ग्रहमान : 8 ते 14 ऑगस्ट

अनिता केळकर 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

ग्रहमान

मेष 
ग्रहमान कृतिशील बनवणारे. व्यवसायात प्रत्येक कामात यश मिळालेच पाहिजे अशी इच्छा असेल. कामाचा वेग मनाजोगता राहील. हातातील कामे वेळेत पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळावे. नोकरीत क्षमतेबाहेर जाऊन कामे करावी लागतील. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात वादाचे प्रसंग येतील. रागावर नियंत्रण ठेवावे. मनाला योग्य वाटेल तशीच कृती करावी. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग. 

वृषभ 
भावनेला महत्त्व द्याल. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल वाढवावी. अडीअडचणींवर मात करून प्रगती करावी. स्थावराचे व्यवहार करताना दक्ष राहावे. नोकरीत वरिष्ठांच्या वाढत्या सूचनांमुळे हैराण व्हाल. मनावर ताबा ठेवावा. सहकारी कामात मदत करतील. बढतीची शक्यता. घरात ज्येष्ठ व्यक्ती व मुलांच्या प्रकृती व प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. अतिविचार नको. मनन व चिंतन करावे. तरुणांनी चित्त विचलित न करता कृती करावी. योग्य निर्णय भविष्यात लाभदायक ठरेल.

मिथुन 
‘अति परिचयात अवज्ञा’ या म्हणीचा अनुभव  येईल. व्यवसायात माणसांची संगत व पारख याला महत्त्व द्यावे. बोलण्यापेक्षा कृतीवर भर देऊन कामाचा फडशा पाडावा. कामातील बेत गुप्त ठेवावा. नोकरीत वरिष्ठांनी सोपवलेली कामे पूर्ण करावीत. ‘शब्द हे शस्त्र आहे’ हे लक्षात ठेवून बोलावे. घरात गैरसमजुतीने होणारे वाद टाळावेत. विद्यार्थ्यांनी अतिताण घेऊन अभ्यास करू नये. 

कर्क 
मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात कामाला वेगळीच दिशा मिळेल. उलाढाल व फायद्याचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेताना निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवावीत. नवीन नोकरीत कामाचा अंदाज घेऊन कामे उरकावीत. कामानिमित्ताने प्रवासाचे योग. घरात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्यावे. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्‍न धसास लागतील. 

सिंह 
कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. व्यवसायात एखादी नवीन योजना हाती घ्याल. हातातील कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर ठेवावा. पैशाचे नियोजन व वेळेचे गणित यांचा ताळेबंद मांडावा. नोकरीत सहकाऱ्यांच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. नवीन अनुभव येतील. घरात इतर व्यक्तींची कामात मदत मिळेलच ही अपेक्षा ठेवू नका. रागावर नियंत्रण ठेवावे. मिळते जुळते घेऊन रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लावावेत. चांगली बातमी मन आनंदी ठेवेल. 

कन्या 
बुद्धिजीवी असल्याने बुद्धीच्या जोरावर कामे मिळवता व पूर्ण करता. कमी श्रमात जास्त यश मिळते. परंतु व्यवसायात एखाद्या प्रश्‍नात थोडीशी निराशा येण्याची शक्यता. बाजारातील चढउतारांकडे लक्ष द्यावे. नवीन गुंतवणूक करताना नीट विचार करून करावी. नोकरीत मनाविरुद्ध कामे करावी लागतील. आळस झटकून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. घरात तडजोडीचे धोरण लाभदायक. पेल्यातील वादळे पेल्यातच विरघळतील. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीने आनंद मिळेल. 

तूळ 
सर्व आघाड्यांवर सतर्क राहावे लागेल. व्यवसायात दिलेली वेळ व शब्द यांना महत्त्व द्यावे. आर्थिक व्यवहारात गाफील राहू नका. नवीन हितसंबंध जोडताना विश्‍वासार्हता पडताळून पाहावी. नोकरीत नवीन कामे हाती घेण्यापूर्वी शर्ती व अटींचा अभ्यास करावा. मगच पुढे जावे. पैशाच्या मोहापायी कुसंगत धरु नका. घरातच कित्येक प्रश्‍न निर्माण होतील. त्यावर तोडगा काढताना बराच वेळ व पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांनी मित्रांवर विसंबून राहू नये. 

वृश्‍चिक 
चिकाटीच्या जोरावर बराच काळ तग धरू शकता. तुमच्या या गुणाचा फायदा व्यवसायात होईल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चौफेर दक्ष राहावे लागेल. कामातील प्रगतीचा आलेख चढता राहील. पैशाची स्थितीही समाधान देणारी असेल. नोकरीत हितशत्रूंपासून सावध राहावे. तुमची प्रगती त्यांना सलेल. कामातील बेतही गुप्त ठेवावेत. घरात वैचारिक मतभेद होतील. दोन पिढीतील अंतर जाणवेल.  उत्तम मार्ग म्हणजे मौनव्रत ठेवावे. 

धनु 
‘जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’ ही म्हण लक्षात ठेवावी व स्वयंसिद्ध राहून कामे मार्गी लावावीत. व्यवसायात ऐकीव गोष्टींवर विश्‍वास न ठेवता प्रत्यक्ष शहानिशा करून मतप्रदर्शन करावे. अतिविश्‍वास टाळावा. कामाची योग्य आखणी भविष्यात लाभ देईल. नोकरीत कामात गोंधळ करू नका. शंकानिरसन करून कामाची विभागणी करावी. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे हाताळावीत. कष्ट जरी जास्त असले, तरी  
मिळणारे समाधान वेगळाच आनंद देईल. 

मकर 
विचार व वृत्ती यांचा समन्वय साधून कामे करावीत. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून होणारे नुकसान कमी करावे. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. पैशाची जुनी वसुली करताना थोडी सबुरी ठेवावी. नोकरीत तुमच्या विचारानेच कामे मार्गी लावावीत. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात आपल्याच वाटणाऱ्या लोकांचा नवीन अनुभव धक्कादायक असेल. शांत राहावे. प्रियजन, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग. 

कुंभ 
‘एकमेकां साहाय्य करू’ असा पवित्रा ठेवावा. व्यवसायात आवश्यक बाबींची पूर्तता करून कामे मार्गी लावावीत. ‘स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ याची प्रचिती येईल. कामात त्रासदायक वाटणारे निर्णय लांब ठेवावेत. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामाचे नियोजन असावे. सहकाऱ्यांची मदत होईल. घरात मोठ्या व्यक्तींच्या प्रकृतीची चिंता वाढेल. स्वतःच्याही प्रकृतीची काळजी घ्यावी. तरुणांनी अतिसाहस करू नये. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. 

मीन 
‘वारा वाहील तशी पाठ फिरवावी’ यश हमखास मिळेल. व्यवसायात स्पर्धकांवर कडी नजर ठेवावी. तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी मनाला लावून घेऊ नका. दृष्टिकोन बदलावा. पैशाची ऊब सुखावह ठरेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत अतिउत्साहापोटी भलतीच आश्‍वासने देऊ नका. कामांना प्राधान्य देऊन कामे संपवावीत. मन विचलित न करता कृतीवर भर द्यावा. घरातील व्यक्तींच्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. चांगली बातमी कळेल.

संबंधित बातम्या