ग्रहमान : ९ ते १५ जानेवारी 2021

अनिता केळकर
सोमवार, 11 जानेवारी 2021

ग्रहमान : ९ ते १५ जानेवारी 2021

मेष 
सप्ताहात कामांना महत्त्व देऊन ती पूर्ण कराल. व्यवसायात अनपेक्षित खर्च व अडथळयांना तोंड देण्याची मानसिकता ठेवा. खेळत्या भांडवलाची सोय बँका व हितचिंतक यांच्याकडून होईल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील, ती मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत हातातील कामे संपवून मगच सहकार्‍यांना मदत करा. वरिष्ठ एखादया कामाची महत्त्वाची जबाबदारी सोपवतील, त्यामुळे जादा काम करणे भाग पडेल. घरातल्या व्यक्तींच्या गरजांना प्राधान्य दयाल. रागावर नियंत्रण ठेवलेत तर डोके शांत राहील. प्रकृतीची कुरकुर कमी होईल. महिलांना अध्यात्मिक प्रगती करता येईल. 

वृषभ 
कामाची विस्कटलेली घडी नीट बसवून कामे पूर्ण कराल. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तांचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे धोरण ठरवाल. व्यावसायिक यश वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. तुमची अडचण ओळखून कामही पूर्ण करतील. नवीन ओळखी होतील. प्रवास घडेल. घरात वातावरण चांगले राहील. सुवार्ता कळेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. महिलांना मनाप्रमाणे खर्च करता येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. 

मिथुन 
एकाच वेळी अनेक कामे मनात येतील. त्यांची आखणी करून वेळ व पैसे यांची सांगड घालून ती पूर्ण कराल. कार्यतत्पर राहून कामात पुढाकार घ्याल. व्यवसायात चोखंदळ राहून कृतीवर भर दयाल. पूर्वी केलेल्या श्रमाचे चीज होईल. नोकरीत अस्थिरता राहील, परंतु योग्य निर्णय होऊन त्याचा लाभ तुम्हाला होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. घरात कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत आखाल. प्रतिष्ठेत भर टाकाणारी खरेदी कराल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल. मनोकामना पूर्ण होतील. 

कर्क 
कामात व्यग्र राहून प्रगती करण्यावर भर राहील. व्यवसायात धाडस करून वेगळया पद्धतीचे काम सुरू कराल. आर्थिक लाभ चांगला असल्याने चिंता नसेल. नवीन कामेही ओळखीतून मिळतील. नोकरीत तुमच्या गुणांना वाव देणारे काम मिळेल. कामात चोख रहाल. बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. घरात छोटासा कार्यक्रम ठरेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. तरुणांना मनपसंत व्यक्तीची भेट घडेल. केलेल्या श्रमाचे कौतुक होईल. प्रकृतीमान सुधारेल. महिलांना कामाची नवीन किरणे दिसतील. 

सिंह 
तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला खतपाणी घालणारे ग्रहमान आहे. कामातील प्रगतीचा ध्यास असेल. व्यवसायात परिस्थितीनुसार ध्येय धोरणे ठरवाल. कृतीवर भर जास्त असेल. कष्टाचीही तयारी राहील. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल संभवतो. रेंगाळलेली कामे गती घेतील. जोडधंदयातून विशेष लाभ होईल. घरात काही ठोस निर्णय घ्याल. प्रश्‍नांची उकल करून ती सामंजस्याने सोडवाल. कौटुंबिक स्वास्थ राहील. तरुणांना नवीन करिअर करण्याची संधी चालून येईल. महिलांना नवीन सहवासाने आकर्षण वाटेल. 

कन्या 
नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक धोरण अवलंबाल. तणावमुक्त झाल्याने हायसे वाटेल.व्यवसायात योग्य वेळी योग्य व्यक्तींची मिळालेली मदत कामे आटोक्यात आणेल. नवीन कामे करण्यात उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी झाल्याने चार पैसे हातात शिल्लक राहतील. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून वागा. सवलती मिळवण्यासाठी कारणे यथायोग्य मांडा. तडजोडीने तोडगा निघेल. घरात लांबलेला शुभसमारंभ निश्चित होईल. तरुणांना कामाचा हुरूप वाटेल. घरकामात महिलांचा वेळ मजेत जाईल. 

तूळ 
मानले तर समाधान मिळेल. पैशाचा विनियोग यथायोग्य केलात तर चणचण भासणार नाही. व्यवसायात टिकून राहण्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब कराल. जाहिरात, प्रसिद्धीमाध्यमांमुळे कामाचा विस्तार होईल. सभोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य खुबीने मिळेल. नोकरीत वरिष्ठ अवघड कामे तुमच्यावर सोपवतील. कामाचे नियोजन करून त्याप्रमाणे पावले उचला. घरात तुमचा पवित्रा सावध ठेवलात तर होणारी गैरसोय कमी होईल. बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. महिलांनी तब्येत सांभाळावी. 

वृश्‍चिक 
काळानुरूप बदल करून पुढे जाण्याचा तुमचा स्वभाव तुमची प्रगती करण्यास उपयोगी पडतो. व्यवसायात उलाढाल वाढवण्याचा विशेष प्रयत्न राहील. त्यानिमित्ताने वेगवेगळया व्यक्तींशी संपर्क होईल. पैशाची आवक वाढेल. नोकरीत भत्ते व सवलती मिळाल्याने तुम्ही खुश असाल. सरकारी कामात यश मिळेल. घरात मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. मंगलकार्य ठरतील. महिलांना बराच काळ वाट बघून एखादी सुसंधी मिळाल्याने आनंद वाटेल. प्रकृतीमान सुधारेल. 

धनू 
तुमच्या हरहुन्नरी स्वभावाला झळाळी देणारे ग्रहमान लाभत आहे. व्यवसायात वेगवेगळया स्तरांवर आपली छबी उमटवण्याचा तुमचा प्रयत्न राहील. प्रगतीचा आलेख उंचावत जाईल. पैशाची चिंता मिटेल. कामे पूर्णत्वाला आल्याने हायसे वाटेल. मनाप्रमाणे जीवन जगण्यात मजा वाटेल. नोकरीत महत्त्वाच्या कामानिमित्ताने जादा अधिकार मिळतील. कमी श्रमात जास्त यश मिळेल. मानसन्मानाचे योग येतील. घरात गृहसजावटीसाठी खरेदी होईल. प्रवासाचे बेत कुटुंबासमवेत आखाल. स्वतःच्या व्यक्तिमत्वात भर घालाल. सार्वजनिक कामात नेतृत्व करता येईल. 

मकर 
तुमच्या कर्तुत्वाला झळाळी देणारे ग्रहमान आहे. अडथळयाची शर्यत पार करून दिलासा मिळाल्याने पुन्हा ताजेतवाने व्हाल. व्यवसायात काहीतरी चांगले करण्याचा आत्मविश्‍वास वाटेल. कामाचे स्वरूप बदलून फायदयाचे प्रमाण वाढवण्याचा विचार असेल. त्याला प्रतिष्ठित व्यक्तींचा पाठिंबाही मिळेल. नोकरीत तुमच्या कौशल्याला वाव मिळणारी संधी मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात खर्चावर बंधन ठेवणे गरजेचे आहे. पैसे शिल्लक ठेवावेत. महिलांनी फार मोठे बेत आखू नयेत. 

कुंभ 
तुमचा आशावाद चांगला असल्याने कामात प्रगती कराल. व्यवसायात आर्थिक स्थिती नियंत्रणात आणण्याचा तुमचा विचार सफल होईल. याकामी हितचिंतकाची मदत मिळेल. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे वळा. नोकरीत कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका. व्यवहारात चोख रहा. गोड बोलण्याचा प्रयत्न करा व खुबीने कामे करून घ्या. घरात सर्वांचे मनःस्वास्थ्य सांभाळावे लागेल. वादाचे प्रसंग आले तरी निवळतील. तरूणांना मनसोक्त बिनधास्त वागता येईल. 

मीन 
प्रगतीला पूरक ग्रहमान आहे. त्यामुळे काहीतरी चांगले हातून घडावे असे वाटेल. व्यवसायात दैनंदिन कार्यक्रमात फेरबदल कराल. पैशाची बाजू विशेष बळकट करण्याचा प्रयत्न राहील. खेळत्या भांडवलाची तरतूदही करून ठेवाल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. नवीन नोकरीत मात्र काही निर्णय घाईने घ्यावे लागतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. तरुणांचे विवाह जमतील. कलाकार, खेळाडूंना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झगडावे लागेल, पण लाभ होईल. महिलांना मानसिक शांतता मिळेल.

संबंधित बातम्या