ग्रहमान ः २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 2020

अनिता केळकर
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

ग्रहमान ः २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 2020

मेष 
सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. व्यवसायात योग्य कृतीला नवीन विचारांची जोड, फायदा मिळवून देईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. दूरदृष्टी ठेवून केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. नोकरीत कामात सक्रिय पुढाकार राहील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. घरात तुम्हाला इतर व्यक्तींची मदत होईल. नवीन वास्तू खरेदीचे योग येतील. महिलांना गृहसजावटीचा आनंद घेता येईल. 

वृषभ 
मंगळ, शनीची साथ मिळेल. कामांना वेग येईल. व्यवसायात हितचिंतकांची मदत मिळेल. नवीन कामे मिळतील. त्यामुळे पैशाची तजवीज करावी लागेल. नोकरीत स्वतःच्या मर्यादांचा विसर पडू देऊ नका. वरिष्ठ महत्त्वाच्या कामांची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी काही विशेष अधिकारही देतील. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवादाचे प्रसंग येतील. तरी डोके शांत ठेवावे. तरुणांनी अति साहस करू नये. महिलांनी आध्यात्मिक प्रगती करावी. 

मिथुन 
राशीस्वामी बुध आहे. रवि, मंगळही अनुकूल आहेत. त्याचा लाभ घ्यावा. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना गती द्यावी. कामातील बेत गुप्त ठेवावेत. आपले काम बरे की आपण बरे हे धोरण ठेवावे. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठांना तुमच्याकडून बरीच अपेक्षा राहील. तुमच्या सल्ल्याला मान मिळेल. बेरोजगार व्यक्तींना चांगली संधी नजरेच्या टप्प्यात येईल. घरात अपेक्षित गोष्टी पूर्ण होतील. महत्त्वाचे व्यवहार होतील. महिलांना आवडत्या छंदात वेळ रमविता येईल. 

कर्क 
मंगळ तुम्हाला क्रियाशील करेल. व्यवसायात महत्त्वाच्या कामांची नांदी होईल. कामात कर्तव्यदक्ष राहावे. पैशाचा विनियोग योग्य कारणासाठी करावा. नोकरीत वरिष्ठ वेगळ्या कामासाठी तुमची निवड करतील. दिलेली आश्‍वासने वरिष्ठ पाळतील. तुमच्या कामाने तुम्ही यश खेचून आणाल. घरात कोणत्याही कामात कसूर करू नका. कौटुंबिक जीवनात स्वप्ने साकार होतील. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना महत्त्व येईल. 

सिंह 
रवि, मंगळ महत्त्वाकांक्षा वाढवतील. व्यवसायात सकारात्मक धोरण लाभ घडवून देईल. पैशाच्या कामांना महत्त्व दिले तर अपेक्षित पैसे हाती येतील. कामाचा उत्साह वाढेल. नोकरीत मानले तर समाधान मिळेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवास घडेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. बेरोजगार व्यक्तींनी कामात लवचीक धोरण ठेवले तर नोकरीची संधी मिळेल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांच्या मागण्या व गरजा भागवताना नाकीनऊ येतील. महिलांनी सलोख्याचे  वातावरण ठेवावे. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. 

कन्या 
ग्रहांची फारशी मर्जी नाही तेव्हा पावले जपून टाकावीत. व्यवसायात अनपेक्षित बदल संभवतात. कामातील प्रगतीसाठी कार्यपद्धतीत बदल करावे लागतील. आर्थिक व्यवहारात दक्ष राहावे. मृगजळाच्या मागे न धावता थोडक्यात समाधान मानावे. नोकरीत कामात तत्पर राहावे. कोणावरही अतिविश्‍वास ठेवू नये. गैरसमजुतीने होणारे घोटाळे टाळावेत. घरात झेपेल तेवढेच काम करावे. विश्रांतीची गरज भासेल. प्रकृतीचे तंत्रही सांभाळावे लागेल. तरुणांनी बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. महिलांनी आत्मिक चिंतन करावे. 

तूळ 
तुमच्या उत्साही स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल. व्यवसायात कामाच्या नवीन संधी चालून येतील. नवे हितसंबंध जोडले जातील. उत्पन्नाचे प्रमाण वाढेल. नवीन कल्पना दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होईल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. परदेशगमनाची संधी येईल. घरात चांगली बातमी कळेल. सहजीवनाचा आनंद घ्याल. कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धीझोतात राहता येईल. 

वृश्‍चिक 
गरजेप्रमाणे धोरणात बदल करून कामात यश खेचून आणाल. रवि, मंगळ साथ देतील. व्यवसायात कधी शक्तीने तर कधी युक्तीने कामे मिळवाल. पैशाची आवक समाधानकारक राहील. कामात ओळखीचा उपयोग होईल. नोकरीत तुमची कार्यक्षमता वाखाणण्याजोगी राहील. व्यवहारासाठी परदेशप्रवास घडेल. नवीन कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. घरात महत्त्वाच्या निर्णयात तुमचा पुढाकार राहील. मुलांकडून सुवार्ता कळेल. तरुणांचे विवाह ठरतील. महिलांना अनपेक्षित लाभ होतील. 

धनू 
काहीतरी चांगली घटना जीवनमान बदलू शकेल. तरी येणाऱ्या संधीची वाट बघावी. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यक्षेत्रात व कार्यपद्धतीत बदल कराल. मात्र  कामातील बेत गुप्त राहतील याची खबरदारी घ्यावी. पैशाचा विनियोग योग्य कारणासाठी करावा. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मांडाव्यात. नशिबाची साथ मिळेल. सहकारी व वरिष्ठांना तुमचे महत्त्व लक्षात येईल. घरात इतर व्यक्तींच्या इच्छाआकांक्षा पुरवताना धन्यता मानाल. त्यांच्यासमवेत घालवलेले क्षण समाधान देतील. महिलांनी मनाची उमेद जागी ठेवावी. यश व आनंद दोन्ही मिळेल. 

मकर 
बुध अनुकूल आहे तरीही बोलताना जरा जपून! व्यवसायात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. महत्त्वाच्या गाठीभेटी, चर्चा होतील. कामात आवश्यक बदल करून उलाढाल वाढवण्याकडे कल राहील. पैशाची तजवीज झाल्याने ओझे खांद्यावर येईल. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठांची मर्जी राहील. आवश्यक तेथे ते सवलती देतील. कामासाठी प्रवास घडेल. घरात अत्यावश्यक खर्चाची तरतूद करावी लागेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. आरोग्य चांगले राहील. महिलांना आनंदाची बातमी कळेल. 

कुंभ 
महत्त्वाचे ग्रह शुभयोगात आहेत. तरी कामाचा सर्वंकष आढावा घेऊन मगच पुढचे पाऊल टाकावे. व्यवसायात सतर्क राहावे. चुकीची संगत धरू नये. पैशाच्या मोहापासून चार हात लांब राहावे. इतर सहकारी कामात मदत करतील. नोकरीत तुमचे नैपुण्य दाखवण्याची संधी येईल. काहीतरी वेगळे करून वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरतील. घरात माझ्या मतानुसारच सर्वांनी वागावे हा खाक्या राहील. फार आडमुठे राहू नका. वादविवाद टाळावेत. महिलांनी आळस झटकून काम करावे. 

मीन 
एकाच वेळी सर्व गोष्टी करण्याची तुमची धडपड राहील. नवीन विचार, कल्पना तुम्हाला काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा देतील. लाभ घ्यावा. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यावा. कामात उत्साह वाढेल. तरी सहकाऱ्यांची मदत घ्यावी. नोकरीत आर्थिक लाभ होईल. फायदा मिळवून देणारी कामे पूर्ण होतील. बेरोजगार व्यक्तींना नवीन नोकरीची संधी येईल. घरात अत्यावश्यक खर्च कराल. नातेवाईक, आप्तेष्ट, यांच्या भेटीचे योग येतील. प्रकृतीची उत्तम साथ मिळेल.

संबंधित बातम्या