ग्रहमान -१९ ते २५ डिसेंबर

अनिता केळकर
सोमवार, 21 डिसेंबर 2020

ग्रहमान -१९ ते २५ डिसेंबर 

मेष
सध्या वातावरणाची साथ राहील. व्यवसायात अडीअडचणींवर मात करून यश मिळवाल. कामात आवश्यक ते बदल करून उलाढाल वाढवण्याचा विशेष प्रयत्न राहील. जुनी वसुली होईल. मात्र ती करताना इतरांशी संबंध  बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील. त्यासाठी जादा सवलत व अधिकारही देतील. सहकार्‍यांशी गोड बोलून कामे करून घ्या. घरात कामाचा पसारा वाढवू नका. प्रकृतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.

वृषभ
विरोधकांवर मात करून पुढे मार्गक्रमण कराल. व्यवसायात म्हणावी तशी साथ नसेल, तरीही सकारात्मक दृष्टिकोन राहील. सहज सोप्या वाटणार्‍या कामात अडथळे येतील. स्वयंसिद्ध राहून कामे उरकावीत. नोकरीत कितीही काम केले तरी समाधान नसेल. त्यामुळे निराशा होईल. परंतु कामात मग्न रहा. अनपेक्षित चांगली वार्ता कळेल. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. घरात प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. रागलोभाचे प्रसंग येतील, शांत रहा.

मिथुन
कामात चांगली कलाटणी मिळाल्याने उत्साह वाढेल. व्यवसायात स्वतःच्या मर्यादा ओळखून नवीन योजनांचा विचार करा. पैशाची तजवीज होईल. नोकरीत ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ या मंत्राचा उपयोग होईल. वरिष्ठ व सहकार्‍यांना तुमची किंमत कळेल. मनाजोगती कामे होतील. घरात मुलांच्या प्रगतीबाबत चांगली  बातमी कळेल. कामाचा उरक दांडगा असेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ग्रहमान लाभेल.

कर्क
ग्रहमान अनुकूल राहील. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण कराल. उलाढाल वाढेल. तसेच जुनी येणी वसुल होतील. मानसिक शांतता मिळेल. नोकरीत सहज सोपी कामे  सोपवली जातील. केलेली कामे कौतुकास पात्र ठरतील. शेअर्स किंवा नवीन फंडामध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात लाभदायी ठरेल. घरात नवीन वाहन जागा खरेदीचे योग येतील. मुलांकडे लक्ष द्यावे लागेल. तरुणांनी अतिधाडस करू नये.
सिंह
महत्वाकांक्षा जागृत होईल. त्यामुळे नवीन धाडस कराल. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामात फायद्याचे प्रमाण वाढवाल. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. नवीन कामे दृष्टीक्षेपात  येतील. नोकरीत योग्य व्यक्तींची  साथ मिळेल. मनातील इच्छा  
आकांक्षा  सफल होतील. जुनी वसुली होईल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात वातावरण चांगले राहील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.  तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. सामूहिक क्षेत्रात चांगली कामगिरी घडेल.

कन्या
एकाच वेळी घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष दयावे लागेल. व्यवसायात ग्रहांची मर्जी राहील. त्यामुळे चांगल्या घडामोडी घडतील. कामात प्रगती चांगली होईल. कामाचा उरक दांडगा राहील. त्यामुळे दगदग, धावपळ होईल. आर्थिक चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठांच्या सूचना पाळाव्या लागतील. त्यामुळे चिडचिड होईल. मनाविरुद्ध वागावे लागेल. मात्र रागाच्या भरात कुसंगत धरु नका. घरात अनपेक्षित खर्च वाढतील. पाहुण्यांची ये-जा राहील. विवाह, वास्तूशांत इ. कार्यक्रम पार पडतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

तूळ
कामाचे महत्त्व ओळखून त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा. व्यवसायात योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करा. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे लक्ष दया. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. नोकरीत सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येईल. कामात गुप्तता राखा. विचार व बेत यांची मांडणी योग्य रितीने हाताळा. घरात अंथरुण पाहून पाय पसरा. कर्ज काढून गृहसजावट करू नये. प्रकृतीकडे लक्ष दया.

वृश्‍चिक
मानलं तर समाधान मिळेल. व्यवसायात लांबलेली कामे मार्गी लागतील. पैशाची  चणचण दूर होईल. चिंता  मात्र नको. नोकरीत चांगली घटना तुमचे लक्ष वेधेल. वरिष्ठ दिलेले आश्‍वासन पाळतील. कामानिमित्ताने प्रवास योग. घरात शुभ कार्य ठरतील. समारंभासाठी पैशाची तजवीज करावी लागेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता टिकवावी.

धनू
संमिश्र ग्रहमान राहील. एक चांगली तर एक मनाविरुद्ध घटना घडेल. व्यवसायात पैशाची आवक चांगली राहील. जुनी येणीही वसुल होतील. नवीन कामे  मिळतील. प्रगतीसाठी नवीन गुंतवणूक कराल. नोकरीत मोठया कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. त्यासाठी अधिकारही देतील. जोडधंद्यातून  लाभ होईल. नवीन ओळखीचा उपयोग होईल. घरात आपल्याच माणसांचा विचित्र अनुभव येईल. रागावर नियंत्रण ठेवा. प्रकृतीची हेळसांड करू नका. मुलांच्या प्रगतीबाबत निश्‍चिंत व्हाल.

मकर
सध्या तुमचा आत्मविश्‍वास बळावला आहे. त्यामुळे धाडस करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात सहज मोठया वाटणार्‍या कामात अडथळे येतील. परंतु निराश न होता अथक श्रमाने यश संपादन कराल. पैसे व वेळ यांची योग्य सांगड घालून कामाचे नियोजन केले तर लाभ होईल. नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करा. भावनेच्या भरात उधान उसनवारी टाळावी. कर्तव्यपूर्तीला प्राधान्य राहील. घरात सहजीवनाचा आनंद घ्याल. मुलांच्यासाठी पैसे खर्च कराल. मानसिक समाधान राहील.

कुंभ    
कल्पनेला वास्तवतेची जोड मिळेल. व्यवसायात मनोकामना पूर्ण होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. फायदा मिळवून देणार्‍या कामांकडे लक्ष द्याल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत कोणत्याही कामात बेफिकीर राहू नका. वरिष्ठांची एखादी गोष्ट जरी पटली नाही तरी विरोध करू नका. घरात किरकोळ कारणावरून वादविवाद होतील. दुर्लक्ष करा. प्रियजनांच्या जीवनातील आनंदाचे क्षणात सहभागी व्हाल. तरुणांचे विवाह ठरतील.

मीन
ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल. चिकाटी, जिद्द यांचे जोरावर कामे मिळतील. नोकरीत कामाचा वेग उत्तम राहील. कामात प्रगतीचे मार्ग खुले होतील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. घरात आनंद देणारी चांगली घटना घडेल. तरुणांचा उत्साह वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पोषक वातावरण मिळेल. प्रकृतीमान सुधारेल

संबंधित बातम्या