ग्रहमान - ११ ते १७ जुलै २०२०

अनिता केळकर
सोमवार, 13 जुलै 2020

ग्रहमान - ११ ते १७ जुलै २०२०

मेष : ''एकमेका साहाय्य करू'' या म्हणीची तुम्हाला आठवण होईल. व्यवसायात सहकाऱ्यांची मदत घ्याल. नवीन कामाचे आकर्षण वाटेल. त्याकरता खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. प्रयत्न केल्यास त्याचीही सोय होईल. नोकरीत कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. रेंगाळलेली कामे गती घेतील. प्रवासयोग संभवतो. घरात कर्तव्यदक्ष राहाल. कर्तव्याला प्राधान्य देऊन कामे मार्गी लावाल. खर्च वाढेल, त्यामुळे शिलकीतल्या पैशांना हात घालावा लागेल. छोट्या समारंभानिमित्त खरेदी होईल. प्रियजनांच्या भेटी होतील. वेळ मजेत जाईल.  

वृषभ : कामात केलेला आळस तुम्हाला परवडणार नाही, तेव्हा आजचे काम आजच करावे. व्यवसायात महत्त्वाच्या व्यक्तींची गाठभेट होईल. लांबलेली कामे हाती घेऊन पूर्ण करण्याचा सपाटा लावाल. भोवतालच्या व्यक्तींचे मूड सांभाळावे लागतील. आर्थिक भान चांगले राहील. नोकरीत एकाच वेळी अनेक कामे हाताळावी लागतील. कितीही कामे केली, तरी कमीच अशी तुमची अवस्था असेल. वरिष्ठांना खूश ठेवून तुम्ही तुमचा मतलब सध्या करून घ्यावा. घरात स्वतःच्या छंदात वेळ मजेत घालवाल. करमणुकीचे कार्यक्रम ठरतील. प्रियजनांच्या भेटीने आनंद वाटेल. 

मिथुन : पैशांची बचत करणे हे स्वभावातच नाही, त्यामुळे वरिष्ठांची बोलणी सहन करावी लागतील. व्यवसायात काम करत राहावे. यश हमखास मिळेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. जोडव्यवसाय असणाऱ्यांना विशेष फायदा संभवतो. नोकरीत अपेक्षा ठेवून कोणतेही काम करू नये. कामातील लक्ष विचलित होणार नाही याची खबरदारी घ्यावी. कार्यपद्धतीत केलेला फरक पचनी पडणार नाही, तेव्हा शांत चित्ताने राहावे. घरात न परवडणारे खर्च होतील. सर्वजण त्याची मजा घेतील. कुटुंबासमवेत प्रवासाचा योग संभवतो, मात्र लांबचे प्रवास टाळावेत. 

कर्क : चांगल्या कामाचे मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. नव्याने सुरू केलेल्या योजनांना उत्तम प्रतिसाद मिळेल. पैशांचे गणित समसमान राहील. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून सुविधा मंजूर करून घ्याल. पगारवाढ व कामातील बदल तुम्हाला मानसिक उभारी देतील. घरात प्रियजनांचा सहवास मिळेल. नवीन व्यक्तींच्या मैत्रीचा आनंद घ्याल. खर्च प्रमाणाबाहेर वाढणार नाहीत, याची काळजी घ्याल. आरोग्य उत्तम राहील. मुलांकडून अपेक्षित आनंदाची बातमी कळेल.  

सिंह : साहस केल्याशिवाय यश मिळत नाही, असा तुमचा ठाम विश्वास असतो. त्यामुळे काही कामात आक्रमक पवित्रा घ्याल. व्यवसायात प्रगतीसाठी नवे आव्हान पेलण्याची तुमची जिद्द असेल. येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मात करून पुढे जाल. त्यात बरीच शक्ती व वेळ खर्ची पडेल. नोकरीत अनुकूल घटना दृष्टिक्षेपात येतील. पैशांची सोय झाल्याने उत्साहाने कामाला लागाल. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. यश मिळेल. घरात एखादे शुभकार्य ठरेल. नवीन खरेदीचे योग येतील. मुलांच्या प्रगतीने आनंद मिळेल. मनन, चिंतनात वेळ जाईल. 

कन्या : मनोकामना पूर्ण झाल्याने तुमचा मूड आनंदी असेल. व्यवसायात महत्त्वाच्या निर्णयात धाडसी पावले उचलाल. मोठे काम हाती घ्याल. पैशांची जरी तंगी वाटली, तरी हितचिंतकांची मदत मिळेल. नोकरीत नवीन कामाचे व संधीचे वरिष्ठ आश्वासन देतील. सहकारी कामात मदत करतील. अवघड कामातही यश संपादन कराल. घरात छोट्या समारंभांनिमित्त स्वतःची व इतरांची हौस भागवाल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचे महत्त्व वाढेल. महिलांना प्रतिष्ठा व मान-मरातब मिळेल. तरुणांनी अतिधाडस करू नये. ज्येष्ठांनी मनन, चिंतनात वेळ घालवावा. 

तूळ : गाफील न राहता प्रत्येक काम चोखंदळपणे पूर्ण करावे. जादा आत्मविश्वास बाळगू नये. व्यवसायात हाती घेतलेले काम वेळेत व निगुतीने पार पाडावे. व्यवसायातील चढउतारांमुळे मध्येच थोडी चिंता वाटेल. गरजेपोटी कर्ज काढावे लागेल. नोकरीत सत्याला महत्त्व द्यावे. स्वप्नात रमू नये. काम केले तरी वरिष्ठ कौतुक करीत नाहीत, याची बोच मनाला जाणवेल. घरात प्रकृतीच्या लहानसहान तक्रारींवर वेळीच लक्ष द्यावे. शिस्तीचे धडे इतरांना देऊन स्वतः बेशिस्त वागू नये. रागांवर नियंत्रण ठेवावे. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.     

वृश्चिक : तुमच्या इच्छापूर्तीला अनुकूल वातावरण लाभेल. कामाबरोबरच जीवनाचा आस्वाद घेण्याकडे कल राहील. व्यवसायात कमी श्रमात जास्त पैसे मिळवाल. जोडव्यवसायातून चांगली कमाई होईल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत बदल करणाऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे संधी मिळेल. कामानिमित्त नोकरीत सवलती मिळतील. घरात पूर्वी ठरलेला शुभ समारंभ पार पडेल. मित्रमंडळी आप्तेष्ट यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. महिलांना मात्र नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मन रमविता येईल. 

धनू : दगदग धावपळ कमी करून कामे विश्वासाने इतरांवर सोपवाल. व्यवसायात मोठ्या कल्पना तुम्हाला आकर्षित करतील. आर्थिक व शारीरिक कुवतीचा अंदाज घेऊन मगच पुढचे पाऊल उचलावे. वेळेचे महत्त्व ओळखून कामे पूर्ण करावीत. नोकरीत सहकाऱ्यांच्या बोलण्यावर चटकन विश्वास ठेवू नये. हातातील कामे संपवून मगच नवीन कामांकडे वळावे. थोडा धीर धरून कोणताही निर्णय घ्यावा. घरात मोठ्या खर्चाची नांदी होईल. पण तो खर्च चांगल्या कारणासाठी असेल. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी.       

मकर : रोजच्या कामात तुम्हाला आनंद मिळतो, तसा आनंद खास या सप्ताहात मिळेल. व्यवसायात कामांना गती आणण्यासाठी कामाच्या कार्यपद्धतीत बदल कराल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला आवश्यकतेनुसार घ्याल. जोडव्यवसायातून चांगली कमाई होईल. नोकरीत युक्तीने हातातील कामे संपवाल. नवीन नोकरीच्या कामात थोडी तडजोड करावी लागेल. घरात होणारे खर्च तुम्हाला पटणार नाहीत, परंतु इतरांच्या मनाचा विचार करून ते खर्च करायला तयार व्हाल. मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. चांगली बातमी कळेल. प्रकृतिमान उत्तम राहील. 

कुंभ : एकावेळी एकच काम हाती घ्याल व तडीस न्याल. घर, व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर सतर्क राहावे लागेल. त्यामुळे तुमची धावपळ, दगदग होईल. व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कामे पार पाडावीत. आर्थिक व्यवहार स्वतः संभाळावेत. विश्वासू व्यक्तींवर कामे सोपवावीत व तुमचे कष्ट कमी करावेत. नोकरीत कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. मदतीची अपेक्षा ठेवलीत तर भविष्यात मदतीची परतफेड करावी लागेल, हे लक्षात ठेवावे. घरात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. पाहुण्यांची सरबराई करावी लागेल.   

मीन : ''अति तिथे माती'' हे लक्षात ठेवावे. भावनांवर काबू ठेवावा. व्यवसायात उधार उसनवार टाळावा. रोटरीच्या कामांना प्राधान्य द्यावे. आर्थिक गोष्टींकडे वेळीच लक्ष द्यावे. वसुली करताना ग्राहकांशी हितसंबंध जपावेत. नोकरीत काही काळ निराशा येईल. पुढाकार घेऊन घेतलेल्या कामाचा तुम्हाला फारसा उपयोग होणार नाही. मात्र तुमच्या मदतीचा लाभ सहकाऱ्यांना मिळेल. घरात देणी घेणी करण्यासाठी खरेदी होईल. मित्रमंडळींच्या बाबतीत नवीन अनुभव येतील. ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेवू नये. महिलांचे हौसेसाठी वेळ व पैसे खर्च होतील.

संबंधित बातम्या