ग्रहमान ः २२ ते २८ ऑगस्ट २०२०

अनिता केळकर
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

ग्रहमान 

मेष 
सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. अवघड, अशक्य वाटणाऱ्या कामात यश मिळवाल. व्यवसायात नवीन योजना हाती घ्याल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरीत तडजोडीचे धोरण स्वीकारून कामे पूर्ण करावीत. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करून कामे साध्य करावीत. महिलांनी कामाचा उरक पाडावा. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. 

वृषभ 
मनातील सुप्त बेत प्रत्यक्षात साकार होतील. आर्थिक फायदा मिळेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. जुनी येणी वसुल होतील. कामाची दिशा सापडेल. नोकरीत अपेक्षित बदल किंवा बदली होईल. अनपेक्षित चांगली बातमी कळेल. कामात बिनचूक राहावे. महिलांवर कामाची जबाबदारी पडेल. केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. राजकारणी लोकांना मानसन्मानाचे योग. 

मिथुन 
विशाल दृष्टिकोन ठेवून कामात प्रगती कराल. व्यवसायात कामात अनुभवी व्यक्तींची साथ उत्तम मिळेल. कामाचा झपाटा वाढेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरदार व्यक्तींना कामानिमित्ताने जादा अधिकार मिळतील. मात्र त्याचा गैरफायदा घेऊ नये. खर्चावर बंधन ठेवावे. महिलांना घरात कामाचा ताण वाढेल. इतरांची खुबीने मदत घ्यावी. 

कर्क 
कामातील सर्व अडथळे दूर होतील. व्यवसायात प्रगतीचा वेग वाढेल. नवीन कामे मिळतील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने मनाप्रमाणे खर्च कराल. नोकरीत तुमच्या वागण्या बोलण्याने इतरांचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. उधार उसनवार देऊ नये. घरात महिलांनी थोडे सबुरीचे धोरण ठेवावे. इतरांशी सलोख्याने संबंध राखावेत.

सिंह 
नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात सुसंवाद साधून कामे करण्यावर भर राहील. कष्टाचे चीज होईल. प्रगतीच्या संधी चालून येतील. नोकरीत वादाचे प्रसंग टाळण्यात यशस्वी व्हाल. परदेशगमनाची संधी मिळेल. लाभदायक घटना घडतील. महिलांना मनाची एकाग्रता साधता येईल. आवडत्या छंदात मन रमवाल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी व्हाल. प्रकृतिमान सुधारेल. 

कन्या 
महत्त्वाचे ग्रह अनुकूल असल्याने चिंता नाहिशी होईल. व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन लाभदायी ठरेल. महत्त्वाकांक्षा व जिद्द यांच्या जोरावर कामात यशश्री संपादन कराल. नोकरीत इतरांनाही कामात मदत कराल. मिळालेल्या संधीचा सदुपयोग कराल. महिलांचा वेळ सत्कारणी लागेल. समाधान लाभेल. सुवार्ता कळेल. 

तूळ 
व्यवसायात केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. नवीन कामे मिळतील. घेतलेले निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्या व्यक्तींच्या सल्ल्याचा उपयोग होईल. नोकरीत मिळालेल्या अधिकारांचा योग्य तो उपयोग करून घ्याल. कामात प्रसंगावधान राहून कामाचा उरक पाडाल. महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. तरुणांचे विवाह जमतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. 

वृश्‍चिक 
मनातील सुप्त इच्छा-आकांक्षा प्रत्यक्षात साकार होतील. व्यवसायात अनुकूल बदल होतील. जुनी येणी वसूल होतील. रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड होईल. वरिष्ठ जादा सवलती व भत्ते देतील. प्रवास घडेल. महिलांना नवीन मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची संधी प्राप्त होईल. वातावरण आनंददायी राहील. मनोबल वाढेल. 

धनू 
तुमचा उत्साह व आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडतील. व्यवसायात कामांचा वेग वाढेल. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. पैशाची आवक सुधारेल. नोकरीत कामात गुप्तता राखा. क्षमता ओळखून कामे स्वीकारा. महिलांना उत्तम गृहसौख्य मिळेल. आनंदवार्ता कळतील. मनाप्रमाणे खर्च करण्याची संधी मिळेल. पाहुण्यांची ये-जा राहील. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल. 

मकर 
अनुकूल ग्रहमानाचा फायदा घ्यावा. व्यवसायात कामानिमित्ताने मोठ्या व्यक्तींशी ओळखी होतील. प्रत्येक क्षेत्रात चांगले यश मिळेल. अर्धवट कामे हाती येतील. नोकरीत कृतीवर जास्त भर द्याल. वरिष्ठ सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. अचानक धनलाभाची शक्यता. महिलांना कामात वेळ पुरणार नाही. साहित्यिक, खेळाडू, कलावंतांना मानसन्मानाचे योग येतील. 

कुंभ 
लोकांशी संपर्क कसे साधता यावर यश अवलंबून राहील. व्यवसायात कल्पकता दाखवून कामे कराल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. नोकरीत कामात इतरांचे सहकार्य मिळेल. प्रगतीसाठी नवीन संधीही चालून येईल. महिलांना स्वतःचा विकास साधण्याची संधी मिळेल. प्रगती होईल. हातून दानधर्म घडेल. 

मीन 
व्यवसायात चोखंदळ राहून कामे कराल. बेफिकीर राहून चालणार नाही. कामात प्रगती करण्यासाठी मेहनत जास्त घ्यावी लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. कामाचा जास्त ताण पडेल. नोकरीत तडजोडीचे धोरण ठेवावे. सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा करू नये. तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महिलांची द्विधा मनःस्थिती  होईल तरी डोके शांत ठेवावे. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल.

संबंधित बातम्या