ग्रहमान - १७ ते २३ ऑक्टोबर २०२० 

अनिता केळकर
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

ग्रहमान - १७ ते २३ ऑक्टोबर २०२० 

मेष
    ग्रहांची मर्जी राहील. रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. व्यवसायात तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा असेल. योग्य व्यक्तींशी संपर्क आल्याने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठांना मागितलेल्या सवलती मिळू शकतील. नवीन नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नातील अडथळे दूर होतील. घरात एखादा समारंभ साजरा कराल. कामात व्यग्र रहाल. एखादी चांगली घटना मनाला समाधान देईल. विद्यार्थ्यांच्या मनावरचे दडपण दूर होईल.

वृषभ
    दैनंदिन कामांची घडी नीट बसेल. व्यवसायात पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. अवघड वसुली झाल्याने पैशाची चिंता मिटेल. खेळत्या भांडवलासाठी बँक कर्जेही मंजूर होतील. नोकरीत कामात ओळखीचा उपयोग झाल्याने गती मिळेल. सहकारी व वरिष्ठही कामात मदत करील. घरात मुलांकडून अपेक्षित यश मिळेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. प्रकृतीमान सुधारेल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास  बळावेल.

मिथुन
    मनःशांती मिळाल्याने कामाचा तणाव कमी होईल. व्यवसायात हितचिंतकांची मदत मिळाल्याने कामे मार्गी लागतील. नवीन कामे मिळतील. पैशाची तरतूद झाल्याने  चिंता मिटेल. नोकरीतील निरर्थक दगदगही कमी होईल. बोलण्याने झालेले गैरसमज दूर होतील. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. घरात सहजीवनाचा आनंद घ्याल. प्रकृतीचे प्रश्‍न कमी होतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. विद्यार्थ्यांना एकाग्रता साधेल.

कर्क
    अडथळयांवर यशस्वीपणे मात करून प्रगती कराल. केलेल्या प्रयत्नांना यश येईल. व्यवसायात मिळालेली मदत बरेच काही देऊन जाईल. विनाकारण लांबलेली कामे गती घेतील. नशिबाची साथ मिळेल. नोकरीत महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर राहील. त्यासाठी वरिष्ठ तुमच्या मदतीला सहकारी देतील. कामाचा तणाव त्यामुळे कमी होईल. घरात पैशाची स्थिती सुधारल्याने मनाजोगता खर्च करू शकाल. प्रियजनांच्या जीवनातील आनंदाचे क्षण साजरे कराल.

सिंह
    “धीर धरी रे” ही म्हण लक्षात ठेवून वागा. व्यवसायात हातात पडणार्‍या पैशांना विलंब झाल्याने कामांना विलंब होईल. तात्पुरती पैशाची सोय करावी लागेल. हातातील कामे आधी संपवून मगच नवीन कामांवर लक्ष केंद्रित करा. नोकरीत पैशाचा मोह टाळा. चुकीच्या व्यक्तींची संगत टाळा. वरिष्ठांच्या मतलबी वागण्याचा त्रास तुम्हाला होईल. मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करू नका. घरात वादाचे प्रसंग टाळा. प्रकृतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन करावे.

कन्या
    निराशा झटकून मोठया उमेदीने कामाला लागाल. व्यवसायात कामांना चांगली कलाटणी मिळेल. तुमच्या कामात आवश्यक त्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. कामाची कसर भरून काढून मानसिक समाधान लाभेल. पैशाची आवक सुधारेल. नोकरीत मनाजोगती कामे होतील. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा अधिकार व सवलती देतील. घरात वादातीत प्रश्‍नांमध्ये तोडगा निघेल. प्रकृतीमान सुधारेल. विवाह, मुंज इ. कार्यक्रम होतील त्यांना हजेरी लावाल. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढेल.

तूळ
    सभोवतालच्या परिस्थितीनुरूप तुम्ही तुमची ध्येयधोरणे आखाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील ती वेळेत पूर्ण होण्यासाठी तुमची धावपळ दगदग होईल. कर्तव्याला प्राधान्य राहील. त्याचा लाभ भविष्यात मिळेल. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. घरात एखादा शुभसमारंभ ठरेल. प्रवासाचे योग येतील. चांगली घटना मन प्रसन्न करेल. तरुणांना ज्येष्ठ व्यक्तींचा सक्रिय पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे

वृश्‍चिक
    तुमचा तणाव कमी करणारे ग्रहमान लाभल्याने कामात काहीतरी चांगले घडेल. व्यवसायात कामात सुधारणा होईल. ओळखीचा उपयोग होऊन काही कामे मार्गी लागतील. अपेक्षित पैसे हाती येतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत आशादायक गोष्टी घडतील. कामात वरिष्ठ सुविधा पुरवतील. छोटया प्रवासाचे योग येतील. बेकारांना नवीन नोकरी मिळेल. घरात वादविवाद कमी होतील. प्रियजनांसोबत जीवनाचा आस्वाद घ्याल. तरुणांचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

धनू
    चांगल्या घटनांची नांदी होईल. अपेक्षित यश नजरेच्या टप्प्यात येईल. व्यवसायात पैशाची चणचण कमी होऊन आर्थिक स्थैर्य मिळेल. नवीन कामे मिळतील. हातातील कामे गती घेतील. अपेक्षित व्यक्तींकडून कठीण कामात मदत मिळेल. विचार व कृती यांचा योग्य समन्वय साधला जाईल. नोकरीत कामांना योग्य दिशा मिळेल. जोडधंद्यातून जादा पैसे कमविता येतील. घरात आनंदाचे प्रसंग साजरे होतील. मनाजोगती खरेदी करता येईल. वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांनाही अभ्यासाचा ताण जाणवणार नाही.

मकर
    ग्रहमान अनुकूल आहे. त्यामुळे दिलासा देणाऱ्‍या घटना घडतील. व्यवसायात सजगवृत्तीने कामे कराल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. पैशाची स्थिती  सुधारेल. नोकरीत वरिष्ठ पाठिंबा देतील. तुमच्या शब्दाला मान मिळेल. रेंगाळलेले निर्णय मार्गी लागतील. घरात जुने प्रश्‍न धसास लागतील. वातावरण आनंदी असेल. प्रवासाचे बेत ठरतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढेल.

कुंभ
    आळस झटकून प्रगती करायची आहे हे ठरवून त्याप्रमाणे कृती कराल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कामातील गुप्तता राखा. अतिविश्‍वास ठेवून फसगत होण्याची शक्यता आहे. नोकरीत आपल्या कामात चोख रहा. सहकार्‍यांवर अवलंबून न राहता काम पूर्ण करा. घरात अत्यावश्यक गरजांसाठी पैसे खर्च करावे लागतील. मुलांच्या प्रगती व प्रकृतीबाबत थोडी चिंता राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अळमटळम करू नये.

मीन
    ज्या कामात विस्कळितपणा आला होता त्यात आता सुसूत्रता येईल. व्यवसायात ताणतणाव कमी होऊन कामे मार्गी लागतील. जुनी येणी वसूल होतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत मनाला पटणार्‍या गोष्टीच करा. कामात बिनचूक व काटेकोर रहा. विनाकारण होणारे वादविवाद व गैरसमज टाळा. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचा मानस असेल. घरात मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. आनंदाचे क्षण साजरे होतील. प्रकृतीमान सुधारेल. विद्यार्थ्यांनी मनन व चिंतन करावे

संबंधित बातम्या