ग्रहमान २४ ते ३० ऑक्टोबर २०२०

अनिता केळकर
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

ग्रहमान २४ ते ३० ऑक्टोबर २०२०

मेष : केलेल्या श्रमाचे चीज होईल. हाती पैसा खुळखुळेल. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून वेग वाढवू शकाल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. कामगारांना जादा पैशाचे आमिष दाखवून जास्त काम करून घेता येईल. नोकरीत मनाप्रमाणे काम करता येईल. जादा कमाई करण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. घरात तणाव कमी होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. 

वृषभ : प्रगतिपथावर नेणारे ग्रहमान आहे. व्यवसायात परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी स्वतःच्या कार्यपद्धतीत बदल कराल. ठरविलेले बेत साकार होतील. कामे मार्गी लागतील. पैशाची चिंता मिटेल. परदेशगमनाची संधी चालून येईल. घरात मुलांकडून सुवार्ता कळेल. मोठी खरेदी कराल. अनपेक्षित लाभ, चांगली बातमी मन प्रसन्न करेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

मिथुन : कामात सतत नावीन्य आणण्याचा प्रयत्न असतो त्यात यश येईल. व्यवसायात नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून बाजारातील प्रतिष्ठा वाढवाल. नवीन कराराचे प्रस्ताव नजरेच्या टप्प्यात येतील. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. सहकारी व वरिष्ठांची कामात मदत होईल. घरात तुमच्या कलागुणांना योग्य संधी लाभेल. लांबलेले शुभसमारंभ निश्‍चित होतील.

कर्क : माणसांचे नवीन अनुभव येतील. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा दृष्टिकोन ठरवाल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण कराल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत आश्‍वासनांवर अवलंबून न राहता तुमचे कर्तव्य पार पाडा. कामानिमित्ताने प्रवासयोग येईल. घरात सांसारिक जीवनातील जबाबदाऱ्यांचा कंटाळा येईल. त्यामुळे कामे पुढे ढकलाल.

सिंह : मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात ज्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले होते ते अडथळे आता दूर होतील. अपेक्षित व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. कामात केलेले बदल तुमच्या फायद्याचे ठरतील. नोकरीत मिळणारे फायदे तुमचा हुरूप वाढवतील. बदली किंवा बदल इ. कामांचा तूर्तास विचार  लांबणीवर पडेल. तुमच्या व इतर व्यक्तींच्या गरजांना प्राधान्य द्याल.

कन्या :  कर्तव्यपूर्तीसाठी तुम्ही सदैव दक्ष असता. मात्र या सप्ताहात कर्तव्य व विरंगुळा असा तुमचा दिनक्रम राहील. मन आवडीच्या क्षेत्रात रमेल. व्यवसायात खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. पैशाच्या विचाराने थोडे  अस्वस्थ व्हाल. परंतु जुन्या वसुलीमुळे कामात मार्ग निघेल. नोकरीत स्वतःची वेगळी प्रतिमा उमटविण्याचा तुमचा प्रयत्न राहील. वरिष्ठ व सहकाऱ्यांना कामात सहभागी करून घ्याल.

तूळ : दिलासा देणारे ग्रहमान आहे. अडचणींवर मात करून प्रगती कराल. प्रत्येक गोष्टीत माझे तेच खरे असा तुमचा अट्टाहास असेल. व्यवसायात सभोवतालच्या परिस्थितीशी मिळतेजुळते घेतलेत तर फायदा तुमचाच होईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत सहकाऱ्यांची  मदत मिळेल. त्यामुळे कामाचा भार सुसह्य होईल. कामामुळे तुमचे महत्त्व इतरांना समजेल. घरात एखादे शुभकार्य ठरेल.

वृश्‍चिक : नको त्या कामात तुमचा बराच वेळ जाईल. त्यामुळे दैनंदिन कामे पूर्ण होण्यास विलंब होईल. व्यवसायात बाजारातील चढउतारांमुळे तुमच्या धोरणात बरेच बदल करावे लागतील. पैशाचे गणित कोलमडेल. अशा वेळी योग्य व्यक्तींची निवड करून काही कामे त्यांच्यावर सोपवून पूर्ण करा. नवीन कामात गुप्तता राखा. नोकरीत नवीन कल्पना तुम्हाला भारावून टाकेल. मात्र लगेचच कृती नको.

धनू : रखडलेली कामे मार्गी लागल्याने  तुमची धावपळ दगदग वाढेल. मात्र सर्व कामे एकट्याने न करता योग्य व्यक्तींवर ती सोपवा. व्यवसायात कामानिमित्ताने नवीन व्यक्तींशी संपर्क साधता येईल. नफा मिळवून देणारी कामे हाती घ्याल. जुने प्रश्‍न मार्गी लागल्याने कामांना वेग येईल. नोकरीत गोड बोलून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्याल. नवी नोकरीच्या प्रयत्नांना यश लाभेल.

मकर : तुमच्या लवचिक स्वभावाचा तुम्हाला उपयोग होईल. व्यवसायात ज्या कामात फायदा जास्त अशा कामांना प्राधान्य द्याल. उधारीपेक्षा रोखीवर भर राहील. त्यामुळे पैशाची ऊब मिळेल. नोकरीत कामाच्या स्वरूपात तात्पुरते बदल होतील. वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत कामात होईल. घरात तुमचे विचार इतरांना पटवून देण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. खाण्यापिण्यावर मात्र बंधन ठेवावे.

कुंभ : तुम्हाला पूरक ग्रहमान आहे. नवे ध्येय व लक्ष तुमच्या नजरेसमोर असेल. व्यवसायात अपेक्षित व्यक्तीकडून उस्फूर्तपणे साथ मिळाल्याने काम करायला मजा वाटेल. परदेशगमनाची महत्त्वाची संधी दृष्टिक्षेपात येईल. नोकरीत बुद्धीला खाद्य देणारे काम मिळाल्याने तुम्ही खूष असाल. कामाचे समाधन राहील. घरात नातेवाईक आप्तेष्ट यांच्या येण्याजाण्याचे वातावरण आनंदी राहील.

मीन : बदलाशिवाय प्रगती नाही याची जाणीव होईल. त्यानुसार तुम्ही तुमची मानसिकता बदलाल. व्यवसायात उलाढाल मनाप्रमाणे राहील. फायद्याचे प्रमाण वाढविण्यासाठी नवा पर्याय शोधावा लागेल. मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रोत्साहनाचीही गरज भासेल. नोकरीत कोणत्याही कामात गुप्तता राखा. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश दिसेल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. आत्मविश्‍वासाने प्रगती कराल.

संबंधित बातम्या