ग्रहमान - २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर 

अनिता केळकर
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

ग्रहमान - २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर

मेष 
महत्त्वाचे ग्रह साथ देणार आहेत. व्यवसायात प्रगतीचा वेग समाधानकारक राहील. महत्त्वाकांक्षी योजना हाती घ्याल. प्रयत्नात सातत्य राखाल. नोकरीत तुमचे विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ होतील. नोकरदार महिलांना मानमरातब मिळेल. घरात महिलांचा आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. कार्यक्षमता वाढेल. विद्यार्थ्यांना विचारांची योग्य दिशा मिळेल. चांगली बातमी कळेल. 

वृषभ 
व्यवसायात मनावरचा ताण कमी झाल्याने कामांना हुरुप येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. देणी देता येतील. वेळेचे व पैशाचे गणित बरोबर येईल. नोकरीत कामे मार्गी लागतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. कलाकार, खेळाडूंना त्यांच्या कार्यक्षेत्रातून प्रसिद्धी मिळेल. महिलांना नवीन खरेदी करता येईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमधून यश मिळेल. प्रकृतिमान चांगले राहील. 

मिथुन 
कामात सावधपणा, संयम ठेवून कामे पूर्ण करावी लागतील. प्रयत्नांशिवाय फळ नाही हे लक्षात येईल. व्यवसायात नवीन कामे मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नोकरीत बेफिकीर राहून चालणार नाही. कामानिमित्ताने प्रवास घडेल. ‘शब्द हे शस्त्र आहे’ हे लक्षात ठेवावे. महिलांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. गैरसमजुतीने होणारे घोटाळे टाळावेत. अनावश्यक खर्चांवर बंधन ठेवावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मेहनत घ्यावी. 

कर्क 
रात्र थोडी सोंगे फार, अशी तुमची स्थिती होईल. व्यवसायात कामात बदल आवश्यक ठरेल, काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीत कल्पकता दाखवून कामे पूर्ण करावी लागतील. स्वतःचे काम वेळेत बिनचूक पूर्ण करण्याकडे कल राहील. महिलांना कामाचा ताण पडेल. अपेक्षाभंग होण्याची शक्यता. तरुणांनी अतिसाहस करू नये. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक. 

सिंह 
कामातील यश व प्रतिष्ठा तुमचा आत्मविश्‍वास वाढवेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन कामे मिळतील. डोक्यावरचे ओझे खांद्यावर येईल. नोकरदार व्यक्तींना मनाप्रमाणे कामे करता येतील. खर्चाचे प्रश्‍न सुटतील. तुमची मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. महिलांनी आलेल्या संधींचा सदुपयोग करावा. गृहसौख्याचा आनंद उपभोगता येईल. प्रकृतीची उत्तम साथ मिळेल. तरुणांचे विवाह जमतील. 

कन्या 
मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडतील. व्यवसायात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्याल. कामात अनुकूल बदल घडतील. नवीन गुंतवणूक करावी लागेल. आर्थिक येणे वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आता मिळेल. पगारवाढ, बढतीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. वरिष्ठांची मर्जी राहील. महिलांच्या हातून चांगली कामगिरी घडेल. कलाकार, खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात चांगला मूड लागेल. आध्यात्मिक प्रगती कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. 

तूळ 
योग्य निर्णय घ्याल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे हाती घ्याल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नोकरीत अनपेक्षित फायदा मिळेल. नशिबाला योग्य कृतीची जोड मिळेल. वरिष्ठांनी दिलेल्या अधिकाराचा वापर कराल. तुमचे महत्त्व इतरांना कळेल. महिलांना खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक वाटेल. पाहुण्यांची सरबराई कराल. गृहव्यवस्थापनात वेळ जाईल. विद्यार्थ्यांना योग्य व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. 

वृश्‍चिक 
व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी ठोस पावले उचलाल. महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याने मानसिक समाधान मिळेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. परदेशगमनाची संधी चालून येईल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची कामात मदत होईल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. बेरोजगारांना कामे मिळतील. जादा कामातून पैसे मिळतील. महिलांच्याबाबतीत उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील. नवीन कामांमुळे उत्साह वाढेल. तब्येतही सुधारेल. विद्यार्थ्यांना एकाग्रता साधता येईल. 

धनू 
मृगजळाच्या मागे न धावता हातातील कामे वेळेत पूर्ण करावीत. व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधी चालून येतील. कामात व परिस्थितीत अनुकूल बदल घडतील. कामातील अडचणी दूर होतील. नोकरीत विरोधकांचा विरोध मावळेल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. विशेष लाभ होतील. महिलांना कर्तबगारी दाखवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. मनःशांती व आध्यात्मिक प्रगती करता येईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत स्पृहणीय यश मिळेल. 

मकर 
 व्यवसाय नोकरीत फारशी हालचाल नको. थोडा वेळ धीर धरलात तर कामे मार्गी लागतील. व्यवहारी दृष्टिकोन लाभदायक ठरेल. कार्यक्षमता वाढवून कामाचा उरक पाडाल. नोकरीत सभोवतालच्या परिस्थितीनुसार निर्णयात बदल कराल. खर्चावर बंधन ठेवाल. वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत मिळेल. महिलांना कामात लवचिक धोरण फायदेशीर ठरेल. झेपेल तेवढेच काम करणे व प्रकृतीची काळजी घेणे महत्त्वाचे राहील. विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्‍वास टाळावा. 

कुंभ 
कामातील यश तुमचा आनंद द्विगुणित करेल. व्यवसायात न जमणारी कामे हाती घेऊन यश संपादन कराल. पैशाची चिंता मिटेल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत कुसंगत टाळावी. कामात कल्पकता दाखवून कमी श्रमात जास्त यश संपादन करावे. महिलांना परोपकारी वृत्तीमुळे फायदा होईल. सर्वांच्या कौतुकास पात्र ठराल. गृहसौख्य मिळेल. सामाजिक कामात सहकार्य लाभेल. मानसिक ताणतणाव कमी होईल. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय यश मिळेल. 

मीन 
तुमच्यातील धांदरटपणा जरा कमी केलात तर सर्व क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायात तडजोडीचे धोरण भविष्यात लाभदायक ठरेल. हातून बिनचूक कामे होतील व वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीत वरिष्ठांना दिलेला शब्द पाळणे बंधनकारक राहील. मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करून चालणार नाही. महिलांनी संयम व सहनशीलता अंगी बाळगणे आवश्यक आहे. पेल्यातील वादळे उठतील, तरी डोके शांत ठेवावे. विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांवर विसंबून राहू नये.

संबंधित बातम्या