ग्रहमान : १० ते १६ ऑक्टोबर २०२०

अनिता केळकर
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

ग्रहमान : १० ते १६ ऑक्टोबर २०२०

मेष : ग्रहमानाची साथ मिळेल. तुमच्या कामाचा वेग झंझावाती असेल. व्यवसायात नवीन योजना, नवीन कामांना चांगला प्रतिसाद मिळेल. त्यामुळे मोठे होण्याचे स्वप्न बाळगाल. मात्र अति उत्साह नको. तसेच कुसंगत नको. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामानिमित्त जादा अधिकार व सुविधा मिळतील. जुनी येणी वसूल होतील. हितशत्रूंपासून सावध राहा.

वृषभ : येन केन प्रकारे कामे पूर्ण करण्याचा मानस राहील. एखादा धाडसी निर्णय घेऊन कामे करण्यास प्रवृत्त व्हाल. व्यवसायात नको असलेल्या कामात बराच वेळ जाईल. तत्त्वांना मुरड घालावी लागेल. अनावश्यक पैसे खर्च होतील. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मांडा. तसेच मागण्या पूर्ण होण्यासाठी कराव्या लागणाऱ्‍या तडजोडींचा व परिणामांचा विचार करा. प्रवासात वाहने जपून चालवावीत.

मिथुन : स्वतःचे काम संपवून इतरांनाही कामात मदत कराल. व्यवसायात काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी निष्णात व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा. सहकारी कामात मदत करतील ही अपेक्षा नको. नोकरीमध्ये ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ हा अनुभव येईल. कामात झालेली चूक वरिष्ठांना सहन होणार नाही. घरात वातावरण चांगले राहील. वादाचे मुद्दे शक्यतो टाळा.

कर्क : हाती घ्याल ते तडीस न्याल. आवश्यक तेथे धाडसी निर्णय घेऊन कामात प्रगती कराल. व्यवसायात कुसंगत धरू नका. व्यवहारदक्ष राहा. पूर्ण झालेल्या कामाचे पैसे वसूल करावे लागतील. मतलब साध्य करून घेण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीने वागावे लागेल. नोकरीत कामात बदल किंवा बढती हवी असेल, तर वरिष्ठांचा मूड बघून वरिष्ठांपुढे प्रस्ताव मांडा.

सिंह : एखादे काम हाती घेतले की ते ताबडतोब झाले पाहिजे असा तुमचा खाक्या असतो. त्यामुळे कधी चुका होण्याची दाट शक्यता असते. तेव्हा त्याकडे लक्ष ठेवा. व्यवसायात धोके पत्करून नवीन कामे स्वीकारावी लागतील. नवीन कामे मिळवताना त्यात ओळखीचा हात मोठा असेल. कामातील संभाव्य धोके व त्रुटींचा अभ्यास करून मगच पुढे जा. नोकरीत विनाकारण कामे लांबवू नका.

कन्या : पुढाकार घेऊन कामे संपवाल. त्यासाठी वेळप्रसंगी थोडा धोकाही पत्कराल. व्यवसायात ठोस व ठाम कृतीवर भर राहील. फायदा मिळवून देणारे काम प्राधान्याने हाती घ्याल. तडजोड व तत्त्वांशी मुरड घालून काम पूर्ण करण्यावर भर राहील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत नशीब साथ देईल. जोडव्यवसायातून विशेष कमाई करता येईल. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करा. लांबलेले बेत सफल होतील.

तूळ : या सप्ताहात एखाद्या कारणावरून तुमचा सात्त्विक संपात उफाळून येईल. व्यवसायात चुकीच्या व्यक्तींशी हातमिळवणी करू नका. महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञांचा अथवा ज्येष्ठांचा सल्ला घ्या. नवीन करारमदार करण्यापूर्वी नीट विचार करा. नोकरीत हलके कान ठेवलेत तर त्रास होईल. सहकाऱ्‍यांवर विसंबून राहू नका. हातातील कामे वेळेत संपवा. महिलांना छंद जोपासता येईल.

वृश्‍चिक : मनोकामना व ईप्सित साध्य करणारे ग्रहमान आहे. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे हाती घ्याल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. नोकरीत नवीन संधीसाठी तुमची निवड होईल. जोडव्यवसायातून विशेष कमाई करता येईल. जुनी कामे मार्गी लागतील. वरिष्ठांची मर्जी राहील. घरात शुभकार्ये ठरतील. केलेल्या श्रमाचे चीज होईल. कामाचा हुरूप वाढेल. तरुणांचा मौजमजेचा मूड राहील.

धनू : तुमच्यातील बेधडक वृत्ती उफाळून येईल. व्यवसायात धोके पत्करून कामे कराल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन गुंतवणूक कराल. जुनी वसुली करण्याकडे विशेष लक्ष द्याल. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेनुसार कामे कराल. कामानिमित्त प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. घरात किरकोळ वादविवाद होतील, तरी दुर्लक्ष करा. तडजोडीने व सामंजस्याने प्रश्‍नांची उकल करा.

मकर : अनपेक्षित अडीअडचणींमुळे काही कामे या सप्ताहात लांबतील. व्यवसायात नको त्या कामात बराच वेळ जाईल. योग्य व्यक्तींची निवड योग्य कामासाठी केलीत, तर बरीच कामे मार्गी लागतील. डोक्यावरचे ओझे खांद्यावर येईल. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील बारकाव्यांचा अभ्यास करा. बाजारातील चढउतारांकडे बारकाईने लक्ष ठेवा. नवीन नोकरीत तडजोडीचे धोरण ठेवा.

कुंभ : कष्टाला फळ मिळत नाही, ही खंत या सप्ताहात विशेष जाणवेल. व्यवसायात काही धाडस करण्याचा मोह होईल. परंतु, सारासार विचार करून मगच कृती करा. महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. पैशाची तंगी जाणवली तरी वाईट मार्गाने जाऊ नका. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल.

मीन : तुमच्या विचार व कृतीवर भोवतालच्या व्यक्तींचा पगडा असतो. तेव्हा माणसांची पारख करणे अवघड आहे. तरीही भान ठेवून खबरदारी घेतलीत तर यश द्विगुणित होईल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. मात्र सखोल विचार केल्याखेरीज कोणालाही कुठलेही आश्‍वासने देऊ नका. मिळालेल्या पैशाचा वापर ठरवलेल्या कामासाठीच करा. नोकरीत वरिष्ठ जादा काम करून घेण्यासाठी तुमची खुशामत करतील.

संबंधित बातम्या