ग्रहमान २ ते ८ जानेवारी २०२१

अनिता केळकर
मंगळवार, 5 जानेवारी 2021

ग्रहमान २ ते ८ जानेवारी २०२१

मेष
मनाची आलेली मरगळ व निराशा दूर करून नवीन आशावाद घेऊन प्रगती कराल. व्यवसायात मनातील कल्पना प्रत्यक्षात साकार होतील. रेंगाळलेली कामे गती घेतील. पैशाची चिंता मिटेल. व्यवसायात काही कटू अनुभव येतील तरी दुर्लक्ष करा. नोकरीत पगारवाढ व बढती होईल. सहकारी व वरिष्ठ कामात मदत करतील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात मनासारख्या घटना घडतील. वातावरण चांगले राहील. महिलांचा सकारात्मक दृष्टिकोन पुढे जाण्यास प्रवृत्त करेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

वृषभ
नशीब साथ देईल. व्यवसायात चांगल्या घटनांची नांदी होईल. नवीन कामे मिळतील. हितचिंतकांची मदत कामात होईल. जुनी येणी वसुल झाल्याने पैशाची तजवीज होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल. कामाची नवीन जबाबदारी वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा सवलती व अधिकारही देतील. कामात विस्तार होईल. घरात व्यक्तिगत कामांना वेग येईल. पाहुण्यांची ये-जा राहील. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. तरुणांना स्थिरता लाभेल. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता येईल.

मिथुन
सतत बदल व चंचल मन अशी तुमची प्रवृत्ती आहे. त्यात बदल करावा लागेल. व्यवसायात सावधतेने पावले टाका. कामात गुप्तता राखा. पैशाच्या व्यवहारात चोख रहा. नवीन कामे मिळतील. नोकरीत सतर्क रहा. मागण्यांसाठी वरिष्ठांपुढे हट्ट धरू नका. प्रकृतीला झेपेल तेवढेच काम करा. घरात व्यक्तींच्या स्वास्थाविषयी चिंता वाटेल. वाढीव खर्चामुळे पैशाची चिंता राहील. विद्यार्थ्यांनी नशिबावर हवाला ठेवू नये. तरुणांनी अतिधाडस करू नये.

कर्क
ग्रहमान धावपळ वाढवणारे आहे. मात्र गुरूची साथ मिळेल त्यामुळे व्यवसायात गैरसोय संपून नवीन आशावाद निर्माण होईल. रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. नवीन उपक्रम कार्यान्वित होतील. नोकरीत धावपळ संपून कामाचे श्रेय देणारे काम मिळेल. नवीन ओळखी होतील. जोडधंदा असणार्‍यांना विशेष लाभ मिळतील. घरात कामाचा ताण वाटेल. तसेच प्रकृतीकडेही लक्ष द्यावे लागेल. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. महिलांना मनःशांती मिळवणे गरजेचे भासेल. कलाकार, खेळाडूंना एकाग्रतेने त्यांच्या क्षेत्रात कामगिरी करावी लागेल.

सिंह
संमिश्र ग्रहमान आहे. परिस्थितीचा फायदा कसा उठवायचा हे तुमच्याच हाती आहे. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना वेग दया.  खेळत्या भांडवलाची गरज असेल तर त्यादृष्टीने प्रयत्न करा. महत्त्वाची कामे ओळखीतून होतील. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होतील. जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल. घरात वाढता खर्च होईल. त्यासाठी हातातील पैशाचा वापर विचारपूर्वक करा. प्रकृतीची काळजी घ्या. तरुणांनी अतिधाडस करू नये. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी.

कन्या
ग्रहमान पूरक असल्याने प्रगतीचा आलेख उंचावेल. व्यवसायात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल कराल. ध्येयामुळे अभिलाषा वाढेल. मात्र हे करताना आर्थिक स्थितीचा अंदाज घ्या. खेळत्या भांडवलाची सोय करावी लागेल. नोकरीत कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. वेळेत बरीच कामे पूर्ण करू शकाल. वरिष्ठांची मर्जी राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. तरुणांचे विवाह ठरतील. महिलांना मनाजोगता खरेदीचा आनंद घेता येईल.

तूळ
केलेल्या कामाचा आनंद मिळेल. त्यामुळे नवीन कामांना उत्साह वाटेल. व्यवसायात गरजेप्रमाणे पैसे मिळतील. नवीन योजना साकार होतील. विरोधकांचा विरोध मावळेल. नोकरीत इतरांपेक्षा वेगळेपणा सिद्ध कराल. वरिष्ठांकडून कौतुकास पात्र व्हाल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात छोट्या मोठया खरेदीमुळे समाधान मिळेल. प्रश्‍नांची उकल झाल्याने मनःशांती लाभेल. विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल.

वृश्चिक
सध्या कळतं पण वळत नाही अशी स्थिती तुमची आहे तरी कोणावरही विसंबून राहू नका. व्यवसायात हातातील कामे स्वतः पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. कोणालाही आश्वासनं देताना त्याची पूर्तता करू की नाही याची शहानिशा करून मगच पुढे जा. पैशाचे व्यवहारात चोख रहा. नोकरीत तुमचे काम वेळेत व बिनचूक करा. स्वतःचे काम संपवून तुम्ही सहकार्‍यांनाही कामात मदत कराल. घरात व्यक्तींचे समाधान करणे कठीण जाईल. डोके शांत ठेवावे. 

धनू
पूरक वातावरण लाभल्याने कामे प्रगतिपथावर राहतील. सर्व आघाड्यांवर अग्रेसर राहण्याची ऊर्मी मनात असेल. व्यवसायात एकाच वेळी बरीच कामे हाती घ्याल. त्याकरिता योग्य व्यक्तींची निवड कराल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत बदली किंवा परदेशगमनाचे सूतोवाच होईल. त्याचा भविष्यात फायदा घेण्याकडे कल राहील. घरात वातावरण आनंदी व उत्साही असेल. तरुणांना नवीन व्यक्तिचे आकर्षण राहील. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची चणचण कमी जाणवेल (महिलांना) आत्मिक समाधान लाभेल.

मकर
आशेचा किरण दिसू लागेल. त्यामुळे तुमचा उत्साह व्दिगुणीत होईल. केलेल्या नियोजनाचा व्यवसायात लाभ होईल. रेंगाळलेली कामे गती घेतील. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकार्‍यांकडून खुबीने करून घ्या. जमाखर्चाची बाजू तात्पुरती समसमान राहील. नोकरीत वरिष्ठ नवीन प्रकारच्या कामाचे सूतोवाच तुमच्याजवळ करतील. मात्र त्याविषयी संदिग्धता असेल. सहकार्‍यांना खूष ठेवून आपला मतलब साध्य करून घ्या. घरात वातावरण समाधानकारक असेल. मुलांच्या प्रगतीबाबत चांगली वार्ता कळेल. महिलांना हौसमौज करता येईल. आप्तेष्टांची भेट होईल.

कुंभ
पैशाची फारशी फिकीर नसल्याने खर्चावर बंधन राहणार नाही. ग्रह तुमच्या दिमतीला असतील त्याचा लाभ घ्या. व्यवसायात नवीन विचार व कार्यपद्धतीचा अवलंब करून उलाढाल वाढविण्याकडे कल राहील. कामानिमित्ताने सभोवतालचे वर्तुळही बदलेल. मनाप्रमाणे काम करता येईल. नोकरीत मनाप्रमाणे काम करण्याची मुभा वरिष्ठ देतील. वेगळ्या पद्धतीचे काम हाताळण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग येतील. कमी श्रमात जास्त यश मिळेल. घरात कुटुंबासह फेरफटका मारण्याचा व छोटी सहल काढण्याचा कार्यक्रम ठरेल. नवविवाहितांना छोट्याच्या आगमनाची चाहूल लागेल.

मीन
गुरूची साथ तुम्हाला ताजेतवाने ठेवेल. व्यवसायात यशाची कमान उंचावत राहाण्यासाठी तुमची मेहनत करण्याची तयारी असेल. एखादा धाडसी निर्णय तुम्ही घ्याल. पूर्वी केलेल्या कामाचा आर्थिक व इतर स्वरूपात फायदा मिळण्याची तुमची इच्छा सफल होईल. योग्य व्यक्तींशी संपर्क साधा. नोकरीत चांगली कामगिरी करून वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. जोडधंद्यातून फायदा होईल. घरात प्रियजनांच्या जीवनात सुखद प्रसंगाची नोंदी होईल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीने आनंद मिळेल. प्रकृतीमान सुधारेल. महिलांचा वेळ मजेत जाईल. कलाकार, खेळाडूंना त्यांचे क्षेत्रात प्रसिद्धी व मानमरातब मिळेल.

संबंधित बातम्या