ग्रहमान -  २ ते ८ ऑगस्ट

अनिता केळकर 
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

ग्रहमान -  २ ते ८ ऑगस्ट

मेष - मानले तर समाधान मिळेल. व्यवसायात केलेल्या कामाचे पैसे हातात मिळण्यास विलंब होईल, तरी सबुरीचे धोरण ठेवा. वसुली करताना जिभेवर साखर पेरून बोला. वागण्या-बोलण्याने हितसंबंध बिघडणार नाहीत याची दक्षता घ्या. नोकरीत भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. पैशांच्या व्यवहारात चोख राहा. घरात किरकोळ कारणावरून वादाचे प्रसंग येतील, तेव्हा डोके शांत ठेवावे. अनावश्यक खर्च होईल. महिलांनी स्वतःची मते इतरांना समजावून सांगितली तरच ती इतरांना पटतील.

वृषभ - कार्यक्षेत्र विस्तृत करण्यासाठी विशेष प्रयत्न राहील. त्यात यशही मिळेल. व्यवसायात नवीन जबाबदारी समर्थपणे स्वीकाराल. आवश्यक तेथे काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. पैशांची तजवीज होईल. नोकरीत कामाचा वेग वाढेल. सरकारी नियमांमुळे ध्येयधोरणे बदलाल. कोणावरही अतिविश्‍वास ठेवू नका. घरात कामाचा ताण वाढेल. खर्चाचे बजेट कोलमडेल. कौटुंबिक सोहळ्यात वेळ मजेत जाईल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. महिलांना संततीकडून सुखद बातमी कळेल.

मिथुन - मनाला जे पटेल व रुचेल, तसेच वागा. म्हणजे साशंकता निर्माण होणार नाही. व्यवसायात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य राहील. नवीन करार करताना त्यातील अटी, नियमांचा बारकाईने अभ्यास करा मगच सह्या करा. विक्षिप्तपणामुळे हितसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. कामानिमित्त प्रवास घडेल. नोकरीत कामात गुप्तता राखा. सहकाऱ्यांशी बोलताना तोलून मापून बोला. होणारे गैरसमज टाळा. घरात कौटुंबिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. नको त्या कामात बराच वेळ जाईल. प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे हाती घ्याल.

कर्क - जमाखर्च समसमान राहील. त्यामुळे हाती पैसे शिल्लक राहणार नाहीत. व्यवसायात उलाढाल वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न राहील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यपद्धतीत बदल कराल. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील, त्यासाठी जादा अधिकारही देतील. मात्र गैरफायदा घेऊ नका. कामाचा ताण वाढेल, तेव्हा सहकाऱ्यांकडून काही कामे करून घ्या. कामाच्यावेळी काम, इतर वेळी आराम असे धोरण राहील. घरात पाहुण्यांची सरबराई कराल. अनपेक्षित चांगली बातमी कळेल. मानसिक अस्वस्थता राहील.

सिंह - प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करा. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात दक्ष राहा. हातून काहीही चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्याल. कामाच्या नवीन संधी दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागणे हितकारक ठरेल. सत्तेपुढे शहाणपण नाही हे लक्षात ठेवावे. घरात कामाबाबत कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. कामाचे योग्य नियोजन करून कामे वेळेत संपवावीत. घरात वडीलधाऱ्या व्यक्तींचा आपल्या बोलण्याने अपमान होणार नाही याची काळजी घ्या. तरुणांनी अतिधाडस करू नये.

कन्या - स्वभावाला औषध नाही हे लक्षात ठेवून इतरांशी संबंध ठेवावेत. व्यवसायात स्वप्नपूर्तीसाठी जिवाचे रान करू नका. कामाची योग्य आखणी करून प्रगती साधा. हितचिंतक व निष्णात व्यक्तींचा सल्ला आवश्यक तेथे घ्या. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांना तुमच्याकडून बरीच अपेक्षा राहील. जोडव्यवसायातून आर्थिक प्राप्ती होईल. कामानिमित्त प्रवास योग, बदल किंवा बदलीसाठी सरकारी नोकरीत विशेष प्रयत्न करावेत. घरात मोठ्या व्यक्तींच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. मुलांच्या व घरातील व्यक्तींच्या सुखसमाधानासाठी चार पैसे जादा खर्च होतील.

तूळ - ‘अति तेथे माती’ ही म्हण लक्षात ठेवा. व्यवसायात मतलब साध्य होण्यासाठी तडजोडीचे धोरण स्वीकाराल. जुनी येणी लांबल्याने तुमची आर्थिक कुचंबणा होईल. नवीन कामे दृष्टिक्षेपात असतील, मात्र संभाव्य धोक्यांचा विचार करून पुढे जा. नोकरीत कार्यतत्पर राहा. वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मान्य करून घ्या. कोणतीही उधार उसनवार करू नका. आर्थिक व्यवहारात काटेकोर राहा. पैशांचा अतिमोह टाळा. घरात स्वतःचे मनःस्वास्थ्य सांभाळा. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यापासून चार हात लांब राहणेच इष्ट ठरेल.

वृश्‍चिक - आशा निराशेचा खेळ दाखवणारे ग्रहमान आहे. व्यवसायात कामात अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. खर्चही वाढेल. मात्र तुमचे मनोधैर्य उत्तम असल्याने यशस्वीपणे मात कराल. कामांना विलंब झाला तरी अहोरात्र काम करून वेळेत कामे पूर्ण करू असा विश्‍वास वाटेल. सरकारी नियमांचे मात्र काटेकोरपणे पालन करा. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे तंत्र सांभाळून कामे संपवाल. महत्त्वाचे निर्णय तूर्तास पुढे ढकला. घरात काही कडू गोड अनुभव येतील. मानसिक स्वास्थ्य जपावे. महिलांनी टोकाची भूमिका घेऊ नये. तरुणांनी निर्णय घेताना वरिष्ठांना गृहित धरू नये.

धनु - या सप्ताहात एखादी चांगली गोष्ट मनात आली तर लगेच कृतीत आणा. भोवतालच्या व्यक्तींशी सलोख्याचे संबंध ठेवलेत, तर केलेल्या कामाचे समाधान मिळेल. व्यवसायात नवीन मैत्री व कराराचे प्रस्ताव समोर येतील. परंतु तुर्तास सह्या करण्याची घाई नको. पैशाची सोय हितचिंतकाकडून होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून कामे कराल. वरिष्ठांच्या शब्दाला मान द्याल. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात आचरण व विचार यांचा ताळमेळ घालून कमी बोला. संघर्षाचे, वादाचे प्रसंग टाळा.

मकर - सतत कार्यमग्न राहून प्रगती करण्यावर भर राहील. व्यवसायात विनाकरण होणारा विलंब सहन होणार नाही. त्यामुळे बेधडकपणे निर्णय घेण्याकडे कल राहील. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या शब्दाला मान मिळेल. सहकारी व वरिष्ठ यांची मदत कामी येईल. मात्र मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करू नका. मौनव्रत पाळा. घरात प्रकृतीचे तंत्र सांभाळून काम करणे हितावह ठरेल. मनाप्रमाणे काम करता आल्याने समाधान मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश मिळेल.

कुंभ - केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे, हे लक्षात ठेवून कामांना लागा. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींबरोबर तुमचे संबंध कसे ठेवता, त्यावर यश अवलंबून राहील. नवीन अनुभव येतील. नवीन कामे व योजना हाती घ्याल. त्याला पैशांची उभारणी बँका व ओळखीतून होईल. नोकरीत मनाविरुद्ध काम करावे लागेल, तरी चिडू नका. कार्यतत्पर राहा. वरिष्ठांचा अवमान होणार नाही याची काळजी घ्या. घरात स्वयंसिद्ध राहा. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. वरिष्ठांशी तात्विक मतभेद होतील, तरी दुर्लक्ष करा.

मीन - ग्रहांची साथ राहील, त्यामुळे उत्साही राहाल. व्यवसायात कामाचे योग्य नियोजन केल्यास कमी श्रमात जास्त यश मिळेल. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घेतलीत तर त्याच लाभ होईल. नोकरीत तुमचे विचार वरिष्ठांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कामामुळे तुमचे महत्त्व वाढेल. सहकारी कामात मदत करतील. घरात सर्वांना सांभाळून घेणे ही तारेवरची कसरत असेल. शब्द हे एक हत्यार आहे, म्हणून ते जपून वापरा. मनन चिंतनात मन गुंतवा. मुलांकडून चांगली बातमी कळेल.

संबंधित बातम्या