ग्रहमान : १३ ते १९ सप्टेंबर 

अनिता केळकर 
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

ग्रहमान : १३ ते १९ सप्टेंबर 

मेष 
कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. व्यवसायात योग्य व्यक्तींची निवड तुमचे कष्ट कमी करेल. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्याल. नोकरीत हातातील कामे पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळाल. पैशाची चिंता मिटेल. महिलांना कामात विचार करून त्याप्रमाणे कृती करावी लागेल. रागांवर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतिमान सुधारेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची उजळणी करावी. 

वृषभ 
ग्रहांची साथ मिळाल्याने मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसायात डोक्यावरचे ओझे खांद्यावर आल्याने हायसे वाटेल. मानसिक आरोग्य चांगले राहील. नोकरीत कार्यतत्पर राहाल. सहकारी व वरिष्ठांच्या पसंतीस उतराल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना घरातील व्यक्तींची मने जिंकता येतील. उमेद वाढेल. नोकरदार महिलांची प्रगती होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासास पूरक वातावरण लाभेल. 

मिथुन 
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ही म्हण सार्थ ठरवाल. व्यवसायात आलेल्या अडचणींवर मात करून यश मिळवाल. कार्यक्षमता वाढवून कामातील प्रगतीचा वेग वाढवाल. पैशाची तजवीज होईल. नोकरदार मंडळींना मनाप्रमाणे काम केल्याचे समाधान मिळेल. विरोधक सौम्य भाषेत बोलतील. जादा कामातून पैसे मिळवता येतील. महिलांना आवडत्या छंदात मन रमवता येईल. त्यामुळे उत्साही राहतील. विद्यार्थ्यांना केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. 

कर्क 
शब्द हे शस्त्र आहे, हे लक्षात ठेवून वागावे. व्यवसायात कामाचा वेग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत पैशाच्या मोहापायी पाशांपासून जरा लांबच राहावे. कुसंगत टाळावी. महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्यावा. नोकरदार महिलांनी कामात सतर्कता राखावी. महिलांनी बोलण्याने होणारे गैरसमज व वाद टाळावेत. विद्यार्थ्यांनी जादा आत्मविश्‍वास बाळगू नये. 

सिंह 
कर्तव्य श्रेष्ठ मानून कामाचा उरक पाडाल. व्यवसायात तुम्हाला आत्मविश्‍वासाचा फायदा होईल. नवीन आव्हाने स्वीकारून वेळेत पूर्ण करू शकाल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कामातील यशामुळे वरिष्ठ व सहकारी कौतुक करतील. महिलांचा वेळ कर्तव्यपूर्ती करण्यात जाईल. प्रियजनांच्या भेटीने आनंद वाटेल. प्रकृतिमान चांगले राहील. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता येईल. 

कन्या 
पैशाचे व्यवहार मनाप्रमाणे होतील. त्यामुळे आनंदी राहाल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामे मार्गी लावाल. नवीन कामे मिळतील. त्यासाठी अधिक गुंतवणूक करावी लागेल. नोकरीत कामानिमित्ताने प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना खर्च आटोक्यात ठेवून चार पैसे शिल्लक टाकता येतील. अध्यात्म व चिंतन यात बराच वेळ जाईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. विद्यार्थ्यांनी समयसूचकता पाळणे आवश्यक आहे. 

तूळ 
ग्रहमान संमिश्र फलदायी राहील. व्यवसायात वेळेचा चांगला उपयोग होईल. महत्त्वाची कामे गती घेतील. नोकरीत कामाच्या बाबतीत नवीन कल्पना सुचतील. मनाप्रमाणे कामे करता येतील. कलावंत, खेळाडूंना खेळात प्रसिद्धी मिळेल. महिलांना सामंजस्याने घरातील प्रश्‍न सोडवता येतील. नवीन वस्तू खरेदी करता येईल. तब्येतीच्या तक्रारीही दूर होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाला मूड चांगला राहील. 

वृश्‍चिक 
थोडी सबुरी ठेवलीत तर भविष्यात फायदा मिळेल. व्यवसायात पूर्वीच्या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळेल. अशक्य वाटणारी कामे शक्य करून यशप्राप्ती कराल. नोकरीत सरकारी कामे मार्गी लागतील. रेंगाळलेले प्रश्‍नही मार्गी लागतील. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून निर्णय घ्याल. महिलांची थोडीशी द्विधा मनःस्थिती होईल. संयमाने वागावे लागेल. घरात मुलांच्या मागण्या, हट्ट पुरवण्यासाठी पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यास करावा. 

धनू 
तुमचा आशावाद तुम्हाला व्यवसायात यश मिळवून देईल. पूर्वी केलेल्या कामातून आता पैसे मिळतील. येणी वसूल होतील. पैशाची ऊब मानसिक आरोग्य चांगले राखेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत, जोडधंद्यात विशेष लाभ होईल. परदेशगमनाची संधी चालून येईल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. वरिष्ठ व सहकारी यांची साथ लाभदायक ठरेल. महिलांना वातावरण अनुकूल लाभल्याने तणाव कमी होईल. कौटुंबिक प्रश्‍न धसास लागतील. वेळ आनंदात जाईल. विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासाने पेपर सोडवावा, यश  
हमखास मिळेल. 

मकर 
हाती घ्याल ते तडीस न्याल, व्यवसायात कामाचा झपाटा चांगला राहील. पैशाची स्थितीही सुधारेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. नोकरीत स्वतःचे काम संपवून इतरांनाही कामात मदत कराल. महत्त्वाचे निर्णय घ्यायचे झाल्यास वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. महिलांनी कामात चपळता दाखवून उरक पाडावा. प्रियजनांच्या जीवनातील आनंदाचे क्षण एकत्रित साजरा करता येईल. सामूहिक कामात सक्रिय सहभाग राहील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. 

कुंभ 
नशिबाची व ग्रहांची साथ लाभल्याने प्रगतीचा आलेख चढता राहील. व्यवसायात नवीन संधी चालून येतील. केलेल्या कष्टाचे चीज होईल. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत कार्यतत्पर राहाल. बेरोजगारांना कामधंदा मिळेल. मनाजोगता प्रवास होईल. नवीन ओळखी होतील. महिलांना गृहव्यवस्थापनाकडे लक्ष देता येईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. तरुणांचे विवाह जमतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. 

मीन 
व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. दुसऱ्यावर विसंबून न राहता कामे हातावेगळी करावीत. नोकरीत मिळालेल्या अधिकाराचा सदुपयोग करावा. मनाविरुद्ध वागावे लागले तरी मतप्रदर्शन करू नये. महिलांना मुलांच्या तैनातीत राहावे लागेल. दगदग, धावपळ होईल. गृहसौख्य मिळेल. आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या भेटीने आनंद वाटेल. प्रकृतिमान सुधारेल. विद्यार्थ्यांना स्पृहणीय यश संपादन करता येईल.

संबंधित बातम्या