ग्रहमान - २१ ते २७ नोव्हेंबर २०२०

अनिता केळकर
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

ग्रहमान - २१ ते २७ नोव्हेंबर २०२०

मेष 
महत्त्वाच्या ग्रहांची साथ लाभेल. बोलण्यातून विशेष लाभ होतील. व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी ठोस पावले उचलाल. नशिबाची साथ मिळेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी महत्त्वाची कामे सोपवतील. जादा सवलती व अधिकारही देतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांना अंगी असलेले सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. कौतुकास पात्र काम हातून घडेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान. 

वृषभ 
महत्त्वाची कामे हाती घेऊन पूर्ण कराल. पैशाची चिंता मिटेल. व्यवसायात कामासाठी योग्य वेळी योग्य व्यक्तींची केलेली निवड फायदेशीर ठरेल. उलाढाल वाढेल. नोकरीत कार्यतत्पर राहाल. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. महिलांना केलेल्या कामाचा आनंद मिळेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल. सुवार्ता कळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. कलाकार, खेळाडूंना त्यांचे क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. 

मिथुन 
स्वप्ने साकार होतील. अनपेक्षित लाभाची शक्यता. व्यवसायात ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. जुनी येणी वसुल झाल्याने चार पैसे हातात राहतील. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. मनाप्रमाणे कामे करता येतील. महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल. नवीन खरेदी करून गृहसजावट कराल. गृहसौख्याचा आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना एकाग्रता साधता येईल. 

कर्क 
मनात विचारांचे काहूर माजले असेल तर योग्य व निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या. मगच कृती करा. व्यवसायात आधुनिकीकरण करून विस्तार करण्याचे बेत असतील. पैशाची कुवत ओळखून कामाची आखणी करा. नोकरीत अविचाराने वागून त्रास व संकटे ओढवून घेऊ नका. पैशाच्या हव्यासापायी कुसंगत टाळा. मनाविरुद्ध वागावे लागले तरी चिडू नका. महिलांनी “मौन सर्वाथ साधनम्” हे लक्षात ठेवावे. तब्येतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी फाजील आत्मविश्‍वास बाळगू नये. 

सिंह 
साहस व धडाडी राहील. कामांना गती देण्यासाठी तत्पर राहाल. व्यवसायात कामाचा उरक दांडगा असेल. हितचिंतक मदत करतील. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. बेकार व्यक्तींना कामधंदा मिळेल. नोकरीत वरिष्ठ आवळा देवून कोहळा काढत नाहीत याची खात्री करा. तुमच्या मागण्या मूड पाहून मांडा व  मान्य करून घ्या. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना मुलांकडे लक्ष द्यावे लागेल. खर्चही वाढेल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. तरुणांचे विवाह ठरतील. 

कन्या 
अंगी असलेले सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायात घेतलेले निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे गोड बोलून सहकाऱ्यांकडून करून घ्याल. नवीन कामाची संधी मिळेल. नोकरदार व्यक्तींना केलेल्या कामात समाधान मिळेल. बढतीचे योग येतील. प्रवास घडेल. महिलांनी दगदग, धावपळ कमी करावी. अविश्‍वास न दाखवता कामे इतर व्यक्तींवर सोपवावीत. ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष शहानिशा करावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मनन व चिंतन करावे. 

तूळ 
सकारात्मक दृष्टिकोन राहील. नवीन कामे मिळण्यासाठी प्रयत्न कराल. व्यवसायात तांत्रिक अडथळ्यांवर मात करून उलाढाल वाढवाल. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. अर्धवट कामे मार्गी लागतील. नोकरीत कामाचा उरक दांडगा राहील. सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. गैरसमज मात्र टाळा. महिलांनी स्पष्टवक्तेपणा टाळावा. रागावर नियंत्रण ठेवावे. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करावेत. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना स्वतःच्या क्षेत्रात नाव कमविता येईल. 

वृश्‍चिक 
“आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे वागाल. अशक्य वाटणाऱ्या कामात यश संपादन कराल. तडजोडीचे धोरण स्वीकारून फायदा करून घ्याल. नोकरीत अहंपणा सोडून सहकाऱ्‍यांना मदत करा. कामातील बेत गुप्त ठेवा. तुमच्या वागण्या बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. घरात स्वतःचेच म्हणणे खरे करण्याचा अट्टहास धरू नका. इतरांचेही विचार जाणून घ्या. तब्येतीची हयगय करू नये. विद्यार्थ्यांनी सबुरीचे धोरण ठेवावे. 

धनू
आशा निराशेचे मधूनच तुम्हाला झटके येतात. तरी आशावादी राहून कामे हाती घ्या. एखादी चांगली बातमी मन प्रसन्न करेल. व्यवसायात उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून कृती कराल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत नवीन अनुभव येतील. अतिविश्‍वास टाळा. मैत्री व व्यवहार यात गल्लत करू नका. गुप्त शत्रूंपासून सावध रहा. महिलांना कामात झालेली दिरंगाई सहन होणार नाही. त्यामुळे चिडचिड होईल. जुने आजार डोके वर काढतील. वेळीच औषधोपचार करा. 

मकर 
सतरा दगडांवर हात ठेवण्यापेक्षा हातातील कामे आधी संपवा मगच नवीन कामांकडे वळा. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन मार्गी लावा. नवीन योजना, कामे मिळवण्याचा प्रयत्न राहील. नोकरीत तुमचे व कामाचे महत्त्व वरिष्ठांना कळून येईल. कौतुकास पात्र काम हातून घडेल. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यात यश येईल. घरात महिलांना मनाप्रमाणे वागता येईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांनी मात्र नाचरेपणा करू नये. खेळाडूंनी खेळात प्रावीण्य मिळवण्यासाठी कष्ट करावेत. 

कुंभ 
किचकट कामात यश मिळेल. प्रगतीचा आलेख वाढत जाईल. पैशाची वसुली झाल्याने पैशाची ऊब मिळेल. व्यवसायात पैशाअभावी रेंगाळलेल्या कामांना गती येईल. बँका व हितचिंतकांची मदत मिळेल. नोकरीत नवीन हितसंबंध जोडले जातील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. महिलांना अपेक्षित कामांना चालना मिळेल. केलेल्या कामाचे समाधान लाभेल. आवडत्या व्यक्तीच्या भेटीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना पूरक ग्रहमान लाभेल. 

मीन 
महत्त्वाचे निर्णय घ्याल. नवीन करारमदार होतील. मानसिक आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात पुढाकार घेऊन कामाची आखणी कराल. उत्साही राहाल. पैशाची स्थितीही समाधान देणारी राहील. नोकरीत सहकारी कामात मदत करतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. प्रवास घडेल. बदल घडून येईल. महिलांना छंदात वेळ मजेत जाईल. खर्च वाढेल. स्वप्ने साकार होतील. निर्णय अचूक ठरतील. तरुणांचे विवाह जमतील. प्रतिष्ठा मिळेल

संबंधित बातम्या