ग्रहमान २३ ते २९ जानेवारी २०२१

अनिता केळकर
सोमवार, 25 जानेवारी 2021

ग्रहमान २३ ते २९ जानेवारी २०२१

मेष
तुमच्या उत्साही स्वभावात पूरक ग्रहमान लाभेल. व्यवसायात कामात आलेल्या अडथळ्यांना पार करून वेळप्रसंगी धोका पत्करून पुढे जाण्याचा प्रयत्न राहील. कामात नवीन पद्धतीची योजना कार्यान्वित करण्याचा मानस असेल. कामांना योग्य तो प्रतिसाद मिळेल. फायदा मिळवून देणारी कामे हाती घ्याल. नोकरीत स्पर्धेत सहभागी व्हाल व यश मिळवाल. वरिष्ठ व सहकाऱ्यांची मर्जी राहील. घरात प्रतिष्ठा वाढवणारी खरेदी होईल.

वृषभ
कामात ठोस पावले उचलाल. त्यादृष्टीने व्यवसायात पैशाची जुळवाजुळव कराल. योग्य व्यक्तींची भेट घेऊन कामे मिळवाल व रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. सहकारी कामात मदतीचे आश्वासन देतील. नोकरीत प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर येईल. मधूनच कामाचा मनस्वी कंटाळा येईल. घरात वातावरण चांगले राहील. पैशावरून किरकोळ वाद होतील.

मिथुन
सहज सोप्या वाटणाऱ्या कामात अडथळे येतील. तेव्हा गाफील राहू नका. व्यवसायात समोर मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्या. कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे ते आधीच ठरवा. जुनी येणी वसुल करण्यावर लक्ष केंद्रित करा. नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल. आवडीच्या कामातून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून दाखवाल. कलाकार, खेळाडूंना त्यांचे क्षेत्रात मागणी राहील.

कर्क
मनी जे ठरवाल ते पूर्णत्वाला नेण्याचा ठाम निश्‍चय कराल. त्यात यशही येईल. व्यवसायात नको त्या कामात बराच वेळ जाईल. सरकारी कामे वेळ घेतील. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवलीत तर नेहमीचे काम हलके होईल. पैशाच्या कामांना गती येईल. नोकरीत वरिष्ठांना खूष करण्यासाठी जादा कामाची तयारी असेल. मात्र आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत याची दक्षता घ्या.

सिंह
सभोवतालच्या परिस्थितीनुरूप बदल कराल. व्यवसायात माणसांची पारख महत्त्वाची राहील. बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करणे भाग पडेल. काही व्यक्ती मतलबापुरती तुमची खुशामत करतील. नोकरीत सबुरीचे धोरण ठेवा. वरिष्ठांनी दिलेली आश्वासने जरी पूर्ण झाली नाहीत तरी रागावू नका. बोलण्यावर संयम ठेवा. घरात आपलेच म्हणणे खरे करू नका. अनावश्यक खर्चांना वेळीच आळा घाला.

कन्या
पैशाची ऊब मिळाल्याने मनातील सुप्त इच्छा आकांक्षा सफल होतील. व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. नवीन कामे मिळतील. कामाचा अनुभव चांगला येईल. नोकरीत सर्वांगीण प्रगती होण्याच्या दृष्टीने एखादी महत्त्वाची संधी मिळेल. मात्र त्याचा लाभ कसा उठवायचा हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. घरात एखाद्या सदस्याचा प्रश्‍न हलका होईल.

तूळ
तुमच्या वागण्या बोलण्यातून तुमचे कर्तृत्व दाखवता येईल. व्यवसायात तीव्र स्पर्धा असेल तेव्हा सावध राहा. कार्यपद्धतीत बदल करून नवीन तंत्रज्ञान आत्मसात कराल. नोकरीत कामाच्या स्वरूपात फेरफार होईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. घरात एखाद्या निर्णयात तुमची भूमिका कडक राहील. त्यामुळे विरोध होण्याची शक्यता राहील. तडजोड केल्यास लाभ तुमचाच होईल.

वृश्‍चिक
एखादा निर्णय घाईने घेऊन नंतर उगीचच घेतला असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. थोडी सबुरी ठेवा. व्यवसायात पैशाची स्थिती जरी समाधानकारक असली तरी देणी व इतर खर्च वाढतील. नको त्या कामात बराच वेळ जाईल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा वाढल्याने कामाचा मनस्वी कंटाळा येईल. त्यामुळे मधूनच तुमचे मन बंड करून उठेल. घरात नातेवाईक आप्तेष्ट यांचा मूड मौजमजा करण्यासाठी असेल.

धनू
आशावाद जागृत ठेवून प्रगती कराल. व्यवसायात पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळेल. नवीन कामाच्या योजना सुरू करण्याचा इरादा सफल होईल. कामे वाढवण्याच्या दृष्टीने नवीन करार मदार होतील. नोकरीत वेगळ्या पद्धतीचे काम मिळेल त्यामुळे उत्साही राहाल. नवीन ओळखी होतील. पैशाची चिंता मिटेल. घरात वातावरण प्रसन्न राहील. विवाहोत्सुक तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल.

मकर
ज्या कामात अडथळे येत होते त्यात सुधारणा होईल मात्र ताबडतोब कामे पूर्ण होतील ही अपेक्षा नको. व्यवसायात पैशासाठी धावपळ दगदग होईल. हातातील पैशाचा वापर विचारपूर्वक करावा लागेल. जुनी कामे मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या बदलत्या धोरणामुळे चिडचिड होईल. मनाविरुद्ध काम करावे लागेल. घरात आवश्यक कारणांसाठी खरेदी होईल. मुलांकडून अपेक्षित यश कळेल.

कुंभ
हातातील संधीचा पुरेपूर फायदा घ्याल. ग्रहांची साथ राहील. व्यवसायात मनोकामना पूर्ण होतील. नवीन प्रकल्प हाती घ्याल. खेळत्या भांडवलाची तरतूद करून ठेवाल. कधी गोड बोलून तर कधी अधिकाराचा वापर करून कामे करून घ्याल. कमाई समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठांच्या बऱ्याच अपेक्षा असतील. त्यासाठी वरिष्ठांचा मूड बघून तुमच्या मागण्या मान्य करून घ्या.

मीन
ग्रहमान तुम्हाला उत्तेजित करणारे आहे. तुमच्या आग्रही स्वभावाला वातावरणाची पूरक साथ मिळेल. व्यवसायात चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न राहील. मनातील गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्याचा आग्रह राहील. त्यासाठी कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीत बदली किंवा बदल समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल. सहकारी कामात मदत करतील. घरात दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात धन्यता मानाल.

संबंधित बातम्या