तोच नवीन जबाबदारी अंगावर येईल. त्यामुळे सतर्क राहावे लागेल. व्यवसायात काही ठोस निर्णय घेऊन कामात प्रगती कराल. घाईने, अव्यवहाराने न वागता निष्णात व्यक्तींचा सल्ला आवश्यक तेथे घ्याल. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत कामात बदल करावासा वाटेल. परंतु, भविष्यातील संभाव्य धोक्यांचा विचार आधी करून नंतरच पावले उचलावीत. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल.

कर्क : भोवतालचे वातावरण तुम्हाला बुचकळ्यात पाडणारे आहे, तेव्हा व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्यावा. योग्य व्यक्तींची योग्यवेळी घेतलेली मदत लाभदायी ठरेल. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्याल. नोकरीत इतर व्यक्तींच्या वागण्याने थोडेसे गोंधळून जाल, तरी शांत डोके ठेवून हातातील कामे उरकावीत. स्वतःच्या कामाकडे प्रथम लक्ष द्यावे. अन्याय झालेला सहन होणार नाही. घरात वादाचे प्रसंग येतील, तरी संयम ठेवावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. विचार पटले नाहीत, तरी वाच्यता करू नये.

सिंह : तुमचे मनोधैर्य उत्तम असल्याने अडीअडचणींवर मात करून प्रगती साधाल. व्यवसायात आलेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा तुमचा मानस असेल. खर्चाचा ताळेबंद करून मगच पुढे जावे. नोकरीत तुमचा निर्णय योग्यच असेल असे गृहीत धरू नये. प्रगतीचा टप्पा गाठण्यासाठी वेगळी पद्धत अवलंबाल. घरात इतरांच्या मागण्या मान्य कराल. चार पैसे जादा खर्च कराल. पाहुण्यांची ये-जा राहील. त्यांची सरबराई कराल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल.

कन्या : ''रात्र थोडी सोंगे फार'' अशी तुमची स्थिती असेल. घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष पुरवावे लागेल. व्यवसायात कामाची प्रगती समाधानकारक राहील. मनाप्रमाणे कामे होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. नवीन कामे हाती घ्याल. दगदग धावपळ वाढेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांचे सहकार्य कामात मिळेल. परंतु, तुमच्याकडून बरीच अपेक्षा असेल. कामांचे वेळापत्रक आखून त्याप्रमाणे कामे हाती घ्याल. घरात एखादा प्रश्न चिंता वाढवेल.

तूळ : कमी श्रमात जास्त यश मिळवायची मनीषा असेल. एखादी चांगली बातमी मन आनंदी करेल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. नवीन उपक्रमांना संस्था, योग्य व्यक्ती यांच्याकडून पाठिंबा मिळेल. नोकरीत कामानिमित्त वरिष्ठ सवलती व अधिकार देतील. मात्र त्याचा गैरवापर करू नये. पैशांची आवक वाढेल. बढतीची शक्यता. घरात प्रियजनांच्या जीवनातील एखादा आनंदाचा क्षण साजरा कराल. कलावंत, खेळाडूंना नवीन संधी मिळण्याची शक्यता.

वृश्‍चिक : महत्त्वाच्या ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात पैशांमुळे खोळंबलेली कामे मार्गी लागतील. योग्य दिशा मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखी होतील. नवीन योजना, कल्पना प्रत्यक्षात साकार करून कामात उलाढाल वाढवाल. नोकरीत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पण वेगळे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. कामानिमित्त प्रवास होईल. घरात महिलांना मनाजोगता खर्च करता येईल. नातेवाईक, मित्रमंडळी यांची ख्याली खुशाली कळेल. ज्येष्ठांनी मनन, चिंतनात वेळ घालवावा.

धनू : कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कृती करावी. यश हमखास मिळेल. व्यवसायात कोणतेही पाऊल टाकताना सर्व दृष्टिकोनातून त्याची छाननी करावी आणि नंतरच पुढे जावे. नवीन कामे हाती घ्याल. पैशांची स्थिती समाधानकारक असेल. नोकरीत तडजोडीचे धोरण स्वीकारून कामांचा फडशा पाडाल. कृतीवर भर राहील. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. कामात बदल करून फायदा मिळवाल. घरात वैचारिक मतभेद होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी.

मकर : गृहसौख्य देणारे ग्रहमान आहे. कामाचा तणाव कमी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात बरेच प्रश्न मार्गी लागतील. केलेल्या कामाचे व कष्टाचे चीज होईल. पैशांचा खर्च वाढला तरी तजवीज केलेली उपयोगी पडेल. नोकरीत कामात सजगवृत्ती बाळगावी. हातून चुका होणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावे. तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व सहकाऱ्यांना पटल्याने तुमची पत वाढेल. घरात वातावरण आनंदी राहील. महिलांना अंगी असलेले गुण दाखवण्याची संधी मिळेल.

कुंभ : सहज सोप्या वाटणाऱ्या कामास विलंब झाल्याने तुमची चिडचिड होईल. कामात 
अडचणींवर मात करून पुढे जावे लागेल. व्यवसायात नवीन हितसंबंध जोडताना काटेकोर राहावे. नवीन करार तूर्तास पुढे ढकलावेत. नोकरीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत. कामे वेळेत उरकावीत. जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाई करता येईल. सहकारी कामात मदत करतील घरात चांगल्या कारणासाठी पैसे खर्च होतील.

मीन : लवचिकता अंगी ठेवून भोवतालच्या वातावरणाशी मिळतेजुळते घेतले, तर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात उलाढाल वाढवणे व विस्तार करण्यासाठी काही बदल कराल. पैशांची सोय हितचिंतकांमुळे होईल. नोकरीत बदलीच्या कामात यश येईल. पदोन्नती होईल. कामाचा दर्जा सुधारेल. बेरोजगार व्यक्तींना काम मिळेल. एखादी आनंदाची बातमी कळेल. महिलांचा घरातील कामात वेळ जाईल. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. नातेवाइकांची खुशाली कळेल

संबंधित बातम्या