ग्रहमान : ३ ते ९ ऑक्टोबर २०२० 

अनिता केळकर 
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

ग्रहमान : ३ ते ९ ऑक्टोबर २०२० 

मेष 
तुमच्या मनात कामात विस्तार करण्याच्या कल्पना घोळतील. त्यासाठी आवश्यक वाटल्यास ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. व्यवसायात फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य राहील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. पैशाची तात्पुरती सोय झाल्याने चिंता मिटेल. नोकरीत कामे नियोजनपूर्वक पूर्ण कराल. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर असेल. घरात कामाचा व जबाबदाऱ्यांचा मनस्वी कंटाळा येईल. त्यामुळे कामे लांबणीवर टाकाल. अडचणींवर मात करून तरुणांनी प्रगती करावी. महिलांनी तब्येत सांभाळावी. 

वृषभ 
या आठवड्यात तुम्हाला खट्टा-मीठा अनुभव येईल. व्यवसायात सतर्क राहून बाजारातील चढउतारांकडे लक्ष द्यावे. निष्णात व्यक्तींच्या सल्ल्याने वागून नवीन गुंतवणूक करावी. कोणतेही नवीन करार करताना त्यातील अटी-नियमांचा आधी विचार करावा. नोकरीत स्पर्धकांवर नजर ठेवावी. घाईने कोणतेही मतप्रदर्शन करु नका. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. इतर व्यक्तींच्या गरजांकडे लक्ष देणे गरजेचे होईल. महिलांनी रागांवर नियंत्रण ठेवावे. 

मिथुन 
आशावादी दृष्टिकोन राहील. त्याला ग्रहमानाची साथ मिळेल. ज्या कामात निराशा आली होती त्या कामात प्रगती होईल. आशेचा किरण दिसेल. व्यवसायात काही नवीन कडू गोड अनुभव येतील. मनाप्रमाणे कामे होतील. नोकरीत सभोवतालच्या व्यक्तींच्या विचित्र वागण्याचा नीट अंदाज येणार नाही. वरिष्ठांशी नरमाईने वागावे. दिलेली कामे बिनचूक वेळेत पूर्ण करावीत. वरिष्ठांनी दिलेले आश्‍वासन ते पाळतील ही अपेक्षा ठेवू नका. घरात  वातावरण चांगले राहील. मुलांकडून अपेक्षित प्रगती दिसेल. खर्चावर नियंत्रण राखू शकाल. 

कर्क 
या आठवड्यात वेळेचे महत्त्व ओळखून त्याप्रमाणे कामाची आखणी करावी. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना वेळीच महत्त्व द्यावे. नाहीतर कामांना विलंब होईल. हाती मिळालेल्या पैशाचा विनियोगही योग्य मार्गानेच करावा. जुनी देणी देऊन उरलेली थोडी गुंतवणूक करावी. पैशांच्या व्यवहारात दक्ष राहावे. नोकरीत कामाचे वेळी वरिष्ठ व सहकारी तुमची खुशामत करतील तरी वेळीच सावध राहावे. कामानिमित्ताने प्रवास संभवतो. घरात खर्चाला पेव फुटेल. त्यामुळे पैशाची तरतूद करावी लागेल. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडेही लक्ष द्यावे लागेल. महिलांनी विनाकारण होणारी दगदग कमी करावी. 

सिंह 
आर्थिकदृष्ट्या अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायात पैशांअभावी रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. महत्त्वाची ध्येयधोरणे आखून त्याप्रमाणे कामे करावी लागतील. निष्णात व्यक्तींचा सल्ला घेऊन मगच पुढील वाटचाल करावी. नोकरीत वरिष्ठ कामानिमित्ताने जादा अधिकार देतील. त्याचा वापर योग्य कारणासाठीच करावा. जोडधंद्यातून विशेष कमाई करता येईल. तुमचे कलागुण दाखवण्याची एखादी संधी येईल. लाभ घ्यावा. घरात तुमचे निर्णय अचूक ठरतील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. महिलांना मनाजोगते वागता आल्याने आनंद वाटेल. नवीन खरेदीमुळे वातावरण चांगले राहील. 

कन्या 
तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देणारे ग्रहमान आहे. त्याचा योग्य तो फायदा घ्यावा. व्यवसायात केलेल्या कामातून तुम्ही तुमची बुद्धीकौशल्याची चुणूक दाखवाल. स्वयंसिद्ध राहून कामे वेळेत पूर्ण करण्यावर तुमचा भर राहील. पैशाची स्थितीही समाधानकारक राहील. नोकरीत तांत्रिक अडथळे दूर होतील. कामानिमित्ताने परदेशवारी, लांबचे प्रवासयोग संभवतात. बोलण्याचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. घरात सुवार्ता कळेल. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीचे योग येतील. 

तूळ 
भाग्यकारक घटना जीवनात कलाटणी देतील. व्यवसायात परिस्थितीवर मात करून कामे यशस्वीपणे पार पाडाल. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी तुमचा बराच वेळ व पैसा खर्च होईल. जुनी येणीही काही प्रमाणात वसूल होतील. नोकरीत कंटाळवाणी कामे संपवून मनाप्रमाणे कामे करता येतील. कमी श्रमात जास्त यश मिळेल. वरिष्ठ व सहकारी कामात प्रयत्न करतील. घरात इतर व्यक्तींबरोबर सहजीवनाचा आनंद घेता येईल. प्रकृतिमान सुधारेल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल. 

वृश्‍चिक 
ग्रहांची विशेष साथ नाही तरीही जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर कामे प्रगतिपथावर न्याल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती  वेळेत पूर्ण कराल. व्यवसायात कामाच्या बाबतीत कोणावरही अतिविसंबून राहू नका. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. केलेल्या कामाचे ताबडतोब पैसे मिळतील अशीच कामे करावीत. उधार उसनवार शक्यतो टाळावी. नोकरीत कामाच्या स्वरुपात व पद्धतीत बदल होतील. घरात अनपेक्षित प्रश्‍नांना तोंड द्यावे लागेल तरी शांतचित्ताने वागावे. महिलांनी विनाकारण होणारी चिडचिड कमी करावी. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. 

धनू 
अडथळ्यांची शर्यत पार करून कामात प्रगती साधाल. विनाकारण लांबलेली कामे पूर्ण करण्यावर जोर राहील. व्यवसायात महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क झाल्याने कामे मार्गी लागतील. पैशाची चिंताही मिटेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत नवीन नोकरीच्या कामात प्रगती होईल. हातातील कामे वरिष्ठ व सहकारी यांच्या मदतीने पूर्ण करू शकाल. घरात वातावरण आनंदी राहील. जीवनातील तणाव कमी  होतील. महिलांना अध्यात्मिक प्रगतीसाठी बराच वेळ देता येईल. प्रकृतिमान सुधारेल. 

मकर 
महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती हातावेगळी करावीत. व्यवसायात कामातील गैरसोय त्रासदायक ठरेल. कामे पूर्ण करण्यासाठी चाकोरीबाहेरचा मार्ग अवलंबावा लागेल. मात्र त्यातील संभाव्य धोक्यांचा आधी विचार करावा. मगच पुढे जावे. नोकरीत सहकाऱ्यांवर अवलंबून राहू नका. कर्तव्याला चोख राहावे. भावनेपेक्षा कृतीवर भर द्याल. घरात अत्यावश्यक खर्च वाढतील. मुलांकडून मात्र अपेक्षित प्रगती कळेल. महिलांना मनाप्रमाणे वागता येईल. विवाहेच्छुंचे विवाह ठरतील. 

कुंभ 
आळस झटकून काम करावे, यश मिळेल. कर्तव्याची जाणीव करून देणारा आठवडा आहे. व्यवसायात नवीन योजना डोळ्यासमोर  असतील, त्यामुळे हातातील कामांकडे थोडे दुर्लक्ष होईल. आर्थिक परिस्थितीचा नीट विचार करून मगच कामे स्वीकारा. हातातील पैशाचा विनियोग योग्य कारणांसाठीच होईल याची दक्षता घ्यावी. नोकरीत तुमच्या भिडस्त स्वभावाचा सहकारी व वरिष्ठ गैरफायदा घेतील. घरात तणावाचे वातावरण असले तरी मौनव्रत पाळावे. महिलांनी रागांवर नियंत्रण ठेवावे. 

मीन 
व्यवसायात कामाचे प्रमाण समाधानकारक असेल. परंतु, कामांना म्हणावा तसा वेग येणार नाही. त्यामुळे तुमची थोडी चिडचिड होईल. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून हातावेगळी करावीत. नोकरीत सतरा डगरींवर हात ठेवू नका. कामात दक्ष राहा. कामातील बेत गुप्त ठेवावेत. घरात कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. त्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. थोडे मनन व चिंतन करावे. महिलांनी दगदग कमी करावी. विद्यार्थ्यांनी शांतचित्ताने विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. मनाजोगती कार्ये घडतील.

संबंधित बातम्या